Jaykumar Gore : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी बिदाल येथील नागरी सत्कार कार्यक्रमात विरोधकांना थेट इशाराच दिला आहे. “आता मी बोलायचे नाही ठरवले आहे. पण, कार्यक्रम करायचं ठरवले आहे. अनेक जण मला आता सांगत आहेत की, माझा संबंध नाही. पण कोणी काय-काय केलं आहे? त्याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे. माझ्या विरोधात अनेक षडयंत्र झाले. ते सगळे सहन केले. पण, शेवटचे षडयंत्र माझ्या विरोधात झाले, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. त्यामुळे कोणाचा कार्यक्रम कधी लागतोय एवढाच विषय आहे. अनेक जण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जाऊन पाया पडले, आम्हाला वाचवा म्हणाले. त्यामुळे आजपर्यंतचा इतिहास आहे की, षडयंत्र करणारा कधीही जिंकलेला नाही,” असा इशारा गोरे यांनी विरोधकांना दिला आहे.
बिदाल येथील नागरी सत्कार कार्यक्रमात जयकुमार गोरे म्हणाले की, आता माझ्यासमोर एकच उद्दिष्ट आहे. मला परमेश्वराने नवीन जीवन दिले. इतका मोठा अपघात झाला. त्यातून पुन्हा उभा राहिलो. तेव्हाही काही जण म्हणत होते की, हा आता नीट चालेल का नाही? नीट बोलेल का नाही? आता पहिल्यासारखे काम जमेल का नाही? त्यातूनही देवाने मला पुन्हा उभे केले. आज ताकदीने मी तुमच्या सर्वांसमोर उभा आहे. इतक्या संकटातून जयकुमार येतो तेव्हा देवाने देखील माझ्याकडून काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत. देवाला पण माझ्याकडून काही करून घ्यायचे आहे. ते करून घेण्यासाठी परमेश्वर माझ्या पाठीशी उभा आहे. कोणी कितीही देव पाण्यात घालू द्या, जे उद्दिष्ट मला परमेश्वराने, माझ्या पक्षाने, माझे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे ते उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय जयकुमार गोरे थांबणार नाही, असे त्यांनी म्हटले.
आता कार्यक्रम करायचा
जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, आता मी बोलायचे नाही असे ठरवले आहे. आता कार्यक्रम करायचा ठरवले आहे. त्यामुळे जे काही घडणार आहे ते घडणारच आहे. अनेक लोक सांगतात की, त्यात मी नव्हतो, त्यात माझा काही संबंध नाही, परवा काही गडी देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले. माझा काही संबंध नाही, म्हणाले. पण, कुणी काय-काय केले आहे? याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे. दहा षडयंत्र माझ्या विरोधात केली. प्रत्येक वेळी मी सहन केलं. पण, अकरावे आणि शेवटचे षड्यंत्र जेव्हा माझ्या विरोधात झाले, त्याचा प्रत्येक हिशोब माझ्याकडे आहे. कोण कुठे बोलला? कोण कुठे बसला? कोणी काय षड्यंत्र केलं? कोणाला किती पैसे द्यायचे ठरले? या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आता आम्ही वाट बघतोय की कुणाचा कार्यक्रम कधी लागतो.
षडयंत्र करणारा कधीही युद्ध जिंकू शकला नाही
अनेक गडी जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाया पडले. आम्हाला वाचवा म्हणून सांगितले. जयकुमार गोरेमध्ये सगळं सहन करायचा दम आहे. जयकुमार गोरेने जितकं सहन केलं त्यातला एक टक्का सहन करून दाखवा. आयुष्यभर संघर्ष केला आहे. संघर्ष करूनही जयकुमार गोरे उभा आहे. एकदा मैदानात येऊन लढवून दाखवा. किती दिवस षडयंत्र करणार? आजपर्यंतचा इतिहास आहे की षडयंत्र करणारा कधीही युद्ध जिंकू शकला नाही. आजवर सत्य कायम जिंकलेले आहे, असा इशारा जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला आहे.
आणखी वाचा
अधिक पाहा..