‘तू समाजासाठी धोका आहेस,’ श्वान मालकाने कुत्र्याच्या 5 पिल्लांना भिंतीवर आपटून ठार केलं, म्हणतो ‘त्यांना पाहून…’

0
73
‘तू समाजासाठी धोका आहेस,’ श्वान मालकाने कुत्र्याच्या 5 पिल्लांना भिंतीवर आपटून ठार केलं, म्हणतो ‘त्यांना पाहून…’


हैदराबादमधील रहिवाशी संकुलात एका व्यक्तीने श्वानाच्या पाच नवजात पिल्लांची क्रूरपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे. इमारतीच्या पार्किग परिसरात त्याने आधी पिल्लांना भिंतीवर आणि नंतर जमिनीवर आपटलं. यानंतर त्याने दगडाने त्यांच्यावर हल्ला केला.  आश्चर्याची बाब म्हणजे, व्यावसायिक असणारा आशिष स्वत: एका श्वानाचा मालक आहे. श्वानासह फिरण्यासाठी बाहेर पडल्यावर त्याने भटक्या पिल्लांची हत्या केली. रहिवाशांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

अंगावर काटा आणणाऱ्या व्हिडीओत आशिष आपल्या पाळीव श्वानासह अपार्टमेंटच्या पार्किंग परिसरात चालत जाताना दिसत आहे. यानंतर तो नवजात श्वानाच्या दिशेने चालत जातो. आशिष त्यातील एका पिल्लाला उचलतो आणि खाली जमिनीवर आपटतो. यानंतर पिल्लू जिवंत आहे का हे तपासण्यासाठी तो त्याच्या अंगावर बसतो. तो एवढ्यावरच थांबत नाही. आपल्या पायाखाली तो त्या पिल्लाला चिरडतो. 

पार्किंगमध्ये पाचही पिल्लं मृतावस्थेत आढळली असून, त्यांच्या शरिरावर गंभीर जखमा आहेत. आशिषला जाब विचारण्यात आला असता त्याने आपण पिल्लांना नियंत्रित करत असल्याचा आणि आपल्या श्वानाकडे येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र त्याचा हेतू वेगळा असल्याचं स्पष्ट होत आहे. पिल्लं काय त्रास देऊ शकतात अशी विचारणा शेजाऱ्यांनी केली असता आशिषकडे काही उत्तर नव्हतं. 

यानंतर व्हिडीओत आशिष आपण पिल्लांची हत्या केल्याची कबुली देताना दिसत आहे. “मी त्यांना दगडाने मारलं आणि भिंतीवर आपटलं,” अशी कबुली तो देतो. पिल्लांनी काही त्रास दिला होता का? असं विचारल्यावर त्याने नाही उत्तर दिलं. तुझ्या मनात भटक्या श्वानांबद्दल काही राग आहे का? असं विचारलं असता तो म्हणाला, “कधीकधी ते भुंकतात आणि हल्ला करतात”. आपणही एका श्वानाचे पालक असून, आपल्याकडे श्वान आहे असंही तो सांगतो.

एका व्हिडिओमध्ये, शेजारी जाब विचारत असताना आशिष रडू लागतो. त्याची पत्नी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसते. “त्याने काय केले आहे ते त्याला विचारा; त्याने कुत्र्याच्या पिल्लांना मारलं आहे,” असं एक शेजारी सांगतो. तिला तो एका पिल्लाला मारणारा व्हिडिओ देखील दाखवतो. “तू समाजासाठी धोका आहेस,” असं एक शेजारी म्हणतो.

भारतीय न्याय संहिता आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत प्राण्यांवरील कोणतेही क्रूर कृत्य दंडनीय गुन्हा आहे.





Source link