
इंद्रजित भालेराव7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आमच्या शाळेत दररोज सकाळी सुंदर प्रार्थना व्हायची. उंच आवाजात पाढे, उजळणी म्हणताना शाळा दुमदुमून जायची. शेवटच्या तासाला कवितेच्या तालावर ती झुलायची…
आम्ही शिकत होतो, तेव्हा शिक्षण व्यवस्थेतले आजचे पुष्कळ शब्द आम्हाला माहीतच नव्हते. उदाहरणार्थ, कॉपी, ट्युशन, निरोप समारंभ, स्नेहसंमेलन हे शब्द दहावीपर्यंत माहीत नव्हते. असं काही असतं, हेही कुणाच्या बोलण्यातून आलं नव्हतं. या सगळ्या गोष्टींपासून आमचं शिक्षण मुक्त होतं. आधुनिक युगापासून कोसो दूर असलेल्या लहान गावात आम्ही राहत होतो. सध्या सगळीकडं परीक्षा सुरू आहेत आणि कॉपीमुक्त परीक्षा, कॉपीयुक्त परीक्षा, सामूहिक कॉपी असे शब्द कानावर पडत आहेत, वाचायला मिळत आहेत. आम्ही शिकत होतो तेव्हा आम्हाला ‘कॉपी’ ही वस्तू तर सोडाच; पण हा शब्दही माहीत नव्हता. कारण तो तेव्हा अस्तित्वातच नव्हता. कॉपी हा शब्द अस्तित्वात कधी आला आणि लोक कॉपी कधीपासून करू लागले, याचं संशोधन व्हायला पाहिजे.
अर्थातच परीक्षेत केल्या जाणाऱ्या कॉपीविषयी मी हे बोलतो आहे. की शहरातले लोक आधीपासून कॉपी करत होते? आणि आम्हा खेड्यातल्या मुलांना यातलं काहीच माहीत नव्हतं? आज याबाबतीत खेडीही पुढे गेली आहेत. काही गावंच्या गावं कॉपीसाठी कुप्रसिद्ध असतात. तिथं कॉपी सेंटर चालतात, असं म्हटलं जातं. परीक्षा सेंटर चालतं, असं म्हणत नाहीत.
मग आमच्या परीक्षा कशा पार पडत? खरं तर तिसरीपर्यंतच्या परीक्षा आमचेच गुरुजी घ्यायचे. आणि ते कडक परीक्षा घेत असत. त्यांना कुणीही तसे सांगितलेले नसायचे. पण, परीक्षा कडक घ्यायला पाहिजे, हे तेव्हा सगळ्यांनाच माहीत होतं आणि मान्य होतं. त्यांच्या पातळीवर ठरवलं तर ते हवं त्यांना पास आणि हवं त्यांना नापासही करू शकत होते. त्यांना तसे विचारणारे कुणी नव्हते. पण, तरीही गुरुजी अनेक मुलांना नापास करीत.
नापास केलेल्या मुलांचे पालक येऊन शिक्षकांना विचारत नसत की, आमच्या मुलाला नापास का केलं? कारण त्यांना माहीत असायचं की, आपल्या मुलाला काही येत नसणार, त्याचा अभ्यास पक्का झालेला नसणार, मग त्याला पुढच्या वर्गात घालून काय उपयोग? त्यामुळं गुरुजींना विचारायची काय गरज? असंच त्यांना वाटायचं. गुरुजीही कोणाविषयी अढी ठेवून उगाच कुणाला नापास करीत नसत. ज्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आणि लिहायला सांगितलेल्या गोष्टी जमत नसत त्यांना, ‘यंदाचं वर्ष तू याच वर्गात बस आणि अभ्यास पक्का कर,’ असं ते सांगत.
विद्यार्थी, पालक यांच्यासह सर्वांना ते मान्य असायचं. तो मुलगा खरंच अभ्यास करून पक्का व्हायचा आणि पुढं निघून जायचा. आजच्यासारखी सर्वांना पुढे पळा, पुढे पळा, सर्वांच्या पुढे पळा.. अशी घाई नसायची. फक्त चौथी, सातवी आणि दहावीच्या परीक्षा शाळेबाहेर व्हायच्या. दुसऱ्या गावात जाऊन त्या द्याव्या लागत. नाही तर बाकी सर्व वर्गांच्या परीक्षा शाळेतल्या शाळेतच पार पाडत. गावातलेच गुरुजी त्या परीक्षा घेऊन मुलांचं पास / नापास ठरवायचे. ज्या परीक्षा बाहेरगावी जाऊन द्यायच्या, त्यांना बोर्डाची परीक्षा, असं म्हटलं जायचं.
अशा परीक्षा अवघड समजल्या जायच्या. त्यांची तयारी जास्त करायला पाहिजे, असं गुरुजींना, शाळांना, गावाला आणि मुलांनाही वाटत असे. त्यामुळं त्यासाठी गुरुजी जास्तीचे तास घेत. संध्याकाळी मुलांना शाळेत बोलावून त्यांचा अभ्यास घ्यायचे आणि त्यांच्यासोबतच ते शाळेत झोपायचे. त्यामुळे ट्युशन हाही शब्द आम्हाला माहीत नव्हता. कारण तेव्हाचे गुरुजी केवळ शाळेपुरते मर्यादित नव्हते. शाळेबाहेरही त्यांचे लक्ष मुलांकडे असे. फक्त शिक्षणापुरते नव्हे, तर मुलांच्या आयुष्याच्या जडणघडणीचेही ते शिल्पकार असत.
दहावीपर्यंत मी तीन शाळांमध्ये शिकलो. पहिली ते चौथीपर्यंत गावातच शाळा होती. पाचवी ते सातवी ही तीन वर्षे आहेरवाडी नावाच्या गावी जाऊन-येऊन शिकलो. पुढं आठवी ते दहावी अशी आणखी तीन वर्षे हयातनगरला जाऊन-येऊन शिकलो. अशा तीन वेळा शाळा सोडल्या, पण त्या सोडताना शाळेने अथवा गावाने निरोप समारंभ केला नाही. त्यामुळं शेवटच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना निरोप द्यायचा असतो, त्याचा एक कार्यक्रम करायचा असतो, त्यासाठी भाषणं करायची असतात, हे आम्हाला माहीत नव्हतं. निरोप समारंभ हा शब्दच माहीत नव्हता. तेव्हाचे सगळे मित्र अजून आमच्या काळजात आहेत, आम्ही त्यांना अजूनही निरोप दिलेला नाही.
आज मी महाराष्ट्रभर शाळा-महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनाचा पाहुणा म्हणून फिरत असलो, तरी दहावीपर्यंत स्नेहसंमेलन हा शब्दही आम्ही ऐकलेला नव्हता. ‘गॅदरिंग’ हा तर फार दूरचा शब्द. आमच्या शाळेत कधीच स्नेहसंमेलनं झाली नाहीत. ती होत असतात, असेही आम्हाला कुणी सांगितलं नाही. मग आमच्या शाळेत काहीच होत नव्हतं काय? तर असं अजिबात नाही. दररोज सकाळी सुंदर प्रार्थना व्हायची. गुरुजी परवचा घ्यायचे. उंच आवाजात पाढे आणि उजळणी म्हणताना शाळा दुमदुमून जायची. शेवटच्या तासाला सुंदर कविता म्हणत. सगळी शाळा त्या तालावर झुलत असे. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टच्या मागेपुढे गुरुजी खेळांच्या स्पर्धा घ्यायचे.
त्यामध्ये; लिंबू-चमचा, दोन मुलांचा एकेक पाय एकत्र बांधून धावणे, पोत्यात पाय घालून चालणे, नुसते धावणे, कबड्डी अशा काही स्पर्धा घेतल्या जात. सांस्कृतिक स्वरूपाच्या कुठल्याही स्पर्धा शाळा घेत नसे. गाणी, कविता, अभिनय अशा स्पर्धा आम्ही कधी पाहिल्या नव्हत्या.
शाळेत असं काही होत नव्हतं, तर मग आमचं सांस्कृतिक भरण-पोषण कसं झालं? तर, भोवतालच्या सांस्कृतिक घटना पाहून ते झालं, असं मला वाटतं. पारावरच्या पोथ्या, पारासमोरची कीर्तनं, सणावाराला होणारी सोंगं, मंदिरातल्या आरत्या, भूपाळ्या, शेजारत्या ऐकून आम्हाला बऱ्याच गोष्टी समजत गेल्या. शिकाव्याशा वाटल्या. त्यात आम्ही सहभागी होत गेलो. त्यामुळे लहानपणापासून चांगलं काव्य कानावर पडलं, चांगला अभिनय पाहायला मिळाला, चांगल्या सुरात गाणारे ऐकता आले. जात्यावरच्या ओव्या ऐकल्या, पाठ केल्या.
शिवाय, दारी येणारे कितीतरी बांधव नाट्य, अभिनय, गीत, संगीत घेऊन येत असत. त्यांचे किती प्रकार सांगावेत? भल्या पहाटे येणारा वासुदेव होता, त्याच्या आधी येणारा कुडमुडे जोशी होता, वासुदेवानंतर येणारा पांगुळ होता आणि दिवसभर दारात येणारे कितीतरी भिक्षेकरी होते, जे गीत – संगीत आणि अभिनयाचे विविध प्रकार सादर करायचे. ते ऐकण्यात, पाहण्यात, त्यांचं अनुकरण करण्यात आम्ही गुंगून जायचो. मला वाटतं, त्यातूनच आमच्या पिढीचं भरणपोषण झालं असावं.
आता या गोष्टी बंद झाल्या आणि शाळांमधून हे सगळे नवे प्रकार सुरू झाले. तिथून आता विद्यार्थी घडतात, असं म्हणायला हरकत नाही. कारण आता शाळेत विद्यार्थी स्वत:च हे सगळे प्रकार सादर करतात. त्यांना ते शिकवले जातात. काळाच्या प्रवाहात होत्याचे नव्हते होऊन जाते आणि जे नव्हते ते समोर येते. हा काळ काही गोष्टी संपवत असतो, काही नव्या गोष्टी जन्माला घालत असतो. बदल हा सृष्टीचा नियमच आहे, असे म्हटले जाते, ते खोटे नाही.
(संपर्कः inbhalerao@gmail.com)