Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रडायरीची पाने: मंजुळामाय

डायरीची पाने: मंजुळामाय

[ad_1]

इंद्रजित भालेराव10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मंजुळामायचं सगळ्यांशी एवढं घरोब्याचं नातं होतं की, हे भाजीपाला विकणं पैसे कमावण्यासाठी नव्हे, तर तो एक आपला धर्म म्हणून त्या करत असाव्यात.

आम्हाला शाळेत जायची घाई, वडिलांना काहीतरी कामासाठी तालुक्याला जायची घाई. सकाळी आंघोळी उरकून सारवलेल्या अंगणात आमची पंगत बसलेली. अंगणातल्या चुलीवर आईचं भाकरी भाजणं सुरू. भाजी आधीच ताटात वाढलेली. भाजलेल्या गरम गरम भाकरीच्या चार-चार कोर करून आमच्या ताटात टाकणं सुरू आहे. आमची जेवणं सुरू आहेत. एवढ्यात पळशीच्या वाटेनं म्हाताऱ्या मंजुळामाय माळीण येताना दिसतात. गावाबाहेर पहिलं घर आमचंच होतं. त्यामुळं मंजुळामाय आमच्या दारात माळव्याची डाल टेकवायच्या आणि जखडलेली मान मोकळी करायच्या. जेवत असलेल्या वडिलांसमोर एक कांद्याची आणि एक मेथीची जुडी टाकायच्या. वडील त्या जुड्या सोडायचे आणि एकेक कांदा, मेथीची भाजी आम्हाला द्यायचे. कुठलीच औषधं न फवारलेली, निर्मळ मंजुळामायच्या डालग्यातली ही निर्मळ भाजी धुण्याचीही वडिलांना गरज वाटत नसे. माय लगोलग उल्ह्यावर चहा ठेवायची. बहिणीला किंवा वहिनीला मंजुळामायला पाणी द्यायला सांगायची. चहा झाला की तो तिला द्यायची.

चहा पिऊन झाल्यावर मंजुळामाय माळव्याची डाल डोक्यावर घेऊन उठायच्या नि गावात जायच्या. आम्हाला दिलेल्या भाजीपाल्याच्या बदल्यात मायनं त्यांना काहीच दिलेलं नसायचं. गावात भाजीपाला वाटून मंजुळामाय परत आल्यावर माय त्यांना जे काय द्यायचं ते द्यायची. पण, ते पैशाच्या रूपात नसायचं. मंजुळामायच्या कुरकुल्यात माय दाणे भरून द्यायची. ते डालीतल्या पिशवीत टाकून मंजुळामाय बसायच्या. माय आणि त्या सोबत जेवण करायच्या. भाजी, भाकरी, ताक, लोणी आणि मंजुळामायनं आणलेला भाजीपाला असा सगळा जामानिमा असायचा. जेवतानाही आणि नंतरही या दोघी बोलत बसायच्या. ऊन उतरलं की मंजुळामाय पळशीला निघून जायच्या.

आमच्या गावात माळी समाज नव्हता. माळी समाजानं वस्ती करावी असा आमच्या गावचा शिवारही नव्हता. सगळा शिवार कोरडवाहू. कुणी विहिरी खोदून पाहिल्या, पण पाणी लागायचं नाही. त्यामुळं गावात भाजीपाला पिकवणं ही अशक्य गोष्ट होती. भाजीपाला विकत घेणं कुणाला माहीतच नव्हतं. रानात उगवतील त्या पावसाळी पालेभाज्या खाणं, नाही तर दाळीदुळी, खारवड्या, कुरवड्या, उसऱ्या, मुगोडे, बेसन-पिठलं, नाही तर दूध हेच भाजी सारखं खाल्लं जायचं. आम्हा सगळ्यांना दुधासोबत भाकरी खाणं हेच सगळ्यात जास्त माहीत होतं. भाजी असेल तर ठीक, नाहीतर ताटात दूध ओतायचं आणि त्यात भाकरी चुरून खायची. थोडा गुळ नाहीतर थोडं चटणी-मीठ टाकायचं. जे असेल त्यावर भागवायचं. पोटात रिकामी उरलेली जागा पाण्यानं भरायची. आणि तुडुंब पोटभरून घराबाहेर पडायचं, ते संध्याकाळपर्यंत पुन्हा भाकरीची आठवण नाही आली पाहिजे. अशी सगळी व्यवस्था होती. म्हणून आमच्या गावात कुणी माळी बांधव नव्हते. पण, जवळच्या पळशीमध्ये माळी समाजाची काही घरं होती. तिथून या मंजुळामाय भाजीपाला घेऊन येत.

मंजुळामाय फार गरीब घरच्या होत्या अशातला भाग नाही. त्यांचं घर खूप चांगलं होतं. पुढं मी हयातनगरला शाळेला गेलो, तेव्हा पळशीवरुनच जायचो. जाता-येता नेहमी मंजुळामायचं घर दिसायचं. दोन मजली घर होतं. घरासमोरच त्यांचं शेत होतं. शेतात विहीर होती. त्या विहिरीच्या काठानंच आमचा शाळेला जायचा रस्ता होता. मंजुळामायचा नातूही आमच्यासोबत शाळेत होता. एवढ्या चांगल्या घरातल्या मंजुळामाय हे माळवं डालग्यात घेऊन, या म्हातारपणी इतक्या लांब आमच्या गावात का येत असतील? असं मला वाटायचं. पण, कदाचित पारंपरिक व्यवसाय म्हणून ती सवय झाली असावी. त्यात अपमान वाटायचा काही प्रश्नच नव्हता. शिवाय, सगळ्या घरांशी एवढं घरोब्याचं नातं होतं की, यात व्यवसायाचा भागच नव्हता. पैसे कमावण्यासाठी, व्यापार म्हणून हा भाजीपाला विकणं नव्हतं, तर तो एक आपला धर्म म्हणून मंजुळामाय करत असाव्यात. कारण मंजुळामाय माळीण आहेत, हे आम्हाला खूप उशिरा समजलं. नाहीतर आमच्या गावात घरोघरी त्यांचं ज्या पद्धतीनं चहापान, स्वागत व्हायचं, प्रत्येक घरात जेवणाचा आग्रह व्हायचा आणि आमच्याही घरी मंजुळामाय जेवायच्या, तेव्हा त्या आपल्या पाहुण्या आहेत, असंच वाटायचं. तेव्हा अशीच नाती होती, माणसामाणसांमध्ये. अस्पृश्यांना थोडं दूर बसवलं जायचं, पण त्यांच्याशीही नाती मात्र जवळचीच होती.

तर अशा या मंजुळामाय. पहाटे उठून, भाजीपाला काढून, डाल भरून निघत असाव्यात. कारण एवढ्या सकाळी, दिवस उगवायला त्या आमच्या दारात हजर असत. जेव्हा शेतात खळ्यावर रात्री निवद होणार असेल, त्या दिवसाचा निरोप मंजुळामायला सांगितला जाई. त्या दिवशी दुपारीच मंजुळामाय खळ्यावर येत. डालगंभर भाजीपाला खळ्यावर टाकून जात. त्या दिवशी रात्री गावातल्या प्रत्येक घरी ‘निवदाचं जेवायला या..’ असं सांगितलं जायचं. हे काही खास पंगतीसाठी म्हणून केलेलं वेगळं जेवण नसायचं. तुरीचं खमंग फोडणी दिलेलं वरण, भाकरी, ठेचा आणि मंजुळामायनं दिलेला भाजीपाला, पातीचे कांदे असं सगळं त्यासोबत खायला असायचं. त्यासाठी मंजुळामायनं दुपारी हे डालगंभर माळवं खळ्यावर आणून टाकलेलं असायचं. त्याच्या बदल्यात मंजुळामायला काय मिळत असे? कधी मिळत असे? ते कोण देत असे? माहीत नाही. पण, काहीतरी दिलं जात असावं. त्या काळात नगदी पैशाचा व्यवहार फारच कमी व्हायचा.

वस्तुविनिमय फार असायचा. त्यामुळं गावातले सगळे लोक आयुष्यभर बिनपैशाचे आनंदात जगत असत. दारात कुणी काहीही घेऊन आला, तर त्या बदल्यात घरातलं धान्य दिलं जायचं आणि ती वस्तू घेतली जायची. हा वस्तुविनिमयाचा आदिम व्यवहार मी माझ्या लहानपणी सर्रास पाहिला आहे. तसंच मंजुळामायला कधीही पैशाचा व्यवहार करताना मी पाहिलं नाही.

पुढं आमच्या गावात येलदरी धरणाचं पाणी आलं. सगळ्या कोरडवाहू जमिनी पाण्याखाली आल्या. त्यामुळं लोकांना नवनवी पिकं घेता येऊ लागली. त्यात भाजीपालाही आला. मग लोक आपल्या घरीच मिरच्या, वांगी, मेथी, कोथिंबीर अशा भाज्या पिकवू लागले. त्या काळात आजच्यासारख्या चुका, पालक, बटाटा या भाज्या फारशा लोकप्रिय नव्हत्या. शिवाय, भाजीपाल्याचे पाटेही टाकले जायचे. त्यात भरपूर चवळी, भेंडी उपलब्ध असायची. पूर्वी ती फक्त एकाच मोसमात टाकता यायची. पण, बारमाही पाण्यामुळं नेहमीसाठी चवळी, भेंडी उपलब्ध होऊ लागली. आता भाजीपाला बाहेरून आणण्याची फारशी गरज राहिली नाही. मंजुळामायही थकल्या. त्यामुळं हळूहळू त्यांचं आमच्या गावाला येणं बंद झालं. मंजुळामायची भेट होईनाशी झाली. पण, योगायोगानं तीन वर्षे मी हयातनगरला शाळेत होतो, तेव्हा जाता-येताना रोजच मंजुळामाय त्यांच्या अंगणात बसलेल्या दिसायच्या. आस्थेनं माझी, घरच्यांची चौकशी करायच्या. मायीविषयी काहीबाही विचारायच्या. मंजुळामायचा चेहरा माझ्या मायच्या मायसारखा म्हणजे आहेरवाडीच्या आजीसारखाच होता. त्यामुळं तो विसरणं कदापि शक्य नाही. अशी नाती आता शिल्लक राहिलेली नाहीत. पुढची पिढी अशा नात्यांविना कोरडीच वाढत जाणार आहे. ही नात्यांची ओल एकूणच समाजातून संपत चाललीय…

(संपर्कः inbhalerao@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments