Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रडायरीची पाने: झोंबीच्या फडामधी...

डायरीची पाने: झोंबीच्या फडामधी…

डायरीची पाने:  झोंबीच्या फडामधी…

[ad_1]


पूर्वीच्या काळी पैलवानाच्या खुराकाची, तालमीची सोय घरून होत नसेल, तर गावकरी स्वत: ती करून द्यायचे. गावातला पैलवान ही गावाची शोभा समजली जात असे. गावोगाव भरणाऱ्या जत्रांचे दोन मोसम असतात. एक दिवाळीनंतर सुरू होतो आणि दुसरा पाडवा, हनुमान जयंती झाल्यावर सुरू होतो. पावसाळी पीक निघून गेल्यावर दिवाळीनंतर एक आणि हिवाळी पिकं निघून गेल्यावर उन्हाळ्यात दुसरा जत्रांचा हंगाम सुरू होतो. गावोगावी अशा दोन टप्प्यांत जत्रा भरतात. जत्रांचा हा काळ शेतकऱ्यांना शेतात फार काम नसलेला असा असतो. त्यामुळे त्या जत्रांना शेतकऱ्यांची मोठी गर्दी असते. तसा जत्रा हा स्वतंत्र विषय आहे. पण, इथे मी तुम्हाला फक्त जत्रेमध्ये होणाऱ्या कुस्त्यांविषयी सांगणार आहे. कुस्ती आणि हलगी यांचा अतूट संबंध आहे. हलगी वाजल्याशिवाय पैलवानाच्या अंगात शक्तीचा संचार होत नाही आणि फडात पैलवान उतरले की हलगीलाही आपोआपच शेक चढतो. पूर्वी जात्यावर दळताना घरातल्या बाया गाणं म्हणायच्या… झोंबीच्या फडामधी, हलगी वाजती टांग टांग पहिलवानाला जोडी सांग झोंबीच्या फडामधी, हलगी वाजती कडाकडा पहिलवानाला जोडी काढा झोंबीचा फडामधी, हलगी वाजती घाई घाई पहिलवानाला जोडी नाही झोंबीच्या फडामधी, हलगी वाजती चालीनं पहिलवानाच्या बोलीनं ​​​​​​​झोंबीच्या फडामधी, हलगी वाजती गुडघ्यामिठी पहिलवानाच्या पडल्या गाठी झोंबीच्या फडामधा, दंड वाजती तोफखाना ​​​​​​​कोण्या माहुलीचा तान्हा… टांग टांग, कडाकडा, घाई घाई, चालीनं, गुडघ्यामिठी हे हलगी वाजवण्याचे प्रकार या गाण्यातून नेमके आलेले दिसतात. त्याच्याशी पैलवानाची जोडी घातलेली दिसते. आणि पैलवानाला जोडीच मिळत नाही, इतका तो अजोड आहे, असेही त्याचे कौतुक केले जाते. कारण ही गाणी म्हणणाऱ्या स्त्रीचा तो पैलवान भाऊ, मुलगा, भाचा, नवरा असा नात्याने कुणीतरी असतो. म्हणून त्याच्या कौतुकाला पारावार नसतो. हलगी सोबतच पैलवान कुस्तीच्या फडात दंडावर हाताचा खोंगा मारून जो हाबुक ठोकतात, त्याचंही ‘तोफखाना’ असं वर्णन शेवटी या गाण्यात केलं आहे. स्त्रिया कधीही कुस्तीच्या फडाकडं फिरकत नाहीत, याचं मला नेहमी नवल वाटायचं. किंबहुना कुस्तीच्या फडात पुरुष म्हणजे पैलवान मंडळी केवळ लंगोटावर असतात, ते आपल्या शरीराचं प्रदर्शन करीत असतात, म्हणून कदाचित स्त्रियांनी तिकडं येऊ नये, असा दंडक असावा. किंवा स्त्रियाही लाजेकाजेस्तव मुद्दाम तिकडं येत नसाव्यात, असं वाटायचं. मी ज्या ज्या जत्रेत कुस्त्यांचे फड पाहिले, तिथे चुकूनही मला कधी कुणी स्त्रिया दिसल्या नाहीत. वरच्या सारख्या ओव्या म्हणणाऱ्या माझ्या बहिणी, भावजया, चुलत्या यांनीही कधी फडाकडं चुकूनही चक्कर टाकलेली मला दिसली नाही. तरी फडामधल्या सगळ्या गोष्टींचं आणि हलगीच्या वाजण्याचं जिवंत चित्रण या बायका कशा काय करीत असाव्यात? अनुभवाशिवाय आणि निरीक्षणाशिवाय साहित्य लिहिता येत नाही, असं आपण म्हणतो. पण, या बायकांनी केवळ कल्पनेने हे लिहिलेलं दिसतं. कधी कधी बैठकीत पुरुष मंडळीमध्ये होणाऱ्या कुस्तीच्या फडाच्या गप्पा, घरातील कामं करताना त्यांच्या कानावर पडलेल्या असतील, तेवढ्याच. त्या आधारावर एवढी जिवंत रचना करणे, हे विलक्षण प्रतिभा असल्याशिवाय शक्य नाही. या निरक्षर बायांकडे ती ताकद असावी. कारण त्याशिवाय कुस्तीच्या फडाचं इतकं जिवंत चित्रण करणं शक्यच नाही. कुस्तीच्या फडामधले आणखी तपशील पुढच्या काही ओव्यांतून पाहायला मिळतात… झोंबीच्या फडामधी, पहिलवान गं देखना पडदे सोडिले दुकाना ​​​​​​​झोंबीच्या फडामधी, लिंब नारळ आधी फोडा बाळ कुस्तीला गं सोडा झोंबीच्या फडामधी, कैकाच्या खाली माना इडा उचल पहिलवाना ​​​​​​​झोंबीच्या फडामधी अंगाची केली मूठ लागू दिली नाही पाठ अटीचा पहिलवान मुठीनं खातो मेवा कुस्ती नेमिली कोण्या गावा… पैलवानाची तयारी, त्याची ऐट, त्याचा रुबाबदारपणा, त्याचा अजोडपणा, त्याचा खुराक या सगळ्यांचं वर्णन मोठ्या कौतुकानं ही स्त्री या ओव्यांमधून करते. कारण आधी सांगितल्याप्रमाणं तो पैलवान नात्याने तिचा कुणीतरी असतो. त्याचं तिला कौतुक असतं. त्यामुळं ती जात्यावर बसली की आपोआपच तिच्या मुखातून या कौतुकाच्या ओव्या बाहेर पडतात. त्या पैलवानाच्या कानावरही पडत असतात. त्यामुळं पैलवानाचा शिनभाग हलका होत असतो. शिवकाळापासून असे गावोगाव कुस्तीचे आखाडे तयार झालेले आहेत. गावोगावच्या कुस्तीच्या आखाड्यांना अशी खूप जुनी परंपरा आहे. त्याकाळी सतत होणाऱ्या परकीय आक्रमणांना तोंड देण्यासाठी शक्तीची साधना गरजेची होती. गावाच्या संरक्षणासाठीही ती आवश्यक होती. त्यामुळं पैलवानाच्या खुराकाची, तालमीची सोय त्याच्या घरून होत नसेल, तर गावकरी स्वत: ती करून देत असत. गावातला पैलवान ही केवळ त्याच्या घराची नव्हे, तर ती गावाचीही शोभा समजली जात असे. सगळा गाव आपल्या पैलवानावर जीव टाकायचा. त्यानं जिंकावं, आपल्या गावाचं नाव करावं, गावाचा अभिमान वाढवावा, असं सगळ्यांना वाटत असे. गावाला असा नावलौकिक मिळवून देणारे पैलवानही ही शान वाढवत असत. त्यामुळं ते जिंकून आले की हलगी वाजवून, खांद्यावर बसवून त्यांची मिरवणूक काढली जायची. त्यांचं कौतुक केलं जायचं. शिवकाळातच रामदास स्वामींनी गावोगाव हनुमान मंदिरांची स्थापना करून या शक्तीसाधनेला अध्यात्माचीही जोड मिळवून दिली. त्यामुळे हनुमंताचे मंदिर आणि कुस्तीचा आखाडा शेजारी शेजारी असत. आखाडा दूर असेल, तर तिथेच हनुमंताची मूर्ती बसवली जात असे. मूर्ती नाही बसवता आली, तर निदान हनुमंताची प्रतिमा तरी तेथे ठेवली जात असे. हनुमान हे ब्रह्मचर्याचे आणि शक्तीचे प्रतीक. त्यामुळे हनुमान जयंती झाली की गावोगाव कुस्त्यांचे फडही सुरू होत. त्या बरोबरीने तिथं हनुमान मंदिराच्या यात्राही सुरू होत असत. आताही त्या सगळीकडे सुरू झाल्या आहेत. गावोगावच्या जत्रांमध्ये जिंकणाऱ्या पैलवानांच्या बातम्याही आता वृत्तपत्रात येऊ लागल्या आहेत. या पैलवानांच्या कुस्तीच्या फडाला परिसरातली राजकारणी मंडळीही आधार देऊ लागले आहेत. पैलवानांनी कुस्त्या जिंकून आपल्या भागाचं नाव उंचवावं, म्हणून त्यांची व्यवस्थाही करतात. दुर्दैवाने, अलीकडे काही राजकारणी लोक आपल्या राखीव पैलवानांना गुंडगिरीकडंही वळवत असल्याचे दिसते. अशा गोष्टींमुळं आपलं वैभव असलेल्या पैलवानकीची शान वाढते का जाते, हे ज्याचं त्यांनी ठरवायला हवं. (संपर्कः inbhalerao@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments