- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Purvani Goshta Sangato Aika Written By Arvind Jagtap
अरविंद जगताप10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सोमवार उजाडला. दोन दिवसांत निशांतने वीस वेळा तरी बाइक पुसली होती. तरीही त्या दिवशी त्याने बाइक पुन्हा धुऊन काढली. अजून दहा वाजायला अर्धा तास अवकाश होता, तरी तो तिथं येऊन थांबला. दहा वाजता जान्हवी समोरून येताना दिसली. विनोद डोसेवाल्यापाशी जाऊन उभा राहिला. निशांतने बाइक सुरू केली. नवीन बाइक. सेकंदात पिकअप घेणारी. आवाज असा की रस्त्यातली सगळी माणसं बघायची. निशांत निघाला…
निशांतला बाइक घ्यायची होती. दोन लाखाची. थोडे पैसे टाकले की चांगली जुनी कार येईल, असं वडील म्हणत होते. पण, त्याला बाइक पाहिजे होती. एवढे पैसे टाकून पोराने बाइक घ्यावी, असं आईलाही वाटत नव्हतं. पण आईचं मन. आईने निशांतच्या वडिलांना कसंबसं राजी केलं. कर्ज घेऊन वडिलांनी त्याला बाइक घेऊन दिली. सगळ्या आई – वडिलांना वाटतं तसं निशांतच्या आई – वडिलांनाही वाटत होतं की, कॉलेजला जायला सोपं व्हावं म्हणून मुलानं बाइक घेतलीय. पण तसं नसतं नेहमी. निशांतचं जान्हवीवर प्रेम आहे. जान्हवीला इम्प्रेस करण्यासाठी तो नवे बूट, नवे शर्ट, नवा गॉगल असं काय काय करत असतो. पण, त्याच्या प्रयत्नांना अजून यश आलेलं नाही. जान्हवीचा एक आवडता इंग्रजी गायक आहे. त्यानं पूर्ण टक्कल केलंय, म्हणून निशांतने पण केलं होतं. जान्हवीने दखल घेतली नाही. पण, मित्रांनी विचारायला सुरूवात केली, घरी सगळं ठीक आहे ना? केस का कापले? उत्तर देता देता निशांत वैतागून गेला.
जान्हवीच्या मैत्रिणीने एकदा निशांतला सांगितलं की, तिला ती अमुक बाईक आवडते. लगेच निशांतच्या डोक्यात चक्र सुरू झालं. पण, किंमत ऐकून तो आधी हादरून गेला. घरी एवढे पैसे मागायची हिंमत नव्हती. त्याने मित्रांना आणि नातेवाइकांना पैसे उधार मागून बघितले. पैसे तर आले नाही, पण आपली काही किंमत नाही, हे त्याच्या लक्षात आलं. पण काहीही करून बाइक घ्यायचीच, हे त्यानं ठरवून टाकलं. गेले दोन – तीन महिने निशांतने ती बाइक घ्यायची म्हणून घरच्यांना हैराण करून टाकलं होतं. वडिलांनी खूप समजावून बघितलं. दोन – तीन वेगळ्या बाइक दाखवल्या, पण निशांतला तीच दोन लाखाची बाइक पाहिजे होती. शेवटी दोन वर्षे कंपनीत ओव्हरटाइम करायची तयारी ठेऊन वडिलांनी कर्ज काढलं. नवीन बाइक घेतली. वडिलांना वाटलं बाइकवर बसवून पोरगा कंपनीत सोडेल. पण, कंपनीच्या रस्त्यात खूप चिखल असतो, म्हणून निशांतने त्या रस्त्यावर आपण बाइक नेणार नाही, हे स्पष्ट सांगून टाकलं. बाप चिखलातून गेला तरी चालतं, पण बाइक चिखलातून गेली नाही पाहिजे. बापाला वाईट वाटलं. पण, आज ना उद्या पोराला जबाबदारीची जाणीव होईल, ही वेडी आशा मनात ठेऊन ते कामावर गेले.
बाइक आली तो दिवस शुक्रवार. पुढं दोन दिवस कॉलेजला सुटी. आता जान्हवी थेट सोमवारीच कॉलेजला येणार, तेव्हाच ती आपली बाइक बघणार. कॉलेजसमोरच्या डोसेवाल्याकडे जान्हवी दहा वाजता मैत्रिणीसोबत जाते. ती एक कन्फर्म वेळ आहे. सोमवारी त्यावेळी बाइक घेऊन चक्कर मारायची. निशांतचा मित्र विनोद डोसेवाल्यापाशी थांबणार होता. निशांतची बाइक गेल्यावर जान्हवीची प्रतिक्रिया काय होती, ती काय म्हणाली, ते विनोद सांगणार होता. त्या क्षणासाठी, त्या प्रतिक्रियेसाठी निशांत आतुर झाला होता. कधी सोमवार येतो, कधी आपण हॉर्न वाजवत गाडी रेज करून डोसेवाल्यासमोरून घेऊन जातो, असं झालं होतं त्याला. खरं तर समोरचं चाक हवेत वर करून बाइक चालवायची होती त्याला. पण, तेवढा सराव झाला नव्हता.
सोमवार उजाडला. दोन दिवसांत निशांतने वीस वेळा तरी बाइक पुसली होती. तरीही त्या दिवशी त्याने बाइक पुन्हा धुऊन काढली. अजून दहा वाजायला अर्धा तास अवकाश होता, तरी तो तिथं येऊन थांबला. दहा वाजता जान्हवी समोरून येताना दिसली. विनोद डोसेवाल्यापाशी जाऊन उभा राहिला. निशांतने बाइक सुरू केली. नवीन बाइक. सेकंदात पिकअप घेणारी. आवाज असा की रस्त्यातली सगळी माणसं बघायची. निशांत निघाला. जान्हवी त्याच्याकडं बघत नव्हती. ती मैत्रिणीसोबत डोसा तयार व्हायची वाट बघत होती. निशांतने लक्ष वेधून घेण्यासाठी गाडी रेज केली. क्षणात जोरदार आवाज झाला. आसपासच्या सगळ्या लोकांनी दचकून पाहिलं. निशांतची गाडी खूप पुढं निघून गेली. लोक बघत राहिले.
डोसा विकणारा त्या आवाजाने दचकला होता. आधीच तो गर्मीने हैराण. त्यात गरम तव्यापुढे उभा. डोसावाला साउथचा होता. त्याने त्याच्या विशिष्ट शैलीत शिवी हासडली. त्याच्याच दुकानावर डोसा खायला एक प्राध्यापक बाई उभ्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘या बाइकवाल्यांच्या आईबापाला तुरुंगात टाकलं पाहिजे..’ निशांत गाडी घेऊन गेला तिथं एक गरीब म्हातारा बसतो. चप्पल शिवतो. त्याला तर अशा मोठ्याने आवाज करणाऱ्या बाइकचा खूप राग येतो. तो म्हणाला, ‘बापाला जास्त झालंय सालं..’ रस्त्याच्या कडेला एक बाई बोरं आणि चिंचा घेऊन बसते. त्याच रस्त्यानं शाळेची मुलं पण जातात म्हणून. बाइकचा आवाज ऐकून ती बाई म्हणाली, ‘…मरत पण नाहीत मेले.’ त्याच कॉलेजमध्ये शिपाई असलेले मनोहरकाका सायकलने चालले होते. निशांतची बाइक जोरात त्यांच्या शेजारून गेली होती. घाबरून गेले होते मनोहरकाका. जोरात ओरडले, ‘हळू चालव ना xxx.’ मनोहरकाका क्षणभर थांबले होते. वय झाल्यानं आजकाल त्यांचा जीव घाबराघुबरा होतो. त्याच रस्त्यानं शाळेतल्या दोन मुली चाललेल्या होत्या. त्या रस्ता क्रॉस करणार होत्या. पण, एवढ्या वेगात निशांतची बाइक समोरून गेल्यामुळं दोघी घाबरून गेल्या. त्यांच्यातली एक मुलगी जोरात ओरडली.. ‘इडियट!’ त्याच रस्त्यानं दोन वयोवृद्ध माणसं काहीतरी बोलत चाललेली होती. ते आवाजाने वैतागले. त्यांच्यातला एकजण म्हणाला, ‘लाखाची बाइक वापरू देतात पालक. पण, हजार रुपयाचं हेल्मेट वापरायला शिकवत नाहीत. मरायला सोडून देतात पोरांना रस्त्यावर..’ निशांतची बाइक गेली त्या शंभर फूट अंतरात किमान पन्नास लोकांना त्याचा भयंकर राग आला होता. एक तर शाळा – कॉलेजचा परिसर. गर्दीची वेळ. आधीच गोंगाट. त्यात वर असा कर्कश्श आवाज. कसा सहन होईल? कुणाला सहन होईल? पण, त्या परिसरात तरुण मुलं असे आवाज करत बाइक चालवत असतात. निशांतने जानव्हीला इम्प्रेस करण्यासाठी एवढा अट्टाहास केला होता.
दोन लाख रुपयांची बाइक. आई – वडील विचार करत होते की, आपण आपल्या मुलाला खूप मोठा आनंद मिळवून दिला. निशांतने बाईकच्या मागे Dad’s Gift असं रंगवून घेतलं होतं. पण, प्रत्यक्षात दोन लाखाच्या बाइकने काय दिलं होतं? कारमध्ये म्युझिक ऐकत बसलेले दोन मित्र त्या आवाजाने वैतागले होते. निशांतच्या बाइककडे बघत त्यांच्यातला एकजण म्हणाला, ‘ह्याच्या बापाला पैसे जास्त झालेत का पोरगा जास्त झालाय?’ हे ऐकून दुसरा हसला. डोसेवाल्याकडं प्लेट विसळायला एक बाई होती. घाबरून तिनं प्लेट आपटली. बाईकचा आवाज ऐकून. म्हणाली, ‘मेला मुडदा! उलथल बघा एक दिवस. उचलायला सुद्धा कुणी यायचं नाही..’
हे मोजके आवाज. मोजके उद्गार. आणखीही खूप काही बोलले होते लोक. जोरात हॉर्न किंवा कर्कश्श आवाज ऐकून बोलत असतात लोक. पण निशांत..? त्याचा फोन वाजला. काहीच वेळात. विनोदचा फोन होता. निशांतने विचारलं, ‘तिने पाहिलं? काय म्हणाली ती? सांग ना पटकन्..’ विनोद काही बोलत नव्हता. निशांतचा संयम संपला होता. तो ओरडला, ‘अरे, सांग ना लवकर.. काय म्हणाली ती..? विनोदने सांगितलं, ‘बास्टर्ड!’ जान्हवी एवढा एकच शब्द म्हणाली होती.. बास्टर्ड!
(संपर्क – jarvindas30@gmail.com )







