अरविंद जगताप10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
शशीचा सायबर कॅफे अजूनही होता. फक्त त्यावर ‘गाळा भाड्याने देणे आहे’ अशी पाटी होती. वृंदाने विचार केला की, हा गाळा तर शशीचाच आहे. मग भाड्याने का द्यायचाय?
वृंदा कारमधून उतरली आणि खूप वेळ त्या दोन मजली इमारतीकडे बघत राहिली. दहा वर्षांपूर्वी तालुक्यातली ती एकमेव भारी इमारत होती. शॉपिंग कॉम्प्लेक्स. जवळपास रोज यायची वृंदा तिथं. त्याच इमारतीत सायबर कॅफे होता. तिथे येऊन रोज वेगवेगळ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करणे एवढंच काम ती करायची. घरची परिस्थिती गरीब. वडील पेट्रोल पंपावर कामाला. आई एका हॉटेलात भाकरी थापायची. घरातल्या कामांमुळे वृंदा फार शिकली नाही. बारावीनंतर काम शोधू लागली. बऱ्याच कंपन्यात अर्ज केल्यावर लक्षात आलं, एवढ्याशा शिक्षणावर नोकरी मिळणार नाही. आणि तालुक्यात नोकरी मिळाली तरी त्यात काही भागणार नाही. मैत्रीण पुण्यात होती. तिच्याकडून माहिती कळली आणि वृंदाने पुण्यातल्या कंपन्यांमध्ये अर्ज करायचा धडाका लावला. उत्तर काही येत नव्हतं.
सायबर कॅफेवाला शशी हळूहळू तिला बघून हसू लागला. वैतागू लागला. कारण वृंदा तासाचे पैसे द्यायची नाही. तिला काही चॅटिंग करायचं नव्हतं. अर्ज करायचा आणि निघून जायचं. शशीकडे असं कुणी यायचं नाही. तो खूपदा त्याच्याच समोरच्या पीसीवरून अर्ज भरून द्यायचा. खरं तर कंपनीचं नाव बदलायचं असायचं दरवेळी. पण, सायबर कॅफेत एवढी गर्दी असायची की शशीला असले गिऱ्हाईक नको वाटायचे. त्यात वृंदा दिसायला अगदी साधी. नाकीडोळी नीट असली तरी जुनाट ड्रेस. केस चोपून बसवलेले. सायबर कॅफे चालवणाऱ्या शशीला ती कशी सुंदर वाटणार? तो दर दहा मिनिटाला जेनिफर लोपेझ आणि अँजेलिना जोली बघायचा पीसीवर. त्यानं वृंदाकडे बरं बघायची शक्यता नव्हतीच. वृंदा आता त्या इमारतीत शिरली. खूप बदल झाले होते. अर्थात, त्या काळी नवीन वाटणारी इमारत आता खंगलेली दिसत होती. खूप जुनी दुकानं गायब होती. शशीचा सायबर कॅफे अजूनही होता. फक्त त्यावर ‘गाळा भाड्याने देणे आहे’ अशी पाटी होती. वृंदाने विचार केला की, हा गाळा तर शशीचाच आहे. मग भाड्याने का द्यायचाय? ती आत गेली. आत शशी बसायचा ते टेबल तसंच होतं. त्यावरचा मोठा पीसी, मागे असलेली साईबाबांची प्रतिमा, ती त्या काळी पॉश वाटणारी खुर्ची आता पार बुरशी लागल्यासारखी झाली होती. एकेकाळी सतत गर्दी आणि आपला नंबर कधी येतो याची वाट बघत बाहेर बसलेले चार-पाच तरुण असायचे. आता त्या कॅफेत कुणीही नव्हतं. तेव्हा सहा – सात पीसी होते. आता दोनच दिसत होते. एक शशीच्या टेबलवर आणि एक बाजूला ठेवलेला. वृंदाला ते दृश्य बघून अस्वस्थ वाटू लागलं. त्या कॉम्प्युटरने कधीही विचार केला नसेल की, आपण अचानक असे एकाकी होऊ. वृंदा त्या कॉम्प्युटरजवळ गेली. त्याच्या कीबोर्डवर स्पष्ट खुणा होत्या. एकेकाळी त्याचा खूप वापर झाल्याच्या. काही ठरावीक अक्षरं जास्त उगाळले गेलेले दिसत होते. पण, की बोर्डवर साचलेली धूळ सांगत होती की, अशात त्याचा वापर झालेला नाही. आधी इथे केबिन होत्या. आता त्यांचे अवशेष बाकी होते. एखादी भग्न इमारत असल्यासारखा दिसत होता कॅफे. तिथं तालुक्यातली सगळी तरुणाई असायची दिवसभर. आता कॅफे म्हातारा झाल्यासारखा दिसत होता. अवघ्या दहा वर्षांत निस्तेज झालेला. कोमात गेल्यासारखा. खरं तर वृंदा खास त्या कॅफेला भेट द्यायला उत्साहात आली होती. पण, आता एखाद्या पेशंटला बघायला आल्यासारखं तिला वाटू लागलं.
चार वर्षं ती तालुक्यात आलीच नव्हती. शक्यच नव्हतं. त्याच कॅफेतून केलेल्या असंख्य अर्जातल्या एका अर्जाने तिचं नशीब बदललं होतं. तो अर्ज तिला आजही ठळकपणे आठवत होता… पैसे नव्हते. तिनं नेहमीसारखी शशीला विनंती केली. शशी चांगलाच चिडला होता. त्यानं वृंदाला सांगितलं होतं, ‘मी तुझे अर्ज भरायला कॅफे काढला नाही. इथून पुढं यायचं असंल तर अर्ध्या तासाचे पैसे द्यायचे. नाहीतर यायचं नाही.’ शशी रागात जरा मोठ्यानं बोलत होता. आजूबाजूला उभे लोक वृंदाकडं बघत होते. काही मुलांनी केबिनमधून डोकावून बघितलं. वृंदा खूप अपमानित झाली. पण, काही बोलली नाही. मनोमन ठरवून टाकलं की, पुन्हा यायचं नाही. पुन्हा अर्ज पाठवायचा नाही. तो अर्ज पाठवून ती निघू लागली. शशी आता जरा नरमला. तिला म्हणाला, ‘मी पण बारावी पास आहे. मला माहितीय बारावी पासवर नोकरी भेटत नाही. मी बघ कसा व्यवसाय सुरू केला. मला माहितीय भांडवल नाही तुझ्याकडं. पण, नोकरी कर. माझ्या कॅफेत येऊन रोज झाडलोट कर. मी पैसे देतो..’ शशी गोड बोलत होता. पण, ते जास्तच त्रासदायक होतं. वृंदा काही न बोलता निघून गेली.
चार वर्षं झाली त्या गोष्टीला. एका आठवड्यात तिनं दिलेल्या नंबरवर फोन आला. तिला नोकरी मिळाली होती. साडीची कंपनी होती. पुण्यातल्या एका आजीने सुरू केलेली. त्यांना पार्सल पाठवायला आणि हिशेब ठेवायला वृंदासारखीच साधी मुलगी पाहिजे होती. वृंदाने ते काम मन लावून केलं. आजीपेक्षा त्यांचा नातू जास्त खुश झाला. थेट लग्नच केलं त्याने वृंदाशी. वृंदा मालकीणबाई झाली. कंपनी आज एक मोठा ब्रँड आहे. वृंदाने आई-वडिलांना तिकडंच बोलावून घेतलं. पण, त्यांचं मन रमत नाही. लेकीच्या घरी राहायला नको वाटतं. आता वृंदाने त्यांना तालुक्यात नवीन घर बांधून द्यायचं ठरवलंय. त्यासाठीच आलीय.
आलोच आहोत तर एकदा कॅफेत जावं असा विचार केला. काहीही झालं तरी त्या अर्जाने नशीब बदलून टाकलं होतं तिचं. शशीला खास पेढे द्यायला आली होती ती. आणि एका पाकिटात काही पैसे. त्या काळी देऊ न शकलेली. पण, शशी दिसतंच नव्हता. तिला वाटलं, कदाचित शशीने कॅफे सोडून दिला असावा. तिला वाईट वाटलं. ती जायला निघाली. अचानक शशी आतून आला. त्याला बघून वृंदाला आनंद झाला. काही क्षण. शशी एकदमच वय झाल्यासारखा दिसत होता. निराश. तिला म्हणाला, ‘तू आलीस हे आधीच बघितलं होतं. पण, लुंगी-बनियनवर होतो. म्हणून आत जाऊन कपडे बदलून आलो.’ शशी बोलत राहिला.. तो ऑनलाइन वाचत असतो वृंदाबद्दल, त्याला खूप अभिमान वाटतो.. वगैरे वगैरे.. आणि असं म्हणून त्याने एक पाकीट वृंदाकडं दिलं. ‘चहा सांगतो’ म्हणून तो गेला. वृंदा पाकीट उघडून बघू लागली. शशीने तिच्या कंपनीत नोकरीसाठी केलेला अर्ज होता. वृंदा पुन्हा पुन्हा वाचत राहिली. तिला या कॅफेत फक्त अर्ज भरायला यायची सवय होती…
(संपर्क – jarvindas30@gmail.com)







