खलनिग्रहणाय: प्रभावी पोलिसिंगसाठी नवतंत्रज्ञान

0
4
खलनिग्रहणाय:  प्रभावी पोलिसिंगसाठी नवतंत्रज्ञान


  • Marathi News
  • Opinion
  • New Technology For Effective Policing Rasik Article By Dr. Bhushan Kumar Upadhyay

डॉ. भूषणकुमार उपाध्याय1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

सध्या आपले आयुष्य बऱ्याच प्रमाणात तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. तंत्रज्ञानामुळे रोजचे जगणे अधिक सुलभ, सुविधापूर्ण झाले आहे. मात्र त्याचवेळी, वाढते शहरीकरण, चंगळवाद, जागतिकीकरणाचा प्रभाव, आयुष्याची बदलती मूल्ये यांमुळे सामाजिक आणि व्यक्तिगत सुरक्षेचा प्रश्नही जटिल झाला आहे. महिलांची सुरक्षा हा तर अत्यंत संवेदनशील मुद्दा बनला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबतही अशीच स्थिती आहे.

मानवी तस्करीचा भस्मासूर आ वासून उभा आहे. सायबर गुन्हेगारांनीही उच्छाद मांडला आहे. अशा परिस्थितीत परंपरागत पोलिसिंग फारसे उपयोगी ठरणार नाही. गुन्ह्यांचे बदलते स्वरुप आणि नवी आव्हाने पेलण्यासाठी पोलिसिंगच्या सर्व भागांमध्ये नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे.

सीसीटीव्ही यंत्रणेचा विस्तार
सीसीटीव्ही कॅमरे आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञान गुन्हेगारी नियंत्रणामध्ये तसेच गुन्ह्यांच्या तपासात अत्यंत उपयुक्त सिद्ध झाले आहे. सर्व प्रगत देशांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तुलनेने अधिक प्रमाणात आणि परिपूर्ण वापर केला होत आहे. आपल्याकडील मोठ्या, मध्यम आणि लहान शहरांत सार्वजनिक ठिकाणे, चौक आणि रस्त्यांवर पोलिसांकडून असे कॅमरे लावण्यात आले आहेत. त्याशिवाय, शासकीय विभाग, सार्वजनिक तसेच सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, थिएटर, मॉल, हॉटेलांपासून लहान-मोठ्या व्यावसायिकांपर्यंत अनेकांनी आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. ही सुविधा पोलिस आणि वाहतूक शाखेला अपघात, गुन्ह्यांच्या तपासासाठी उपयोगी पडत आहे. त्याचप्रमाणे, काही दुर्घटना घडल्यास वा आपत्ती आल्यास महापालिका तसेच अन्य विभागांसाठीही उपयुक्त ठरते आहे. दुसरीकडे, देशातील सर्व पोलिस ठाण्यांतही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीत बरीच पारदर्शकता आली आहे. शिवाय, कोठडीतील मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. तथापि, या यंत्रणेचा आणखी विस्तार होण्याची आणि ती अधिक अद्ययावत व कार्यक्षम बनवण्याची गरज आहे. शहरांमधील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे एकाच यंत्रणेला जोडून एक कार्यक्षम व्यवस्था विकसित केली पाहिजे.

ड्रोन प्रणालीचा प्रभावी वापर
अलीकडत्या काळात ड्रोनचा वापरही अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. पोलिसांसाठी तर ड्रोन तंत्रज्ञान खूप फायदेशीर आहे. गर्दीवरील नियंत्रणासाठी तसेच गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासाठी, संवेदनशील भागात गस्त ठेवण्यासाठी तसेच आपत्तीच्या काळात ड्रोनचा वापर उपयुक्त ठरतो. काही देशांमध्ये हे तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरले जात आहे. मात्र, आपल्याकडे अजूनही पोलिस दलात आवश्यक त्या प्रमाणात त्यांचा वापर होत नाही. त्यासाठी गृह विभागाने विशेष तरतूद करुन लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक पोलिस स्टेशनला ड्रोन तंत्रज्ञान आणि त्यासाठीचे प्रशिक्षण उपलब्ध करुन द्यायला हवे.

फॉरेन्सिक लॅबचा विस्तार
गेल्या काही वर्षात न्यायवैद्यक शास्त्रात (फॉरेन्सिक सायन्स) आणि या क्षेत्रातील तंत्रज्ञानात खूप प्रगती झाली आहे. गुन्हे सिद्ध करण्यात फॉरेन्सिकचा वाटा मोठा असतो. बहुतांश गंभीर आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल या शास्त्राच्या मदतीने होते. आपल्याकडे फॉरेन्सिक सायन्स लॅब असल्या, तरी त्या मोठ्या किंवा विभागीय मुख्यालयाच्या शहरांमध्ये असतात. अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे ग्रामीण, दुर्गम भागात घडतात. अशा वेळी बऱ्याचदा दूरवरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठीचे पुरावे पोहोचण्यात आणि त्यांचा अहवाल येण्यात वेळ जातो. त्यामुळे अशा प्रयोगशाळा तालुका स्तरापर्यंत वाढवण्याची आणि तेथे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे.

डिजिटल ॲनालिसिस टूल्स
सध्या विविध क्षेत्रांत काम सुलभ होण्यासाठी माहिती अथवा डेटाचे विश्लेषण केले जाते. त्यासाठी अनेक डिजिटल अॅनालिसिस टूल्स उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करुन एखादी व्यक्ती, राजकीय पक्ष, उद्योग, संस्था वा संघटनेसाठी डेटा गोळा करुन त्याचे विश्लेषण केले जाते. धोरण किंवा रणनीती ठरवण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पोलिस दलाचे काम बहुआयामी आहे. त्यामुळे डेटा गोळा करण्यापासून ते त्याचे विश्लेषण करुन निर्णय घेण्यापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये अशा टूल्सचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो.

अत्याधुनिक शस्त्रे, संपर्क साधने
गुन्ह्यांचे बदलते स्वरुप आणि त्यात वापरली जाणारी शस्त्रे पाहता, पोलिसांकडेही अत्याधुनिक शस्त्रे आणि त्यांचे प्रशिक्षण असण्याची आवश्यकता आहे. संपर्क यंत्रणा किंवा दळणवळण सुविधा हा तर पोलिस दलाचा कणा आहे. कार्यक्षम आणि प्रभावी दळणवळण यंत्रणेवर पोलिसांची कामगिरी अवलंबून असते. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या संपर्क साधनांची उपलब्धता, त्यांचा योग्य वापर आणि त्यासाठीचे प्रशिक्षण ही प्रभावी पोलिसिंगसाठी महत्त्वाची गरज बनली आहे. पोलिसांच्या वापरातील वाहनेही आधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज असावीत. नव्या काळातील गुन्हे नियंत्रण आणि तपासामध्ये या सर्व गोष्टींना खूप महत्त्व आले आहे.

गुन्हे थांबवण्यापासून ते त्यांचे प्रकटीकरण आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर पोलिसांसाठी तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य आहे. केंद्र सरकारने लागू गेलेल्या तीन नव्य कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर अपेक्षित आहे. पण, त्यासाठी तितकीच सक्षम आणि परिपूर्ण यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. तसे झाले तरच आपले पोलिसिंग अधिक प्रभावी ठरू शकेल.

प्रेडिक्टिव्ह पोलिसिंगचे महत्त्व
नवतंत्रज्ञानाच्या वापराने पोलिसिंग आणि पोलिसांपुढचे अनेक प्रश्न सोडवता येतील. त्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) चांगला उपयोग होऊ शकतो. गुन्ह्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी ‘प्रेडिक्टिव्ह पोलिसिंग’ आवश्यक आहे. त्याद्वारे उपलब्ध डेटाच्या आधारे संभाव्य घटना अथवा गुन्ह्यांची नेमकी माहिती मिळू शकते. जगातील अनेक प्रगत देशांमध्ये अशा प्रकारचे पोलिसिंग उपयुक्त ठरले आहे. विशेषत: सराईत गुन्हेगारांबाबत उपलब्ध असलेल्या डेटाच्या आधारे त्यांच्यावर नजर ठेवता येते, त्यातून संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. पॅरोल आणि फर्लोवर तुरुंगाबाहेर आलेल्या गुन्हेगारांवरही लक्ष ठेवता येते. अनेक देशांमध्ये अशा निगराणीसाठीही नव्या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला जात आहे.

(संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)



Source link