हेमकिरण पत्की7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आपणा सर्वांसाठी ‘धन’ हे एक विनियोगाचं, जीवन – व्यवहाराचं साधन असतं. याचा अर्थ असा की, जगण्यासाठी आवश्यक वस्तू आपल्याला बाजारातून विकत घ्याव्या लागतात. त्यासाठी किंमत मोजावी लागते. जवळचं ‘धन’ खर्च करावं लागतं. कुठल्याही माणसाला हे धन कष्टाशिवाय मिळत नाही. त्याला हे कष्ट जगाच्या पाठीवर कुठंही जाऊन करावे लागतात. धन मिळविण्यासाठी कला लागते, कौशल्य लागतं. आपल्याला या गोष्टीचं सामान्य ज्ञान असतं. पण, ‘धन’ म्हणजे काय, हे खरंच कधी वस्तुनिष्ठपणे जाणवतं का?
आयुष्यातील धनाचं खरं स्थान, महत्त्व आणि त्याचं साधनमूल्य उमजतं का? पैसे जमवणं, सोन्या – चांदीचे दागिने गोळा करणं, स्थावर उभं करणं एवढंच ‘धन’ असतं का? आपल्या मनानं निर्माण केलेल्या जगाच्या परिभाषेत हे ‘धन’ असेल, पण मनानं निर्माण केलेली वस्तू ‘धन’ असते का, हे संतांनी वारंवार प्रश्नांकित केलं आहे. कबीर आपल्या या धनप्राप्तीच्या विचार – वृत्तीचा सहज वेध घेतात. आपल्या धनलाभाच्या आसक्तीचा, धनसंचय करण्याच्या वृत्तीचा, प्रसंगी अमानुष होण्याच्या मनाच्या स्थितीचा ते दोह्यांतून सांकेतिक उच्चार करतात…
आसा जीवै जग मरे, लोक मरै मरि जाय। धन संचै ते भी मरे, उंबरे सो धन खाय।।
या जगातली कुठली गोष्ट जगाच्या अखेरपर्यंत राहणारी असते? कुठलीच नव्हे. जी जन्माला येते, ती नष्ट होणारी असते. आपलं मन मोठं आशाळभूत असतं. ही आशाळभूत वृत्तीच सदा जिवंत राहते. धनामागे धावून ते गोळा करणारे, योग्य मार्गाने ते मिळवणारे किंवा इतरांच्या सुखांना ओरबाडून धनवान झालेले लोक अशा सगळ्या जणांना अखेर मृत्यू येतो. मात्र, धन मिळवणाऱ्यांच्या मागं उरलेले लोक त्या धनाचा लाभ घेतात. आपण ‘धना’चं खरं मोल जाणत नाही. उद्याची तजवीज आणि तरतूद या दृष्टीनं धनाचा संचय करत राहतो. हे संचय करणं मानसिक असुरक्षिततेतून घडत असतं. हे आपण स्वस्थपणे कधी जाणून घेतो का? ही आपली संचयी वृत्ती आपल्याला जीवनाच्या बोधापासून आनंदापासून दूर दूर नेते, याची जाणीव तरी कधी तीव्रतेनं आपल्याला होते का? मग देवाच्या सान्निध्यासाठी लागणारं इंद्रियांचं स्वाभाविक वळण आपल्यात कसं येणार? कबीरांना आपल्याला खऱ्या ‘धना’ची परिभाषा तळमळीनं समजून सांगायची आहे. आपण ज्याचा जीवन व्यवहाराचं साधन म्हणून उपयोग करतो, ते फक्त मनुष्यनिर्मित साधन असतं. कबीरांच्या दृष्टीनं धनाचा आशय वेगळा आहे. ते म्हणतात… गो धन गज धन बाजि धन, और रतन धन खान। जब आवै संतोष धन, सब धन धुरि समान।। गाय, हत्ती, घोडे आणि अनेक रत्नांची खाण हे धनच आहे. पण, एक आनंदधन प्राप्त झाल्यावर इतर सर्व धन धुळीसमान होऊन जातं. आनंदरूपी धन थोडंच आपल्याबाहेर असतं! आपण अवलंबून असतो त्या वस्तूंमध्ये ते कुठं असतं? ते धन देहभावाच्या, मनोभावाच्या पलीकडं असलेल्या आपल्या अंतर्दृष्टीत असतं. ते कुणीच हिरावून, चोरून नेऊ शकत नाही; काळही त्याला नष्ट करू शकत नाही.
आनंदधन आपल्या दृष्टीत, जाणिवेत यावं आणि आपण आपल्या रोजच्या व्यवहारात सजग व्हावं, यासाठीच कबीर आपल्या या दोह्यातून सांगतात… कबीर सो धन संचिये, जो आगे का होय। सीस चढावै गाठरी, जात न देखा कोय।। कबीर म्हणतात, जे आपल्याला पूर्वसंचित म्हणून उपयोगी पडतं असं धनच गोळा करावं. या जगात द्रव्याचं गाठोडं बांधून, ते डोक्यावर घेऊन इहलोकातून परलोकी जाताना कुणी दिसत नाही. ते धन जमा करण्यासाठी वेचलेला काळ, कष्ट यांचं अखेरीस काय होतं?
आपण आपल्यावर प्रेम करतो ही स्वाभाविक गोष्ट असते. पण, स्वतःवरच्या प्रेमासाठी आपण आपल्या अस्तित्वमुळांशी विपरित असलेल्या कितीतरी गोष्टींवरही प्रेम करत असतो. उदाहरणार्थ, आपण धनाच्या विवेक आणि तारतम्य हरवलेल्या संचयवृत्तीवर प्रेम करत असतो आणि हे आपल्या मूलभूत जगण्याच्या गतीविरुद्ध असतं. कारण धन जड असतं आणि आपण चैतन्य असतो. जडावर प्रेम करता करता आपल्यातलं चैतन्य जाणिवेत येत नाही. आपली चराचराविषयी असलेली संवेदना संकोच पावत जाते, याचा बोधही होणं मग हळूहळू कमी होत जातं.
आपण धनाची पूजा करतो. ही पूजा प्रतिकात्मक असते. प्रतिकांच्या पलीकडं जाऊन आपण खऱ्या धनाच्या बोधाला प्राप्त होऊ तेव्हा आपल्या ध्यानात येईल की, शाश्वत धन आपल्या चैतन्यशील असण्यात आहे; चेतनेच्या सर्वात्मकतेत आहे. फक्त गरजा भागवण्यासाठी धन कमावण्याच्या आणि व्यक्तिगत भोगसुख घेण्याच्या या काळात कबीरांची ‘धना’ची ही आध्यात्मिक परिभाषा आपल्यासाठी आजही व्यवहार्य आहे.
(संपर्क – hemkiranpatki@gmail.com)







