एन. रघुरामन यांचा कॉलम: प्रत्येक कामात परिपूर्णतेचा शोध घेणे हा एक वैयक्तिक विचार

0
13
एन. रघुरामन यांचा कॉलम:  प्रत्येक कामात परिपूर्णतेचा शोध घेणे हा एक वैयक्तिक विचार


  • Marathi News
  • Opinion
  • N. Raghuram’s Column, Finding Perfection In Every Work Is A Personal Thought

2 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये फिल्टर कॉफीसाठी वापरले जाणारे ‘डबरा’ (वाटी) आणि ‘टम्बलर’ (पेला) आठवतात? तेच ‘डबरा’ घरी माझ्या पहिल्या इस्त्रीच्या वर्गासाठी सर्वात महत्त्वाचे साधन होते. माझ्या शिक्षिका माझ्या आई होत्या. त्यांनी गरम, धगधगणाऱ्या कोळशांनी किंचित भरलेले ‘डबरा’ सांडशीच्या मदतीने धरले होते. ही आमची तात्पुरती इस्त्री होती. वडिलांना एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचे होते आणि ते तयार होत असताना आईला त्यांच्या शर्टाला कडक इस्त्री करायची होती. मी त्यांचा सहायक होतो.

त्यांनी कॉलरने सुरुवात केली. मग एक-एक करून बाह्यांना इस्त्री केली, पूर्ण काळजी घेऊन, जेणेकरून एकही जास्तीची सुरकुती राहू नये. त्यानंतर शर्टाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या प्लेट्स सांभाळत इस्त्री केली. त्या काळात वडिलांकडे तो एकच शर्ट होता, जो माझ्या आईच्या भावाने परदेशातून आणला होता आणि त्याच्या पाठीमागे मध्यभागी ती प्लेट होती. मग त्या पुढील भागांवर, शर्ट अगदी चांगल्या प्रकारे इस्त्री केलेला दिसेपर्यंत, आळीपाळीने इस्त्री करत असत. वडिलांना त्यांच्या पॅन्टच्या क्रीजचीही खूप काळजी असे. पॅन्टवर एक धारदार टोक त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे होते, त्या लोकांपेक्षा वेगळे, ज्यांच्या पॅन्टवर जागोजागी सुरकुत्या दिसत आणि जे खराब इस्त्रीचे परिणाम होते.

आमच्या घरी कधीच इस्त्री नव्हती, ना इस्त्री करण्यासाठी कोणते फॅन्सी बोर्ड होते. इस्त्री करण्यासाठी आम्ही नेहमी व्हरांड्यातील एका उंच पायरीचा उपयोग करत असू आणि त्यावर काही दरी (जाड कापड) किंवा चादरी व्यवस्थित दुमडून अंथरत असू. घरात जेवणाचे टेबल नव्हते, ना अभ्यासाचे. प्रत्येक काम जमिनीवर बसूनच केले जाई. कधी-कधी आई मला माझा शाळेचा गणवेश इस्त्री करू देत असे, जेणेकरून मी हे काम शिकू शकेन. पण माझे अनुभवहीन हात ती “सिंगल क्रीज’ मिळवण्यासाठी धडपडत राहत आणि मी गडबड करत असे. तेव्हा त्या मला पुन्हा इस्त्री करून दाखवत की ते व्यवस्थित कसे करायचे. पण ती “सिंगल क्रीज’ आणि कडक इस्त्री केलेल्या शर्टाची कल्पना माझ्या मनात घर करून गेली होती. शर्टाच्या दोन बटणांच्या मध्ये ‘डबरा’ फिरवणे ही एक कला होती, ज्यामुळे हाताच्या कुशल वापरामुळे सुरकुत्या मिटवल्या जात. शर्टाचा तो पुढील भाग, जिथे बटणांसाठी छिद्रे असत, त्याला इस्त्री करणे सोपे होते. याच्या तुलनेत बटणांच्या भागावर काम करणे कठीण होते. त्या फिकट निळ्या शर्टाच्या प्रत्येक बटणाच्या आजूबाजूला ‘डबरा’ हळुवारपणे, सुनियोजित पद्धतीने फिरवून शर्टाला एकदम स्वच्छ, कुरकुरीत रूप देण्याची ती कलादेखील माझ्या मनात राहिली.

मी नेहमी विचार करत असे की जेव्हा शर्टाची बटणे लावल्यावर तो भाग पुन्हा सुरकुत्यांनी भरून जाणार आहे, तर त्याला इतक्या मेहनतीने इस्त्री करण्याची काय गरज आहे. पण माझ्या आई-वडिलांसाठी परिपूर्णता हा एक वैयक्तिक विचार होता. आई चांगल्या प्रकारे इस्त्री केलेली सुती साडी परिधान करत असे आणि तिच्या साडीच्या प्लेट्स इतक्या अचूक असत की, जर त्यांना स्केलने मोजले तर त्या सर्व अगदी एकसारख्या निघतील. साडीची सरळ उभी प्लेट आणि वडिलांच्या शर्टातील खांद्यापासून कोपरापर्यंतची अचूक क्रीज – हे तपशील आजही काही जुन्या फोटोंमध्ये नोंदलेले आहेत आणि मी त्यांना वारंवार न्याहाळत असतो. ही स्टाइल केवळ त्यांना अभिमानाने भरत नव्हती, तर जेव्हा रस्त्यांवर कुणी त्यांच्याकडे टक लावून पाहत असे, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसूदेखील आणत असे. जर वडिलांसाठी पॅन्ट आणि शर्टाची अगदी सरळ क्रीज असलेले, चकाकणारे बूट आवश्यक होते, तर आई फिकट रंगाची सुती साडी व्यवस्थित परिधान करणे पसंत करत असे आणि पावडर लावलेल्या चेहऱ्यावर कुंकवाची गोल टिकली (बिंदी) लावत असे. त्या तयार टिकलीचा (रेडीमेड बिंदीचा) वापर करत नसत. त्यांनी मला हे शिकवले की जीवनात जे काही कराल, ते चांगल्यात चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या मोबाईलवर हा कॉलम ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.



Source link