
Childhood Respiratory Infection Can Lead To Asthma Risk: लहान वयात वारंवार होणारे श्वसनाचे संसर्ग (Respiratory Infections) हे भविष्यात अस्थमाचा धोका दुप्पट करतात, असे एका संशोधनातून समोर आले आहे. 5 वर्षांखालील मुलांना आरएसव्ही (Respiratory Syncytial Virus), इन्फ्लुएंझा किंवा न्यूमोनियासारखे गंभीर श्वसनाचे संसर्ग झाल्यास ते धोकादायक ठरू शकते. कारण अशा मुलांना मोठेपणी अस्थमा होण्याची शक्यता असते. काळजी करण्याचे कारण म्हणजे ही शक्यता पूर्ण 100 टक्क्यांपर्यंत असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
आरएसव्ही (Respiratory Syncytial Virus) हा एक अत्यंत सामान्य पण लहान मुलांसाठी खूप धोकादायक श्वसनाचा व्हायरस आहे. जगात जवळजवळ प्रत्येक मूल दोन वर्षांचे होईपर्यंत त्याला किमान एकदा तरी याची बाधा होते. विशेषतः 6 महिन्यांखालील आणि अकाली जन्मलेल्या बाळांना याचा सर्वांत जास्त धोका असतो. या व्हायरसची सुरूवात सर्दी, नाक वाहणे, खोकला, ताप या समस्यांनी होते आणि नंतर घरघर, श्वास घेण्यास त्रास, छातीत आवाज येऊन गंभीर स्वरूपात न्यूमोनिया किंवा ब्रॉन्किओलाइटिस होण्याची शक्यता असते. खोकताना,शिंकताना हवेतून किंवा खेळण्यांद्वारे हा व्हायरस सहज पसरतो.
संशोधनादरम्यान 1 लाखाहून अधिक मुलांचा 30 वर्षांपर्यंतचा डेटा तपासला गेला. त्यात असे आढळले की, ज्या मुलांना 1 ते 5 वर्षांच्या दरम्यान गंभीर श्वसनाचा संसर्ग झाला, त्यापैकी 25 टक्के मुलांना 18 वर्षांपर्यंत अस्थमा झाला. तर सामान्य मुलांमध्ये हे प्रमाण फक्त 10 ते 12 टक्के होते. विशेषतः आरएसव्ही हा व्हायरस सर्वांत धोकादायक असल्याचे समोर आले. हिवाळ्यात थंडी आणि बंदिस्त वातावरणामुळे याचे प्रमाण खूप वाढते. या व्हायरसची गंभीर बाधा झाल्यास फुफ्फुसांच्या छोट्या नलिका कायमच्या कमकुवत होऊन भविष्यात अस्थमाचा धोका दुप्पट होण्याची शक्यता असते.
सध्याच्या काळात भारतात 6 महिन्यांखालील बाळांसाठी निर्सेविमाब नावाची एकच लस उपलब्ध आहे, जी पूर्ण हिवाळी हंगामासाठी संरक्षण देते. डॉक्टरांच्या मते, लहानपणी झालेल्या संसर्गामुळे फुफ्फुसांच्या नलिका कमकुवत होतात आणि त्यांची रचना कायमची बदलते. त्यामुळे वाढत्या वयात शरीर जास्त संवेदनशील बनते आणि धूळ, धूर किंवा वातावरणातून पसरणारा संसर्ग होण्याची शक्यता वाढते; यामुळे अस्थमाचा झटका येऊ शकतो. म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला आहे की, लहान मुलांना सर्दी-खोकला झाला तर दुर्लक्ष न करता त्वरीत तपासणी करा आणि तुमच्या मुलांना वेळेवर लस द्या.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)







