समकाल: ओंजळ मोठी करूया…

0
17
समकाल: ओंजळ मोठी करूया…


महेंद्र कदम4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मागच्या रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त दिवसभर गावात बसून होतो. राजकारण किती वेगानं बदललं आहे, विचार, तत्त्व राहिलं नाही, एकनिष्ठता संपून गेली आहे, राजकारण गावांना कुठं नेऊन ठेवेल, काही कळायला मार्ग नाही… अशा गप्पा सुरू असताना मराठा आरक्षणाचा विषय निघाल्यावर आमचे एक मित्र म्हणाले, ‘काही म्हणा, मराठा समाजाकडं देण्याची दानत आहे. आम्ही अन्य जातीचे असूनही मराठा बांधव नेहमी मदत करत आले..’ हे केवळ मराठ्यांबाबत म्हणता येत नाही. शेतीत राबणाऱ्या सर्वच जाती – धर्माबाबत हे विधान खरे आहे.

शेतात एक दाणा पेरला तर वर कणीस येते. मातीची ही उगवणक्षमता आणि दानत शेतकऱ्याच्या नसानसात उतरल्याने तो देत आला आहे. एकट्याचं पोट भरलं म्हणजे झालं, असं तो करत नाही. स्वतःचं पोट भरण्याच्या आधी तो दावणीच्या जनावरांची सोय करतो. दुष्काळ पडला तर जनावरे जगवण्यासाठी गाव सोडतो. प्रसंगी लेकरांचाही विचार करत नाही. माझ्या वडिलांनीही पूर्वी बैलांसाठी गाव सोडताना आम्हा लेकरांचाही विचार केला नव्हता. जगद्गुरू तुकोबा म्हणतात… बरे झालो देवा। कुणबी केलो। नाहीं तर दंभेची। असतो मेलो।। हे समाधान व्यक्त करण्याच्या तुकोबांच्या वृत्तीत दातृत्वाचा संदर्भ आहे. शेती ही माणसाला अशी कायम माणूस ठेवत आली आहे. शेतीची एक गंमत आहे, ती मरुही देत नाही, माजूही देत नाही आणि तिचा व्यापारही होऊ देत नाही. तिची ही वृत्ती शेतकऱ्याने अनेक शतके जगवली – जागवली आहे.

पण, एकविसाव्या शतकात काळ वेगाने बदलला. जागतिकीकरण नावाच्या व्यवस्थेने या मूल्यांना मातीमोल करून टाकलं. त्यामुळे दाण्याचं जसं कणीस झालं, तसं कणसाचं दाणं विस्कटूनही गेलं. शेतीची छोटे – छोटे तुकडे झाले. खासगीकरणानं नोकऱ्या संपून गेल्या. शेती पिकेनाशी झाली. त्याच्या पोटाचे वांदे होऊ लागल्याने जगण्याची लढाई तीव्र बनत गेली. तरी आजही त्याच्या दारात आलेला माणूस उपाशी जात नाही. चटणी भाकरी का असेना, पण त्याला मिळते. तो खरेदीला बाहेर पडल्याशिवाय शहरातलं मार्केट पण वर उठंत नाही. त्याच्यातल्या या दानतीनेच त्याला कायम गृहीत धरलं. सरंजामदार ठरवलं गेलं. बरेच राजकीय सांस्कृतिक, सामाजिक शिक्के मारून त्याला एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला. मान्य आहे, तो संख्येने अधिक आहे. मान्य आहे, त्याच्या नावावर सातबारा आहे. पण, तोच त्याच्या जगण्याचा फास बनला आहे. हा सातबाराच त्याला बाहेर पडू द्यायला तयार नाही. आरक्षणाने सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील, असा भोळा आशावादही तो बाळगून नाही. त्याला नेत्यांसह सर्वांनी एकटा पाडला आहे आणि आपल्याला कुणी समजून घ्यायला तयार नाही, ही त्याची खरी वेदना आहे. त्यातून त्याला बाहेर पडता येत नाही.

आणखी एका गोष्टीची त्याला खंत आहे. केवळ मराठाच शेतकरी नाही, कितीतरी जातीचे बांधव शेतीत राबत आहेत. यातील बहुतांश जाती समूहांना अल्पसंख्य म्हणून काही ना काही फायदे मिळाले आहेत. पण, या संख्येने अधिक असलेल्या मोठ्या शेतकरी वर्गाला वंचित ठेवले जात असल्याची त्याची भावना बळावत चालली आहे. त्याच्या श्रमाला, मालाला कवडीचा भाव नाही. काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव आलेल्या टोमॅटोचे ढीगच्या ढीग रस्त्याकडेला ओतलेले कुर्डुवाडी इथं मी रोज पाहतो आहे. शेतीत सरळ पीक निघत नाही. बियाणे, खते यांचा प्रचंड खर्च वाढला आहे. त्याचेच दूध, भाजी, धान्य घेणारे आणि त्याला लागणारी अवजारे, औषधे, मोटारी देणारे व्यापारी त्याच्यासमोर लक्षाधीश होताना तो पाहत आला आहे. त्यांच्या मोठं होण्याचं त्याला दुःख नाही, पण सगळ्यांना देत जाऊनही याच्या हाती मात्र काही नाही. या व्यथेने त्याला रस्त्यावर उतरवले आहे.

सर्वांना सोबत घेवून जगत आलेला आणि लोकांनीच लाखांचा पोशिंदा ठरवलेला हा बळीराजा विचित्र परिस्थितीत सापडला आहे. त्याची कोंडी समजून घेण्याची गरज आहे. कर्जमाफी देणाऱ्या जगद्गुरू तुकोबांपासून सुरू असलेला हा प्रवास अवघ्या तीनशे वर्षात लाखभर रुपयांच्या कर्जासाठी आत्महत्या करण्यापर्यंत येवून ठेपला आहे. याला काल कोण जबाबदार होते, या चर्चेला अर्थ नाही. त्याच्या ओंजळीच्या धर्माला जागून तीच ओंजळ अधिक समृद्ध करण्याची हीच खरी वेळ आहे.

(संपर्क – mahendrakadam27@gmail.com)



Source link