सुहास किर्लोस्कर43 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
दोन अफ्रो-अमेरिकन मुलींना त्यांचा बाप टेनिस शिकवण्यासाठी धडपडतो आहे. त्यांना ‘चाइल्ड प्रोडीजीपासून प्रो (अनुभवी) बनवणे’ हा त्याचा ध्यास. अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी टेनिस खेळाडूंना भेटून ‘माझ्या मुलींना टेनिस शिकवा,’ अशी विनंती करताना तो म्हणतो, ‘माझ्या मुलींना जागतिक दर्जाच्या टेनिस खेळाडू बनवण्यासाठी माझ्याकडं ७८ पानांचा प्लॅन तयार आहे, तुम्ही शिकवणार का?’ सगळेच दिग्गज त्याला अक्षरशः वेड्यात काढतात. ‘माझ्या दोन मुली जागतिक दर्जाच्या खेळाडू होतील आणि त्यांचे कोच म्हणून तुम्हीसुद्धा श्रीमंत व्हाल,’ असे सांगणाऱ्या रिचर्डचे कोणीही ऐकत नाही. ‘If you fail to plan, you plan to fail’ हे वाक्य रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्या मुलींकडून वदवून घेणाऱ्या या बापाची कथा म्हणजे ‘किंग रिचर्ड’. व्हीनस आणि सेरेना विल्यम्स या दोन जगद्््विख्यात टेनिस खेळाडूंच्या वडिलांचा, सत्यकथेवर आधारित असलेला हा चित्रपट बघताना आपण अक्षरश: हरखून जातो.
‘टेनिस खेळायला शिकणे म्हणजे व्हायोलिन वाजवायला शिकण्यासारखे आहे. वर्षानुवर्षे तुम्ही शिकत राहता. श्रीमंत घरात जन्म झालेल्या मुलाला उत्तम टेनिस खेळाडू बनवणे फार अवघड आहे आणि तू तुझ्या दोन्ही मुलींना एकाच वेळी महान टेनिस खेळाडू बनवण्याचे स्वप्न बघतोयस हे म्हणजे एकाच घरात दोन मोझार्ट तयार होतील, असा विश्वास दाखवण्यासारखे आहे, ते अशक्य आहे..’ असे अप्रतिम संवाद झॅक बेलीन यांनी या चित्रपटासाठी लिहिले आहेत. लेखक झॅक यांनी दृश्य माध्यमाचा विचार करून लिहिलेली पटकथा विषयाचा ट्रॅक कुठेही सोडत नाही, शिवाय एका पित्याच्या संघर्षातून मेकॅन्रो, पीट सॅम्प्रासला बघता बघता एकेक पायरी चढून यशस्वी होऊ पाहणाऱ्या विल्यम्स भगिनींचा बालपणीचा करिअर ग्राफही पुढं येत जातो.
एक कोच व्हीनसला विनामोबदला टेनिस शिकवण्याचे मान्य करतो. परंतु, सेरेनाला कसे शिकवायचे, यावर त्या मुलींच्या वडिलांनी जो उपाय शोधून काढला, त्याचे चित्रण दिग्दर्शक रेनाल्डो मार्कस ग्रीन यांनी ज्या पद्धतीने केले आहे ते बघण्यासारखे आहे. अंधारामध्ये नायक विल्यम्स टेनिस कोर्टवर प्रॅक्टिस करत असताना काही अफ्रो-अमेरिकन गुंड त्याला मारतात. त्यावेळचा त्याचा निग्रह दाखवण्यात दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर रॉबर्ट एल्सवीट कमालीचे यशस्वी झाले आहेत.
खेळावर आधारित बायोपिक दाखवताना लेखक – दिग्दर्शक – सिनेमॅटोग्राफर – अभिनेते या सर्वांना त्या खेळातील तांत्रिक बारकाव्यांचा अभ्यास करावा लागतो. अफ्रो-अमेरिकन मुलीकडून पराभूत झालेल्या श्वेतवर्णीय लहान मुलींची होणारी चिडचिड उत्तमरीत्या दाखवतानाही त्यावर फोकस न ठेवता, खेळातील उत्तम शॉटने तो कसा झाला आहे हे दाखवण्यात लेखक-दिग्दर्शकाला जास्त स्वारस्य असल्याचे दिसत राहते. नेटफ्लिक्सवर उपलब्ध झालेला हा चित्रपट बघताना ते पदोपदी जाणवते. सायना नेहवाल या बॅडमिंटन खेळाडूवर तयार केलेल्या ‘सायना’ या हिंदी चित्रपटामध्ये याचा अभाव असल्याचे जाणवत राहते. त्यामुळे हिंदी चित्रपटकर्त्यांनी निदान अशा उत्तम बायोपिकचा अभ्यास करावा, हे उत्तम.
पामेला मार्टिन यांचे एडिटिंग ‘किंग रिचर्ड’ची गती एखाद्या टेनिस सामन्यासारखी गतिमान ठेवते. व्हीनस सर्व्ह करताना बॉल उडवते आणि तो बॉल खाली येताना दुसरा सामना सुरू झालेला असतो. असे काही शॉट एडिटिंगला दाद देण्यासारखे आहेत. विल स्मिथ हा उत्कृष्ट अभिनेता आहे हे त्याने ‘इन परसूट ऑफ हॅपीनेस’सारख्या चित्रपटातून सिद्ध केले आहेच. त्याचा ‘रिचर्ड’च्या व्यक्तिरेखेतील अभिनय खासच आहे. कारण त्याला अनेक शेड्स आहेत. आपल्या मुलींना शिकवण्यासाठी अनेक टेनिस खेळाडूंना आर्जवे करणारा, त्यांनी सामने जिंकल्यावर समाधानाचे अश्रू लपवणारा, अन्यायाविरुद्ध संयत झगडा करणारा, कोणाकडूनही काहीही फुकट घेऊ नका असे निग्रहाने सांगणारा बाप विल स्मिथने कमालीच्या नैसर्गिक अभिनयातून उभा केला आहे.
आँजोन एलिस-टेलरने व्हीनस आणि सेरेनाच्या आईची भूमिका करताना दाखवलेले वैविध्य कमालीचे आहे. एका क्षणी किंग रिचर्ड आपल्या मुलींच्या कोचला काढून टाकतो. त्या प्रसंगानंतर ती नवऱ्याला विचारते, ‘यापुढे निर्णय घेताना तो कुटुंबाचा निर्णय आहे, असे तुला वाटते का?’ असा प्रश्न ज्या पद्धतीने विचारते, तो प्रसंग उत्तमरीत्या अभिनीत आणि चित्रित झाला आहे. ‘मला मुलींची जास्त काळजी आहे आणि मी त्याचा गवगवा करत नाही,’ असे ती नवऱ्याला सांगते, तो प्रसंग हृद्य आहे. सानिया सिडनी, डेमी सिंगल्टन या बालकलाकारांनी केलेला व्हीनस आणि सेरेनाचा अभिनय लक्षणीय आहे. एकूणच ‘किंग रिचर्ड’ बघताना आपण अभिनय बघतो आहोत, असे कुठेच ‘दिसणार नाही’ याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. बायोपिक कसे असावेत याची उत्तम उदाहरणे इंग्रजी चित्रपटांमध्ये दिसतात. इन्व्हिक्टस, कोच कार्टर, रे, हिडन फिगर्स, अली, द ग्रेट डिबेटर्स असे अनेक चित्रपट यासाठीच बघावेत, बघत राहावेत.
(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)







