लक्षवेधी: ‘इफ्फी’ची स्पंदनशीलता

0
24
लक्षवेधी: ‘इफ्फी’ची स्पंदनशीलता


  • Marathi News
  • Opinion
  • Vibrancy Of ‘Iffy | Divya Marathi Rasik Article Column Written By Dr Anmol Kothadia

डॉ. अनमोल कोठाडिया6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘मेमरी’ चित्रपटातील एक दृश्य.

भारताचा ५४ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पणजी येथे नुकताच संपन्न झाला. त्याच्या आयोजनात अनेक उणिवा कायम असल्या, तरी तिथे पाहायला मिळणाऱ्या कलाकृती, देशभरातून नियमितपणे येणारे चित्ररसिक, त्यांच्या भेटीगाठी आणि संवाद या निमित्ताने होत राहतो. असे अनोखे आदानप्रदान केवळ स्पंदनशील ‘इफ्फी’मध्येच घडते.

‘इफ्फी’चे घोषवाक्य ‘वसुधैव कुटुंबकम’, पण ते ‘आंतरभारती’शिवाय आणि ते सर्वसमावेशकतेशिवाय कसे साधणार? गतवर्षी ‘इफ्फी’मध्ये इस्रायली परीक्षकाने पुरस्कार सोहळ्यातच ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटामध्ये विषारी प्रचारपट कसा काय?’ असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर कितीही सारवासारव केली, तरी जो परिणाम साधायचा तो साधला गेलाच. त्यामुळेच यंदा अशा थेट विषारी प्रचारपटांची वर्णी किमान आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटांमध्ये तरी करण्याची कुमाची हिंमत झाली नाही. अर्थात सरकार पुरस्कृत दर्जाहीन प्रचारपटांची बोळवण ‘इंडियन पॅनोरामा’मध्ये केली गेलीच!

पण त्याच पॅनोरामात फिचर विभागात एकही मराठी चित्रपट नव्हता. याची जी काही कारणे असतील ती स्पष्ट व्हायला हवीत. निवड समितीने, किमान त्यातील मिलिंद लेले, संजय जाधव या मराठी मंडळींनी तरी याबाबत सविस्तर टिप्पणी करायला हवी. बाकी नॉन फिचर गटात तीन मराठी लघुपट होते – ‘भंगार’ (सुमीरा रॉय), ‘प्रदक्षिणा’ (प्रथमेश महाले) आणि ‘उत्सवमूर्ती’ (अभिजित दळवी). पॅनोरामासंदर्भात जितकी फिचर गटातील पूर्ण लांबीच्या कथापटांची दखल प्रसारमाध्यमात घेतली जाते, तितकी लघुपटांची घेतली जात नाही, हे खेदजनक आहे. तसे पाहता या महोत्सवात चित्रपट प्रदर्शनाखेरीज अनेक महत्त्वाचे असे मास्टर क्लास, आंतरसंवाद आयोजित केलेले असतात. मात्र यंदा सनी देओल सहभागी असलेल्या एका सत्राचे शीर्षकच चक्क ‘नो इफ, नो बट, ओन्ली जाट’ असे चित्रपटातील संवादाच्या संदर्भाने असले, तरी ते उगाच जातीय अहंकार दर्शवणारे होते, हेही खेदजनक मानावे लागेल.

या पार्श्वभूमीवर ‘इफ्फी’मध्ये सादर झालेल्या विदेशी चित्रपटांची, त्यातील वेगळ्या प्रयोगांची आवर्जून नोंद घ्यायला हवी. मेक्सिकोचा ‘मेमरी’ हा चित्रपट त्या अर्थाने महत्त्वाचा ठरतो. आपल्या मुलीसह राहणाऱ्या सिल्वियाचा पाठलाग करत स्मृतिभ्रंश झालेला सोल तिच्या घरापर्यंत येतो. तिला तो आपले लहानपणी लैंगिक शोषण करणाऱ्याचा साथीदार वाटतो. गैरसमज दूर झाल्यावर मात्र त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होतात. या निमित्ताने मात्र तिचा कौटुंबिक भूतकाळ तिच्यासमोर उभा राहतो. वडिलांनी तिचे लैंगिक शोषण केलेले असते आणि कल्पना असूनही तिच्या आईने याबाबत काहीच केलेले नसते. याचा तिच्या जगण्यावर वाईट परिणाम झालेला असतो. स्मृतींनी चकवा देणे, या गोष्टीची येथे सर्जनशील वापर करून घेतला आहे. बेल्जियमच्या ‘द चॅपल’मध्येही अशाच भूतकाळातील त्रासदायक आठवणी अगदी मोक्याच्या काळात जेनिफरला सतावू लागतात. ती एक उत्तम पियानोवादक असून, अत्यंत मानाच्या स्पर्धेसाठी निवडलेल्या अंतिम फेरीतील स्पर्धकांबरोबर चॅपलमध्ये राहण्याची त्यांची सोय केली आहे. येथे मग स्पर्धकांचे एकमेकांवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा बाक्याप्रसंगी मनाची स्थिरता खूप महत्त्वाची. पण खरा पेच तर तिथेच आहे. तो नेमका काय, हे चित्रपटातच पाहायला हवे. किशोर बेलेकर यांची ‘गांधी टॉक्स..’ ही ‘संवाद-विरहित’ कलाकृती ब्लॅक कॉमेडी विधेतून उलगडते. म. गांधींच्या विचारांना स्वच्छतेपुरतेच संकुचित करण्याची वा नोटांवरील त्यांच्या प्रतिमेला भ्रष्टाचारातच गढूळ करून टाकण्याची गतिशील प्रक्रिया सुरू असतानाच गांधी विचारांना जगण्याच्या चलनात आणण्याचा एक प्रभावी प्रयत्न यातून केला आहे. अतिशय बकाल वस्तीत आपल्या वयोवृद्ध आईसोबत राहणाऱ्या, मात्र नीतिमूल्यांची चाड असणाऱ्या नायकाची ही कथा आहे. त्याचा ‘आतील आवाज’ त्याला साधनशुचितेपासून ढळू देत नाही. ‘मी कॅप्टन’ची (इटली, बेल्जियम, फ्रान्स) पटकथा आफ्रिकेतून युरोपकडे होणाऱ्या स्थलांतराविषयी काही जणांनी लिहिलेल्या गोष्टींवर आधारित आहे. यात सैदू आणि मुसा या दोन चुलत भावंडांची मध्यवर्ती गोष्ट आहे. अतिशय संवेदनशील आणि तितकेच निर्धारयुक्त मन असलेली व्यक्तीच कप्तान होण्याच्या पात्रतेची असते. असे मन घडवण्यासाठी घरातील उबदार अवकाश खूप महत्त्वाचा ठरतो. त्या दृष्टीने यातील सैदूचे कौटुंबिक जीवन चित्रीत झाले आहे. बाहेरच्या जगातील स्वार्थांधता आणि क्रौर्य अनुभवूनही सोबत जे जे आहेत, त्यांना मागे न सोडता पुढे घेऊन जाणे, तो अगदी जीवावर बेतेल अशा प्रसंगीही सोडत नाही. म्हणून तर तो स्वतःबद्दल ‘मी कप्तान आहे,’ असे विश्वासाने म्हणू शकतो.

जर्मनीच्या ‘मेजर्स ऑफ मेन’ या कलाकृतीस साधारणतः १८९० ते १९१० दरम्यान युरोपियन वासाहतिक गौरवर्णीय वर्चस्ववादातून आफ्रिकेत झालेल्या वंशसंहाराची पार्श्वभूमी आहे. पूर्वग्रहदूषित धारणा आणि हितसंबंध यातून मग अगदी वैज्ञानिक निरीक्षणेही वस्तुनिष्ठ पद्धतीने न येता सोयीस्कर पद्धतीने नियंत्रित केली जातात. अशा धारणा दुरुस्त करू पाहणारा मानववंशशास्त्रज्ञ हॉफमन याची यात मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. कथनशैलीचा हेतू मात्र त्याला नायकत्व बहाल करणे हा नसून, त्यापेक्षा वंशवादाची समग्र समज प्रेक्षकांपर्यंत पोचवणे, असा आहे. जर्मनीच्या सम्राटाची भेट घेण्याच्या आमिषाने आणलेल्या जमातीतील माणसांकडे प्रयोगासाठीचे नमुने म्हणून पाहिले जात असते. अशावेळी हॉफमन त्यांच्याशी माणसांप्रमाणे व्यवहार करत राहतो. या निमित्ताने केझियाशी त्याचा स्नेहबंध जुळतो. पुढे जेव्हा लष्करी मोहिमेसोबत संशोधनाच्या कामासाठी जातो, तेव्हा तो तिला शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. या दरम्यान त्याला होणारे विदारक दर्शन हलवून सोडणारे आहे. फ्रान्सच्या ‘यानिक’मध्ये एका नाटकाचा रसनिष्पत्ती नसणारा प्रयोग सुरू आहे.. अचानक एक प्रेक्षक उठतो आणि कलाकारांना उद्देशून, ‘तुमचे हे नाटक मला आवडले नाही,’ असे सुनावतो आणि तेथून पुढे कलाकार मंडळी, प्रेक्षक मंडळी आणि हा तरुण म्हणजे शीर्षकी व्यक्तिरेखा असलेला आपला नायक यांच्यात जो आंतरसंवाद रंगतो, त्यातून ‘यानिक’ हा चित्रपट रंगतदार होत जातो. हा नायक वैतागून प्रेक्षागृहाच्या बाहेर पडतो, पण ही कलाकार मंडळी आपली चेष्टा करत आहेत, हे त्याच्या लक्षात येते. मग तो परततो, ते हातात पिस्तूल घेऊनच. त्या धाकावर तो तिथेच नाटक लिहून आणि कलाकारांकडून ते करवून घेतो. हा धमाल सिनेमा सुरू असतानाच शेवटी सुरक्षा कमांडो प्रेक्षागृहात शिरतात, तेव्हा पडद्यावर काळोख आणि सन्नाटा पसरतो..!

‘अबाउट ड्राय ग्रासेस’मध्ये (तुर्की, फ्रान्स, जर्मनी) इस्तंबूल शहरात बदली होण्यासाठी धडपडणाऱ्या; पण बर्फाळ, दुर्गम प्रांतात खितपत पडलेल्या सामेत या शिक्षकाच्या जीवनातील या कालखंडाचे आणि त्यातून त्याच्या मनात उमललेल्या जीवनासाराचे दर्शन घडते. यात कथानक घडवण्याची घाई नाही वा प्रसंगमालिका उभा करण्याचा अट्टाहास नाही. सेवीम या आवडत्या विद्यर्थिनीनेच केलेला लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप त्याच्यासाठी खूप धक्कादायक असतो. या घटनेत चित्रपट अडकून पडत नाही, तर त्यात इतरही अनेक घटना येत राहतात. सामेत, नुरिया आणि केनान यांच्यातील टिपिकल नसणाऱ्या प्रेमाच्या त्रिकोणातील संदिग्धतेचा करड्या छटांमधील गुंता आहेच. नुरियाच्या व्यक्तिरेखेत स्त्रीमुक्तीच्या जाणिवा अगदी प्रभावीपणे पेरल्या आहेत. दक्षिण कोरियाच्या ‘काँक्रीट युटोपिया’च्या प्रारंभी श्रेयनामावलीच्या वेळी, नागरीकरणातील अपार्टमेंट्सचे सर्वांना निवारा आणि जीवनमान उंचावणे असे महत्त्व माहितीपट धाटणीत सांगत असताना, शहरातील गगनभेदी इमारती दिसत राहतात. श्रेयनामावली संपता संपता प्रलयंकारी भूकंप होतो आणि शहरे, त्यातील बहुतांश इमारती जमीनदोस्त होतात. आणि या पार्श्वभूमीवर येणारे ‘काँक्रीट युटोपिया’ हे शीर्षक थरकाप उडवणारे सत्य सांगून जाते. पुढे मग कोणत्याही चांगल्या डिझास्टर फिल्ममध्ये जशा प्रसंगमालिका घडतात, तशाच इथेही घडून येतात.

‘इफ्फी’च्या आयोजनात अनेक उणिवा सालाबादप्रमाणे कायम असल्या, तरी तिथे पाहायला मिळणाऱ्या कलाकृती, देशभरातून नियमितपणे येणारे चित्ररसिक, त्यांच्या भेटीगाठी आणि संवाद या निमित्ताने होत राहतो. देशात अनेक छोट्या – मोठ्या ठिकाणी होणाऱ्या महोत्सवांची माहिती मिळत राहते. तुम्ही नुकत्याच पाहिलेल्या देशी – विदेशी सिनेमाचा दिग्दर्शक अचानक तुमच्या समोर दिसतो आणि त्याच्याशी मनमुराद गप्पा सुरू होतात. असे अनोखे आदानप्रदान केवळ स्पंदनशील ‘इफ्फी’मध्येच घडते.

(संपर्क-cineanmol @yahoo.co.in)



Source link