रसिक स्पेशल: चक्रव्यूहातले अभिमन्यू…

0
19
रसिक स्पेशल: चक्रव्यूहातले अभिमन्यू…


  • Marathi News
  • Opinion
  • Dr. Amol Annadate’s Article On Suicide Of Students Preparing For Competitive Exams

डॉ. अमोल अन्नदाते5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी समाजमन हादरले आहे. लौकिक यशासाठी आपण मुलांना या चक्रव्यूहात पाठवतो खरे, पण ते मिळाले नाही तर त्यातून बाहेर कसे पडायचे, हे शिकवत नाही. किंबहुना ते आपल्यालाही माहीत नसते. परिणामी आप्तांच्या अपेक्षांशी अन् बाहेरच्यांच्या नजरांशी लढता लढता ‘आतलं’ बळ संपतं नि दुर्दैवाने त्यातच अनेकांचा आत्मघात होतो. पालक, नातेवाईक आणि समाज म्हणून आपण अशा चक्रव्यूहात मुलांना पाठवून त्यांचं आयुष्य पणाला लावणं थांबवणार आहोत की नाही?

गेल्या ८ महिन्यांमध्ये कोटा येथे नीट – जेईईच्या, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी गेलेल्या २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या काही वर्षात प्रवेश परीक्षांच्या ओझ्याखाली दबून नैराश्यग्रस्त होऊन प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतच चालली आहे. जेव्हा कोरोना, गॅस्ट्रो यांसारख्या संसर्गजन्य आजारांच्या साथी येतात, तेव्हा यंत्रणा जागी होते, माध्यमे रान उठवतात आणि प्रतिबंधक उपचार-लसीकरणाच्या मोहिमा देशभर राबवल्या जातात. कारण या समस्या दृश्य स्वरूपात दिसत असतात. पण, विद्यार्थ्यांमधील नैराश्य आणि त्यातून होणाऱ्या त्यांच्या आत्महत्या यांचा संसर्गही तेवढाच गंभीर व घातक असतो, हे कोणाच्याही लक्षात येत नाही. या मुळावर उठलेल्या आजारावर मानसिक लसीकरण करणारे आणि आयुष्याचा खरा आनंद, ध्येय, जगण्याचे अन्य उद्देश शोधण्याची दृष्टी मात्र कुठलेही क्लास देत नाहीत. आपल्या पाल्याला शिक्षण, करिअरच्या जीवघेण्या स्पर्धेत उतरवताना, त्यांना मानसिक धैर्याची अन् स्थैर्याची लस टोचणारे नि तो यशस्वी होवो अथवा न होवो, पण आधी तो जगला पाहिजे, एवढी जाणीव असणारे पालक तयार होणे, ही आजची सर्वांत महत्त्वाची निकड आहे.

वर्गात साधारण पहिल्या दहामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांकडून पालक – शिक्षक, समाज अशा सगळ्यांच्याच अपेक्षा असणे साहजिक असते. या शैक्षणिकदृष्ट्या हुशार विद्यर्थ्याना त्यांच्या स्वत:कडून असणाऱ्या अपेक्षा आणि इतरांना त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा पेलत दोरीवर चालण्याची कसरत अगदी चौथी, पाचवीपासून करावी लागते. ३० मुलांचा वर्ग गृहीत धरला, तर १० ते २० म्हणजे मधल्या फळीतील विद्यार्थ्यांना कधीच फारसे टेन्शन असते. त्यांना पहिले येऊन पुढे सरकण्याचाही ताण नसतो आणि मागे घसरून फारसे काही बिघडणार नसते. पण, वर्षानुवर्षे या शालेय आणि उच्च माध्यमिक स्पर्धेतून बऱ्यापैकी यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी मानसिक फसगत होते. पालक, शिक्षक आणि समाज त्याच्या या स्थितीला अजाणतेपणे हातभार लावतात, कारण तोही त्याच मानसिकतेत जगत असतो. ही फसगत म्हणजे, आयुष्यातील आनंद आणि आंतरिक समाधान या गोष्टींना ही मुले शिक्षण, करिअरमधील चमकदार कामगिरी, उपलब्धी किंवा यशाशी जोडू लागतात. न्यूरो प्लास्टिसिटी म्हणजे सवयीप्रमाणे किंवा वारंवार एखादी गोष्ट करून वळणे आणि वाकणे हा मानवी मेंदूचा एक मोठा गुण आहे. तो त्याला इतर प्राण्यांपासून वेगळा ठरवतो. त्यामुळे सतत काहीतरी मिळवणाऱ्या विद्यार्थी अथवा कोणा व्यक्तीचे मन आणि मेंदू केवळ असामान्य कामगिरी, यश एवढ्या एकाच आनंदाच्या साधनाला सरावतात. एका पातळीपर्यंत यात काही गैर नाही आणि असा कामगिरीचा ध्यास राहिला नाही तर जगरहाटी चालणारही नाही. पण, कामगिरीच नाही, तर आनंदही नाही आणि मग माझे अस्तित्व तरी कशासाठी, हा प्रश्न मनाला पडणे गैर आहे.

चांगली कामगिरी आणि शैक्षणिक यश हे आनंदाचे एक साधन असले, तरी इतर अशी अनेक साधने आहेत, ज्यातून तीच भावना किंवा त्याही पेक्षा मोठ्या आनंदाची भावना निर्माण होते, हे मानण्याची सवयच मेंदूला राहत नाही. Law of Averages म्हणजे सरासरीचा नियम सांगतो की, तुम्ही प्रत्येक परीक्षेत तसेच आणि तेवढेच यश मिळवू शकत नाही. सर्वोत्तम क्रिकेटरही प्रत्येक चेंडूवर चौकार-षटकार ठोकू शकत नाही. कधी तरी तो शून्यावरही बाद होतो. नीट – जेईई किंवा स्पर्धा परीक्षांसाठी कोटाच नव्हे, तर इतर शहरांमध्ये कोचिंगच्या कारखान्यात जाणारे विद्यार्थी नेमक्या अशाच कामगिरीच्या दडपणाखाली (Performance Pressure) असतात. नीट-जेईईला जाणारी मुले सतत शैक्षणिक यश मिळवलेली हुशार मुले असतात. आता सर्वांत महत्त्वाची म्हणून समजल्या जाणाऱ्या परीक्षेच्या एका दिवसासाठी त्यांची तयारी सुरू असते. मुळात ही परीक्षा काही प्रमाणात त्यांच्या आयुष्याची व्यावसायिक आणि आर्थिक दिशा ठरवणारी असली, तरी ती त्यांच्या आयुष्याची अंतिम दिशा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा, आंतरिक समाधानाचा शेवटचा निकाल लावणारी परीक्षा मुळीच नसते. पालक आणि विद्यार्थ्यांचे समुपदेशन होत नसल्याने त्यांना या सत्याची उकल होत नाही. परिणामी कोचिंग सुरू असतानाचे छोटेसे अपयशही विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सहन होत नाही. त्यासाठी अशा परीक्षांचे, तीव्र स्वरूपाचे कोचिंग सुरू करण्याआधी एक आठवडा पालक आणि विद्यार्थ्यांना मानसिक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा कमी गुणाने उत्तीर्ण होणाऱ्या, मधल्या फळीतील विद्यार्थ्यांना अपयशाचे काहीच वाटत नसते, कारण अशी समाजाच्या दृष्टीने अपयश समजली जाणारी गोष्ट अनुभवतच ते मोठे झालेले असतात. त्यातूनच ते जास्त जोखीम उचलण्यास सक्षम होतात आणि पुढे मोठे व्यावसायिक यश मिळवू शकतात. पण, हुशार विद्यार्थ्यांना आणि प्रवेश परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अपयश पचवण्यासाठी विशेष मानसिक जडणघडण मुद्दामहून करावी लागते. याची सुरूवात शालेय जीवनापासूनच व्हावी लागते.

मानसिक स्वास्थ्यासोबतच Resilance म्हणजेच मानसिक लवचिकपणाला मानसशास्त्रात खूप महत्त्व असते. एकदा पडल्यावर तुम्ही परत वेगाने उठून चालू लागता, तसे तणावाच्या स्थितीतही परत उसळी घेऊन मन पूर्ववत होऊ शकते, यालाच Resilance म्हणतात. सैन्य आणि खेळामध्ये हे आवर्जून शिकवले जाते. स्वत: जखमी असलो, तरी गोळी लागलेल्या सहकाऱ्याला उचलून धावायचे कसे, याचे विशेष प्रशिक्षण सैन्यात दिले जाते. स्पोर्टस् सायकॉलॉजीमध्येही, हरलो तर काय? यावर भर दिला जातो. आज स्पर्धा इतकी वाढली आहे की शैक्षणिक स्पर्धेसाठीचे मानसशास्त्र गरजेचे झाले आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या उदाहरणे देत पालकांनाच मुलांच्या मनाची आणि मेंदूची जडणघडण करावी लागेल. गुणवत्तेचा, उत्तमतेचा ध्यास गैर नाही, तो हवाच. त्याशिवाय गुणवत्तापूर्ण गोष्टी निर्माण कशा होणार? पण, या गुणवत्तेचा अट्टहास , दुराग्रह आणि त्यासाठी आपले अस्तित्व पणाला लावण्याइतपत ही तो महत्त्वाचा नाही. शैक्षणिक गुणवत्ता आणि नीट-जेईईची रँक हे आनंदाचे एक साधन असेल, पण ते एकमेव नाही. ते नसले तरी केवळ स्वत:चे अस्तित्वही आपल्याला समाधानी ठेवण्यास पुरेसे आहे, हा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा लागेल. मानवी मन आणि शरीर प्राण्यांपासून उत्क्रांत झाले आहे. त्यामुळे धोका ओळखून त्यावर काही सेकंदात शारीरिक प्रतिक्रिया देणारा अमिगडाला हा भाग मानवी मेंदूत प्राण्यांसारखा सक्रिय आहे. बऱ्याचदा हा धोका काल्पनिक असतो, पण शरीर मात्र अतिरेकी प्रतिसाद देते. परीक्षेतील अपयशाची भीती आणि त्यातून घडणाऱ्या क्रिया मेंदूच्या या सर्किटमधून घडतात. पण, मानवी मनाला एक वरदानही मिळाले आहे. ते म्हणजे, सारासार विचार करणारा फ्रंटल लोब. धोक्याचा आणि तणावाचा विचार मनात आला की केवळ १० सेकंद थांबले तरी सारासार विचार करणारा फ्रंटल लोब सक्रिय होतो आणि आपल्याला शांत करतो. त्यातूनच आपण योग्य रीतीने आणि सद्सद्विवेकबुद्धीने वागून तणावावर मात करतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना माइंड फुलनेस म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करून सारासार विचारशक्ती विकसित करण्याचे प्रशिक्षण देणे, त्याची सवय लावणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने गतकाळात किंवा भविष्यात सतत रेंगाळणाऱ्या मनाला आताच्या क्षणात आणणे, हे सध्याच्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे.

प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी समाजमन हादरले आहे. लौकिक यशासाठी आपण मुलांना या चक्रव्यूहात पाठवतो खरे, पण ते मिळाले नाही तर त्यातून बाहेर कसे पडायचे, हे शिकवत नाही. किंबहुना ते आपल्यालाही माहीत नसते. परिणामी आप्तांच्या अपेक्षांशी अन् बाहेरच्यांच्या नजरांशी लढता लढता ‘आतलं’ बळ संपतं नि दुर्दैवाने त्यातच अनेकांचा आत्मघात होतो. पालक, नातेवाईक आणि समाज म्हणून आपण अशा चक्रव्यूहात मुलांना पाठवून त्यांचं आयुष्य पणाला लावणं आपण थांबवणार आहोत की नाही, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

संपर्क : ९४२१५१६५५१

dramolaannadate@gmail.com



Source link