मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह (Mumbai) राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात धुव्वादार पाऊस (Rain) सुरू आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर आला असून लातूर, नांदेड (Nanded) जिल्ह्यात पावसाने मोठं नुकसान झालं असून मनुष्यहानी व जनावरेही दगावल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने राज्यभरात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात, मराठवाड्यात 11 जणांचा मृत्यू झाला असून नांदेड जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थितीमुळे 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे नांदेड जिल्ह्यात पोहोचले आहेत. तर, मुख्यमंत्र्यांनीही मुंबईसह महाराष्ट्रातील पूरस्थितीचा (Flood) आढावा घेतला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी झाली असून पिकं पाण्याखाली गेली आहेत. तर, मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाली असून मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेचं दिसून आलं. राज्यातील अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने विसर्ग देखील सुरू झाला आहे.
मुंबईसह उपनगरात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून हवामान वेधशाळेचा अंदाज खरा ठरला आहे. त्यानुसार, आज शाळा आणि महाविद्यालयांना आधीच सुट्टी देण्यात आली होती. तर, लोकलसेवा खोळंबल्याने मुंबईतील चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल झाले. मुंबईत ठाण्याकडून सीएसएमटीकडे जाणारी लोकलसेवा काही तास बंद राहिली. मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ट्रांस हार्बर मार्गिकेवर पाणी असल्याने अनेक गाड्या या रेल्वे रुळाकर थांबल्या, त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी आणि गैरसोय झाली होती. मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हाहाकार उडाला आहे. दरम्यान, रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून मुंबई-पुणे-मुंबई जाणाऱ्या अनेक ट्रेन रद्द झाल्या आहेत.
ठाण्यातील उपवन तलावाबाहेर पाणी
सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. ज्या रस्त्यांवर पाणी साचले आहे, ते रस्ते रहदारी आणि वाहतुकीसाठी प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहेत. तसेच ठाण्यातील तलावांनी पाण्याची पातळी ओलांडली असून तलावातील पाणी रस्त्यावर आलेले पाहायला मिळत आहे. उपवन तलावाने देखील पाण्याची पातळी ओलांडली असून प्रशासनाने आसपासच्या परिसराला सतर्कतेचा इशारा दिला आहे. या उपवन तलावाकाठी दररोज पावसाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात मात्र पाण्याच प्रमाण जास्त असल्याने.ठाणे महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने नागरिकांना या ठिकाणी येण्यास बंदी घातली असून पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पालघरमध्ये भातशेती पाण्याखाली
पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाचा परिणाम नदी नाल्यांवर झाला असून जिल्ह्यातील नदीला ओसंडून व्हायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील भात शेती ही पाण्याखाली गेली असून सूर्या देहर्जे वैतरणा या सर्वच नद्या दुसरीकडून व्हायला सुरुवात झाली आहे. सूर्या नदीला मोठा पूर आला असून सूर्या नदी इसारा पातळी ओलांडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे नदी काठावर असलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
रायगडमध्ये नद्यांनी ओलांडली पातळी
रायगड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालेय. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहतायेत, तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. पाली खोपोली राज्य महामार्गावर पाली आंबा नदी पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तळी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. रायगड जिल्ह्याच्या रोहा शहरातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून या नदीवरील दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिकेट्स लावून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. रोहा तहसीलदार व नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले असून फक्त अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
वाशिष्ठी, शिवनदीला पूर
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे, त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूण शहरातील वाशिष्ठी आणि शिवनदीला पूर आल्याने पुराचे पाणी शहराच्या विविध भागांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. खेड तालुक्यात जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांना पूर आला आहे. या नद्यांचे पाणी नदीकाठच्या गावांमध्ये तसेच बाजारपेठेत शिरले आहे. शासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची तयारी सुरू आहे. चिपळूण शहराला आज दिवसभर पुराच्या पाण्याने वेढले होते, शहरातील शिव नदी आणि वाशिष्ठी नदीला आलेल्या पुरामुळे चिपळूण, गोवळकोट, पेढे, मिरजोळी या भागातील शेतांमध्येही पुराचे पाणी दिवसभर होते. शहरातील पुराचे ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आलाय.
लोणावळ्यात 10 तासांत 150 मिलिमीटर पाऊस बरसला
पुणे जिल्ह्यातही सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून पर्यटननगरी लोणावळ्यात आज पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. अवघ्या दहा तासांत 150 मिलिमीटर पाऊस बरसलाय. सकाळी 7 ते सायंकाळी 5 दरम्यान पावसाने विक्रमी नोंद केलीये. यंदाच्या मोसमात दहा तासांत पहिल्यांदाच पावसाने अशी बॅटिंग केलीये. घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केल्यानं अन तसा पाऊस ही बरसत असल्यानं लोणावळ्यातील सर्व शाळांना उद्या आणि परवा सुट्टी ही जाहीर केलेली आहे.
साताऱ्यात कोयना 100 टीएमसी भरले, गावांचा संपर्क तुटला
साताऱ्यातील कोयना धरण 100 टीएमसी भरले असून धरणातून 80 हजार 500 पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलाय, पाटण तालुक्यातील नेरळे, मूळगाव, संगमनगर पूल पाण्याखाली गेले आहेत. सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम आणि कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने, कोयना, वेण्णा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसात सहाव्यांदा कोयना धरणाचे दरवाजे उचलून 11 फुटावर नेण्यात आले आहेत. सध्या 80, हजार 500 क्युसिक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. धोम धरणातून 8 हजार 659 क्युसेक इतका विसर्ग कृष्णा नदी पात्रात होत असून कण्हेर धरणातून 6 हजार 400 पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीपात्रात केला जात आहे. त्यामुळे कोयना, वेण्णा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी वाढली आहे. पश्चिम भागातील अनेक नद्यांवरील पूल बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत. पाटण तालुक्यातील मुळगाव , संगमनगर धक्का पूल त्याचबरोबर पाटण तालुक्यातील अनेक गावातील पूल पाण्यातले गेल्याने संपर्क तुटला आहे.
मराठवाड्यात पावसाने 11 जणांचा बळी
मराठवाड्यात 14 ऑगस्टपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये जीवितहानी देखील केली आहे. मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 11 लोकांचा बळी गेला आहे. 498 छोट्या मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 350 पेक्षा अधिक घरांची आणि गोठ्यांची पडझड झाली आहे. सोबतच 1154 गावांना पावसाचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील 4 लाख 38हजार 451 शेतकरी पावसामुळे बाधित झाले आहे. तसेच 3 लाख 58 हजार 370.55 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाला आहे.
नांदेडमध्ये 5 जणांचा मृत्यू
नांदेडमधील लेंडी नदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. धरणामध्ये वीस फूट पाणी वाढलं, जे काही नागरिक जागे होते त्यांनी गावकऱ्यांना जागं केलं. परंतु काही लोक गावात अडकली होती. त्या दुर्घटनेत गावातील चार महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. येथील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सगळं काही होतं ते तिथेच राहिलं, त्यामुळे शासनाची जबाबदारी वाढली आहे. नांदेडमध्ये कालच्या पावसाने 5 बळी गेले असून आज 2 मृतदेह शोधण्यात आले आहेत.
मृतांची नावे
पिराजी म्हैसाजी थोटवे-वय 70
चंद्रकला विठ्ठल शिंदे- 45
ललिताबाई भोसले -60
भीमाबाई हिरामण मादाळे -65
गंगाबाई गंगाराम मादाळे-65
मंत्री गिरीश महाजन मुखेडला रवाना
नांदेडमधील पूरस्थितीमुळे आणि लेडीं परिसरातील धरणग्रस्त नागरिकांची होत असलेले हाल लक्षात घेता, आआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन मुंबई विमानतळावरुन नांदेडला पोहोचले आहेत. तेथून मुखेड तालुक्यातील रावनगावात सर्च ॲापरेशनसाठी ते असणार आहेत. मराठवाड्यातील रावनगावात धरणाने पाणीसाठी ओलांडल्याने आणि नदीला पूर आल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
मुंबईत 300 मिमि पाऊस – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काही तास मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिले. मिठी नदी धोकादायक पातळीवर गेल्याने आपल्याला 400-500 लोकांना आपल्याला हलवावं लागले. मिठी नदीच्या पातळीवर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे. गेल्या काही तासांमध्ये मिठी नदीची पातळी कमी झाली आहे. मात्र, येत्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आपण सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी आणि वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळी समुद्राला भरती येणार आहे. तेव्हा पावसाची परिस्थिती काय असेल ते बघावे लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
विदर्भात 50 गावांचा संपर्क तुटला
विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम आणि बुलढाणा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करण्यात आला होता.
गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या परिसरात सोमवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात 12 तालुक्यात 52.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून 15 मंडळात मुसळधार तर 10 मंडळात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सद्यस्थितीत 10 जिल्हा मार्ग बंद असून पर्लकोटा नदीच्या पुरामुळे भामरागड-आल्लापल्ली हा राष्ट्रीय महामार्गही बंद झाला आहे. परिणामी तालुक्यातील 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसाने गडचिरोली शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून आपत्ती व्यवस्थापन करणारी नगरपालिकाच पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, हवामान विभागानुसार 20 तारखे पर्यंत विदर्भातील दक्षिणी जिल्ह्यांमध्ये म्हणजेच यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता आहे. 21 ऑगस्ट पासून मात्र पावसाचा जोर कमी होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हेही वाचा
मुंबईत पावसाचा हाहा:कार! रस्त्यावर पाणीच पाणी, लोकल सेवा ठप्प, पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट