समीर गायकवाड13 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
निर्माता – दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या भट्टीत वाढलेल्या रोहित जुगराजचे नाव जोडले गेलेले ‘जेम्स’ आणि ‘सुपरस्टार’ हे दोन्ही सिनेमे सपशेल पडले. त्यानंतर रोहितने पंजाबी सिनेमाचा मार्ग स्वीकारला आणि गिप्पी ग्रेवाल व दिलजीत दोसांझ यांच्यासोबत ‘जट्टा जेम्स बाँड’ आणि ‘सरदारजी’ यांसारखे हिट चित्रपट केले. रोहित आता त्याची पहिली वेब सिरीज ‘चमक’ घेऊन आलाय. चमक दोन प्रकारची असते, एक जी जगभर दिसते, म्हणजेच ग्लॅमर आणि दुसरी, जी माणसाच्या आत असते, म्हणजे आत्मनिरीक्षण, आत्मज्ञान.
सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेली ‘चमक’ ही या दोन फ्लॅशमध्ये धावणाऱ्या माणसाची कथा आहे. एक अर्थाने ही वेब सिरीज म्हणजे तारे – तारकांच्या लग्नाची मिरवणूक आहे. पण, प्रत्येक अभिनेता त्याच्या स्वत:च्या व्यक्तिरेखेत परिपूर्ण आहे, हे विशेष. मालिका विश्वात हे पहिल्यांदाच घडतेय की, एखाद्या संगीत उद्योगातील इतके गायक एकाच वेळी पडद्यावर प्रेक्षकांना आपापला परफॉर्मन्स देताना दिसत आहेत. रोहित जुगराजचे कौतुक केले पाहिजे, कारण त्याने आपले प्रत्येक ट्रम्प कार्ड अत्यंत काळजीपूर्वक वापरलेय. मालिकेच्या ‘चमक’ या नावात पंजाबचे प्रसिद्ध लोकगायक अमरसिंग चमकीला यांचाही संदर्भ आहे. चमकीला आणि त्यांच्या पत्नीचीही दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि त्यांचे मारेकरी आजपर्यंत सापडलेले नाहीत. खऱ्या आयुष्यात ही घटना १९८८ मध्ये घडली होती. १९९९ मध्ये अशाच एका हत्येपासून मालिकेची सुरूवात होते. प्रत्येकी पन्नासेक मिनिटांच्या सहा भागांच्या ‘चमक’चा पहिला सीझन रोहितने मेहनतीने बनवला आहे. मालिका सुरूवातीला संथ वाटते, पण काला या मुख्य पात्राचा शुभ्र भूतकाळ उघड झाला की ती वेग घेते. हिंदी सिनेमा आणि ओटीटी स्पेसमध्ये संगीत क्षेत्रातील राजकारणाच्या फारशा कथा येत नाहीत. सिनेमापासून ते लोकसंगीतापर्यंत अशा कैक कथा देशभरात आहेत, ज्यावर ‘चमक’सारख्या वेब सिरीज बनवायला हव्यात.
रोहित जुगराजच्या सशक्त दिग्दर्शनाबरोबरच ‘चमक’ला खरी ताकद मिळालीय, ती मुख्य अभिनेता परमवीर चीमाच्या अभिनयाची. परमवीरला ही संधी कोरोना काळात मिळाली. अन्यथा, कायद्याचा अभ्यास करून काळा कोट घालण्याची तयारी त्यांनी आधीच केली होती. ‘काला’ या पात्रासाठी त्याने मेहनत घेतल्याचे जाणवते. काला हाच कथेचा नायक आहे, असेही नाही. कॅनडाच्या तुरुंगातून बाहेर पडल्यावर तो पंजाबमध्ये आलेला असतो. परिणामी लोक त्याला ‘उल्टा डॉन्की’ म्हणतात! तुरुंगातून बाहेर येणारा तरुण स्वत:च्या उणिवांना आपल्या शस्त्रामध्ये कसा बदलतो आणि पंजाबच्या म्युझिक इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या कंपनीच्या मालक, तीजा सूरपर्यंत कसा पोहोचतो, हे पाहणे रंजक आहे. या कंपनीच्या नावातील पहिला शब्द T या आद्याक्षराने आणि दुसरा S ने सुरू होतो, हेही लक्षणीय आहे. सारं चुकीचं घडूनही डिम्पी नावाचा संघर्ष करणारा संगीत दिग्दर्शक त्याला स्टार कसा बनवतो, ही कालाची कथा. पण, ही त्याची खरी कहाणी नसते. तो समांतरपणे आणखी एक कथा मांडतो, ती म्हणजे स्वतःची ‘चमक’ शोधण्याची कथा. जिथे या कथेचा परमोच्च बिंदू येतो, तिथे मालिकेचा पहिला सीझन संपतो. परमवीर चीमा स्टार बनेल इतका हा सीझन पॉवरफुल झाला आहे.
मुकेश छाबरा यांचे कास्टिंग अप्रतिम आहे. खुद्द मुकेशही येथे डिंपीच्या भूमिकेत आहे. सुरूवातीपासून शेवटच्या सीनपर्यंत मुकेश आपली व्यक्तिरेखा जगलाय. मिकासोबतच्या रेकॉर्डिंगचा प्रसंग, मुंबईहून ऑर्डर केलेल्या ब्लॅक वॉटरसोबत कालाला पाठवणे, त्याचे गाणे हिट झाल्यानंतर त्याला कार गिफ्ट करणे आणि बदल्यात त्यालाच थप्पड मारणे असो किंवा कालाला फ्लॅट गिफ्ट केल्याचा प्रसंग असो; हे सर्व सीन अप्रतिम झालेत. मालिकेतील सहकलाकारांची मुबलकता ‘चमक’ची चमक वाढवते. तारा सिंगच्या पात्रात गिप्पी ग्रेवालने पहिल्या एपिसोडपासून तयार केलेले मैदान काला सहाव्या एपिसोडमध्ये स्टेजवर येऊन, त्याचा शो गाजेपर्यंत तसेच राहते. जुगल ब्रारच्या भूमिकेत सुविंद्र पालने शेवटच्या दोन भागात कमाल केलीय, तर जग्गा सिंगच्या भूमिकेतील राजकुमार कंवलजीतचा अभिनयही पाहण्यासारखा आहे.
सिरीजच्या कथेत संगीत मध्यवर्ती भूमिका बजावते. मालिकेच्या दिग्दर्शनाव्यतिरिक्त रोहित जुगराजला संगीतासाठीही पूर्ण गुण द्यावे लागतील. मिका सिंग, बुलेट पाजी, एमसी स्क्वेअर, मलकित सिंग, अफसाना खान, कंवर ग्रेवाल, अनीस कौर, शाश्वत सिंग, हरजोत कौर आणि देवेंद्र पाल यांसारख्या संगीत कलाकारांना एकाच मालिकेत एकत्र आणणे सोपे नव्हते. जी गोष्ट सोपी असते, तिच्यात आंतरिक ‘चमक’ नसते. मालिका तांत्रिकदृष्ट्याही खूप मजबूत आहे. संदीप यादवची सिनेमॅटोग्राफी, मंदार खानविलकरचं एडिटिंग, अर्पणा राणाचं प्रॉडक्शन डिझायनिंग, प्रियंका मुंदडाचे कॉस्च्युम आणि कुणाल पवारचं कलादिग्दर्शन हे सगळं आपापल्या जागी चोख आहे. मालिकेत कित्येकदा अपशब्दांचा वापर असल्याने घरातील मोठ्या टीव्हीवर पाहण्याआधी ब्लूटूथ इअरफोन घातलेला बरा! गाणी आणि संगीत श्रवणीयच, ती स्पीकरवर ऐकली तरी भारीच वाटतात. लखलखीत तेजाची वाट चोखाळणारा ‘चमक’ खऱ्या अर्थाने चमकदार झालाय!
( संपर्क- sameerbapu@gmail.com)




