कबीररंग: प्रेम बिना धीरज नहीं, बिरह बिना बैराग…

0
18
कबीररंग:  प्रेम बिना धीरज नहीं, बिरह बिना बैराग…


हेमकिरण पत्की2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपल्याला आत्मीय असलेल्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं, तेव्हा ते सगळंच कुठं शब्दांतून व्यक्त होत असतं? प्रेमाची भाषा मौन असल्याचं प्रेमात बुडालेल्या मनाला जाणवत असतं. पण, प्रेम हृदयातून बोलू पाहतं. स्वतःला व्यक्त होता यावं, ही आपल्या हृदयाच्या तळाशी असलेली एक गहिरी आस असते. प्रेम पूर्णपणे व्यक्त होत नसतं, तेव्हा आपल्या डोळ्यांतून घळाघळा आसवं वाहू लागतात.

प्रेमाचा आशय दुसऱ्याला सांगायचा असतो आणि शब्द अपुरे पडतात. प्रेम दुसऱ्यासोबत वाटून घ्यायचं असतं आणि ते साधत नसतं. आपल्या ध्यानात येतं की, प्रेम शब्दांहून खूप व्यापक आहे! शब्द विषयगत आहेत आणि प्रेम अंतरात्म्याची प्रतिती आहे. प्रेमातली आसवं प्रार्थनापूर्ण आहेत, हे जाणवण्याच्या स्थितीत कबीर थेट आपल्या हृदयाशी जोडले जातात. भौतिक जगापलीकडच्या प्रेमाची निरंतर राहणारी खूण आपल्याला दाखवतात.

नेह निबाहै ही बनै,

सोचै बनै आन।

तन दे मन दे शीश दे,

नेह न दीजै जान।।

दोन जिवांतलं प्रेम नात्यातला ओलावा जपत असतं तेव्हा कबीर म्हणतात, तिथं विचार प्रधान नसतो. प्रेमाचं अवतरण मुळी विचार-अविचाराच्या द्वंद्वातून जन्माला आलेलं नसतं. हे प्रेमी जिवांनी जाणलं तर देह, मन आणि बुद्धी यांचं समर्पित होणं सहज होतं. कबीरांचं सांगणं आहे की, या समर्पणाहून प्रेमाचं आटून न जाणं महत्त्वाचं आहे. प्रेमाचं अवतरण जीवनाहून खूप मोठं आहे.

या दोह्यातून मानवी मनाच्या प्रेमभावाचं अखंड असणं कबीर गडद करतात. देह जाऊ देत, पण प्रेम जाता कामा नये. मनानं निर्माण केलेली प्रत्येक वस्तू जाणारी असते; मात्र प्रेम या जगाची निर्मिती नसते. प्रेम करणं, प्रेमपूर्ण जगणं हा आपला स्वभाव असतो, आपलं स्वरूप असतं. म्हणून तर कबीर म्हणतात : ‘नेह न दीजै जान’. केवळ प्रेम आपल्या मागे राहावं!

पिया चाहै प्रेम रस,

राखा चाहै मान।

दोय खड्ग एक म्यान में,

देखा सुना न कान।।

कबीर म्हणतात, प्रेम करणाऱ्यानं एक सूत्र ध्यानात असू द्यावं : ज्याला प्रेमाचा रस चाखायचा आहे, त्यानं समाजातील मान्यता, लोकप्रतिष्ठा, मानपान आणि पत यांचा विचार करता कामा नये. या दोन गोष्टी एकाच हृदयात नांदू शकत नाहीत. प्रेमातील रस हा त्यागामधला असतो, भोगातला नसतो. उदाहरण म्हणून देवावर, देशावर, एखाद्या अमूर्त कलेवर प्रेम करणारी कुणी व्यक्ती आपण पाहिली, तिचं जीवन पाहिलं, तर तिच्या भौतिक जीवनाची फरफट आपल्या ध्यानात येईल. त्या व्यक्तीला केवढ्या तरी सामाजिक उपेक्षेला सामोरं जावं लागतं. कधी कधी तर ती लोकांतील अप्रतिष्ठेच्या खाईत पडलेली असते. प्रेम आत्मप्रतिष्ठा देते. जीवनावरची श्रद्धा आणि विरहार्त असताना सहनबळ देते. कबीर म्हणतात…

प्रेम बिना धीरज नहीं,

बिरह बिना बैराग।

सतगुरु बिन जावै नहीं

मनसा का दाग।।

प्रेम स्वतःला विरघळवून ‘तू’मध्ये मिसळून जातं, तेव्हा काही मागण्याची भावना मनात उरत नाही. केवळ देण्याच्या इच्छेनं हृदय संतुष्ट असतं. असं हृदय खूप सहनशील असतं. ते केवळ आपल्याला लाभलेलं दुसऱ्याला वाटून देत असतं. शुद्ध प्रेमातला विरह देहभेट लांबल्याचा नसतो, तर नुसत्या दर्शनाची आस दुर्लभ झाल्याचाही असतो. विरहाची आर्तता प्रेमळ हृदयाला सामान्य मोहांपासून दूर करते.

कबीर सांगतात, मनावरचे विकारांच्या संस्कारांचे डाग याच भावस्थितीत दृष्टीस पडतात. हेच चेतनेचं उन्नयन असतं. पण, हे डाग पुसले जाण्यासाठी आपल्याहून अधिक शुद्ध चेतनेचं कुणी सहज साधनेतून भेटावं लागतं. ते सद्गुरुच तर असतात! दोन जीवांतल्या प्रेमाचा आलेख हा असा देहभाव, मनोभाव जाणून घेऊन अनासक्त होण्यानं होतो. आपल्यासारख्या भौतिक जगात गुंतलेल्या माणसांना केवळ प्रेमच मुक्त करतं, हे कबीरांचं सांगणं अनंत प्रेमातलं आहे. ते हृदयानं जाणून घेण्यातच आपलं हित आहे.

(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)



Source link