कबीररंग: कहै कबीर तिहू लोक में, सुखी न देखा कोय…

0
13
कबीररंग:  कहै कबीर तिहू लोक में, सुखी न देखा कोय…


हेमकिरण पत्की4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपण प्रपंच, व्यवसाय, आपलं आवडीचं क्षेत्र आणि सामाजिक संपर्क यामुळं वेगवेगळ्या माणसांशी जोडून असतो. त्यांच्या सहवासात राहून आपण आपलं जीवित-कार्य पार पाडत असतो. अशा व्यक्तींचे स्वभाव जाणून घ्यायला आपल्याकडं अवकाश असतो. आपल्या प्रवृत्तींना छेद देणाऱ्या माणसांसोबत कधी आपण स्वस्थपणे राहतो, तर कधी आपल्या मनाला अस्वस्थता येते.

प्रस्थापित समाजव्यवस्थेत आपल्या मनाचं समायोजन करणं खूप आव्हानात्मक आहे. आपल्याला हे कधी कळत असतं, तर कधी कळतही नाही. मनाच्या नकळत्या स्थितीत कुणाच्या संगतीत आपण असावं, याचं यथार्थ ज्ञान होणं खूप महत्त्वाचं आहे. सुसंगत आणि कुसंगत असा वरवरचा भेद न करता सत्संगाचा खरा अर्थ ज्याचा त्यालाच शोधावा लागेल. आपल्याला सत्संगाचा आशय कधी उमजणं शक्य आहे? रोजच्या जगण्यात ज्याच्या संगतीत आपल्याला खरी आवड, मनाचा खरा कल जाणवतो तो सत्संग आहे? की आवड बदलते, कल बदलतो आणि स्वभाव मात्र बदलत नाही, हे ज्याच्या संगतीत कळतं तो सत्संग आहे? की देहा-मनावरच्या संस्कारांनी बांधून घेण्याच्या आपल्या सवयींना जाणून मोकळेपणाची दिशा देणाऱ्याचा निरपेक्ष सहवास हा सत्संग आहे?

जीवनव्यवहारात तत्पर असूनही पुन्हा मोकळं असणाऱ्या सत्त्वशील माणसाची ओढ आपल्या मनाला सतत वाटत असते. आपण त्याच्यासारखं जगावं, त्याच्या ठायी असलेल्या गुणांना जाणून त्याचं अनुसरण करावं, असं आपल्या मनाला नेहमी वाटत असतं. म्हणूनच संगत- कुसंगत यांतल्या भेदानं गोंधळून गेलेल्या आपल्या मनाला सत्संगाविषयीचं कुतूहल वाटत राहतं. कबीर आपल्या दोह्यांतून सत्संगाविषयीचा आशय व्यक्त करतात…

साखी शब्द बहुतै सुना,

मिटा न मन का दाग।

संगति सो सुधरा नहीं,

ताका बडा अभाग।।

आपलं स्वाभाविक कर्म उत्साहानं आणि प्रामाणिकपणानं करणं, हाच आपल्या जीवनातील रुक्षतेला दूर करणारा ओलावा आहे. हा ओलावा आध्यात्मिक ग्रंथांतून, सत्त्वशील माणसांच्या प्रवचनांतून, उपदेशातून आणि मौनसंगातूनही लाभत असतो. पण, आपण खऱ्या प्रेमाचे भुकेले असू तरच हा ओलावा लाभेल. या बदलत्या जगात सूर्य-चंद्र नित्य उजेड देत असतात. भूमी धारण करीत असलेला ओलावा चिरंतन असतो. आपल्या मृत्यूनंतरही सूर्य-चंद्राचा उजेड, भूमीतील हा ओलावा मागं राहणार आहे. तो शाश्वत आहे. सृष्टीतील या नित्यतेला समजून घेऊन आपण रोजच्या जगण्यातले व्यवहार पार पाडले नाहीत, तर आपलं मन निर्मळ राहणार नाही. लख्ख आरशासारख्या असणाऱ्या ग्रंथांच्या जगात आपण डोळे असून अंध असू. संधी असून अभागी असू.

जीवन जोबन राज मद,

अविचल रहै न कोय।

जु दिन जाय सत्संग में,

जीवन का फल सोय।।

आयुष्य, तारुण्य, राज्य आणि तथाकथित सत्तेची धुंदी कायम टिकणारी नाही. या साऱ्या गोष्टी उतार पडणाऱ्या आहेत. एकेक करून माणसाच्या पकडीतून निसटून जाणाऱ्या आहेत. कबीर म्हणतात, जो नाशवंत आणि अविनाशी गोष्टींचा सारासार विचार करत असतो, तोच एकमेव सत्तेला जाणून देहभावाला आणि मनोभावाला बाजूस सारत असतो. तो त्याच्या ठायी असलेल्या शुद्ध ‘मी’ सोबत असतो. बदलत्या निसर्गक्रमाला शांतपणे समजून घेत जीवनगतीनं चालत असतो. कबीर सांगतात की, सत्य जाणणाऱ्या आणि त्याला अनुसरणाऱ्या वडीलधाऱ्यांच्या मार्गानं आपली पावलं पडत जाणं, हा सत्संगच आहे. अशा सत्संगानं आपल्या वृत्तीत चांगला बदल होऊ शकेल.

सार्थक आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेली प्रेम, माणुसकी, करुणा यांसारखी मूल्यं जगणारी कितीतरी सत्त्वशील माणसं आपल्या जन्माआधी या भूतलावर होऊन गेली आहेत. या काळातही अशी थोर माणसं आहेत. त्यांच्या जीविताचा अभ्यास करण्यानं, त्यांच्यासारखाच ध्यास घेण्यानं तसेच आपल्या वाट्याला आलेलं कर्म हे दैव, परिस्थिती किंवा एखादी व्यक्ती यांच्याविषयी तक्रार न करता पार पाडण्यानं भ्रमाची संगत धरण्याची दुर्बुद्धी होणार नाही. अशा संगतीविषयी कबीर म्हणतात…

साद संग अन्तर पडे,

यह मति कबहूँ होय।

कहै कबीर तिहू लोक में,

सुखी न देखा कोय।।

जग सतत बदलत असतं. मृत्यू निश्चित असतो. मग मृत्यू समजून घेऊन बदलत्या स्थितीगतीचा भाव दूर सारून संतांची कायम संगत केली, तर सद्बुद्धी अबाधित राहते आणि तीच अंतरीचा ज्ञानदिवा होते. या तिन्ही लोकांत सत्संगानं चेतवलेला दिवा कुणीच मालवू शकत नाही. भ्रमाचा, भ्रांतीचा आणि अस्तित्व नसलेल्या कुठल्याही वस्तूचा संग जाणून घेतला की, कबीरांचा ‘सत्संगा’चा अर्थ आपल्या हृदयात उतरू शकेल.आपण तो जाणतेपणानं उतरवून घ्यायला हवा.

(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)



Source link