
साहस टाईम्स :- “ चैत्यभूमीचे शिल्पकार : भैय्यासाहेब यशवंतराव आंबेडकर”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र यशवंत ‘भैय्यासाहेब’ आंबेडकर यांचा जन्म १२ डिसेंबर १९१२ रोजी मुंबई येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना न्यूमॅनेटीक आणि पोलिओसारख्या रोगांनी ग्रासले होते. गावठी औषधोपचारांमुळे त्यांना त्यातून बरे करण्यात आले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्यांचा विवाह १९ एप्रिल रोजी मीराताईंसोबत झाला.
भैय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा करून घेतला नाही. त्यांनी आपले आयुष्य आपल्या कर्तृत्वाने उभे केले. त्यांनी प्रथम सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळ परिसरातील बांधकाम व्यवसाय सुरू केला. या उद्योगात त्यांनी कोणालाही वाटेकरी केले नाही. त्यांचा व्यवसाय यशस्वीपणे चालत होता.
यानंतर त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी ‘भारतभूषण प्रिंटिंग प्रेस’ हा छापखाना सुरू केला; नंतर त्याचे नाव ‘बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस’ असे ठेवण्यात आले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या सर्व मुखपत्रांचे व्यवस्थापन भैय्यासाहेबच पाहू लागले. जनता, प्रबुद्ध भारत या नियतकालिकांचे ते सर्वेसर्वा होते. या प्रेसमध्ये बाबासाहेबांचे नामांकित ग्रंथ जसे “Thoughts on Pakistan”, “Federation Versus Freedom”, “Thoughts on Linguistic States” – हे भैय्यासाहेबांनीच छापले. Thoughts on Pakistan या ग्रंथाची अर्पणपत्रिका बाबासाहेबांनी रमाबाईंना समर्पित केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार वि.गो. आपटे लिखित “बौद्धपर्व” हा ग्रंथही त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने प्रकाशित केला. भैय्यासाहेबांचे लिखाण तर्कशुद्ध, विचारसमृद्ध आणि वाक्प्रचारांच्या प्रभावी वापरासाठी प्रसिद्ध होते.
स्मारक उभारणीत मोठा सहभाग : भैय्यासाहेबांनी डॉ.बाबासाहेबांची अनेक महत्त्वपूर्ण स्मारके उभारली. मुंबईतील डॉ. आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन २ एप्रिल १९५८ रोजी झाले व उद्घाटन २२ जून १९५८ रोजी झाले. कफ परेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्याच्या कामात त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. २६ जानेवारी १९६२ रोजी पुतळ्याचे अनावरण व्हावे असा आग्रह त्यांनी धरला आणि आवश्यक निधी स्वतः देऊन ते साध्य केले.
चवदार तळे क्रांतीस्थळावर बाबासाहेबांच्या मनुस्मृती दहनाच्या स्मृतीस्थळासाठी क्रांतीस्तंभ उभारण्याचा आग्रहही भैय्यासाहेबांनीच धरला. चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने दि.२०-३- १९५७ रोजी BMS कडे ४० x ४० ची जागा मागितली. BMS ने ८ x ८ ची जागा मंजूर केली. परंतु मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही असा पवित्रा भय्यासाहेबांनी घेतला . अखेर BMS improvement committee ने ४० x ४० ची जागा मान्य केली . शेड्युल कास्ट फेडेरेशन आणि रिपब्लिकन पक्ष एकसंघ होता तो पर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनताही आपला पै पैसा देत होती. लोकांनी स्टेट बँकेसमोर रांगा लावून स्मारक निधीसाठी पैसे जमा केला, आणि भैय्यासाहेब आंबेडकर कुलाबा –दहिसर–कल्याण भागात फिरून जनजागृती करत होते.
भीम-ज्योत : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अमृत महोत्सव : १९६६ साली डॉ.बाबासाहेबांचा ७५ वा जन्मदिवस “अमृत महोत्सव” स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय भैय्यासाहेबांनी घेतला. त्यानिमित्त ‘भीम-ज्योत’ महू–मुंबई अशी काढण्यात आली. २७ मार्च १९६६ रोजी या ज्योतीचे प्रज्वलन भारताचे मजूरमंत्री ना. जगजीवनराम यांच्या हस्ते झाले व अध्यक्षस्थानी खासदार दादासाहेब गायकवाड होते. भीम-ज्योत महू ते चैत्यभूमी असा प्रदीर्घ प्रवास करत आली आणि प्राप्त झालेल्या धम्मदानातून चैत्यभूमीचे स्मारक उभारण्यात आले.
धम्मकार्याचा अखंड ध्यास : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर भैय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले.
“भारत बौद्धमय करीन” हा बाबासाहेबांचा संकल्प त्यांनी उराशी बाळगला. धम्मदीक्षा, धम्मपरिषदा, मेळावे, गावोगावी विहारांचे उद्घाटन यांमधून त्यांनी धम्मकार्याला गती दिली. विधानपरिषदेत असताना दलित समाजाच्या हक्कांबद्दल त्यांनी जोरदार भूमिका मांडली. पंतप्रधान मोरारजी देसाई यांना भेटून बौद्धांच्या सवलतींबाबत त्यांनी पाठपुरावा केला.
१९६८ मध्ये मुंबई येथे भव्य धम्मपरिषद आयोजित केली. प्रमुख पाहुणे दलाई लामा होते. या परिषदेत बौद्ध संस्कार विषयक आचारसंहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली व “बौद्ध जीवन संस्कार पाठ” हे पुस्तक प्रसिद्ध झाले. भैय्यासाहेब ‘बौद्धाचार्य’ पदाचे जनक मानले जातात. धम्मप्रसाराचा एक अनोखा भाग म्हणजे १९६७ च्या धम्मचक्रप्रवर्तन दिनी भैय्यासाहेबांनी स्वतः श्रामणेर दीक्षा घेतली, व त्यांचे दीक्षानाम “महापंडित काश्यप” ठेवण्यात आले. काही काळ ते चैत्यभूमीतच राहिले.
१९५९ मध्ये संघरक्षित लंडनहून भारतात आल्यावर त्यांनी भैय्यासाहेबांना धार्मिक कार्य सोपविण्याची आणि त्याबदल्यात मानधन देण्याची प्रस्तावना केली. परंतु स्वाभिमानी भैय्यासाहेबांनी स्पष्ट सांगितले—
“मी माझ्या बापाची संस्था विकणार नाही. काम करायचे असेल तर आमच्या संस्थेतच करा.”
आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी आणि बौद्धधम्म प्रसारासाठी अर्पण केले. ते चैत्यभूमीचे शिल्पकार, महापंडित काश्यप, आणि खऱ्या अर्थाने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर होते.
जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम.
जय भीम! जय भारत! नमो बुद्धाय!
संकलन : सोमीनाथ पोपट घोरपडे
सामाजिक कार्यकर्ता, भारतीय बौद्ध महासभा








