सातारा : राजमाता मुख्यमंत्र्यांना भेटल्या | पुढारी

0
15


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  ऐतिहासिक पोवई नाका परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही स्मारक असू नये, हे सांगण्यासाठी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले या गुरुवारी थेट मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना वर्षा निवासस्थानी जाऊन भेटल्या. पोवई नाक्यावर दुसरे काही झाले तर जनक्षोभ उसळेल, असेही राजमातांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर यासंदर्भात मी स्वत: सर्व संबंधितांशी बोलेन. पोवई नाक्यावरचा निर्णय शिवप्रेमींच्या भावना विचारात घेऊनच होईल. आपण निश्चिंत राहा, अशी ग्वाही मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे राजमातांनी सांगितले.

ऐतिहासिक पोवई नाका परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या नावे चौक (आयलँड) विकसित करण्याबाबत पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठकही झाली आहे. हा चौक नेमका कुठे असेल? याबाबत अद्यापही कोणत्याच यंत्रणेकडून स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, हा विषय अजेंड्यावर आल्यावर सोशल मीडियातून जोरात कालवा-कालव सुरू झाली. त्यानंतर सोशल मीडियातील प्रतिक्रियांची दखल माध्यमांनीही घेतली. त्यातच सामाजिक संघटना आक्रमक झाल्या. दस्तुरखुद्द राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले या शिवतीर्थावर गेल्या. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला तर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी फेसबुकवरून आवाज टाकत सातारकरांच्या अस्मितेवर घाला सहन करणार नाही, असा सज्जड इशारा दिला. पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्यातर्फे जयवंत शेलार यांनी त्यांच्या सहीचे पत्रक काढले. त्यात पोवई नाक्यावर शिवतीर्थ वगळून अन्य जागी बाळासाहेब देसाई यांचे स्मारक करणार असल्याचे म्हटले आहे. शिवतीर्थाचे कोणतेही नामांतर केले जाणार नसल्याचेही पालकमंत्र्यांच्या नावे काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पोवई नाक्यावरचा हा वाद पेटला असतानाच गुरूवारी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी मुंबईत जावून वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व खा. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. ऐतिहासिक पोवई नाक्याचे महत्व त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठेच नाही असा पुतळा पोवई नाक्यावर शिवाजी सर्कल येथे आहे. अलीकडे या भूमीला शिवप्रेमींनी शिवतीर्थ हे नाव दिले आहे. याच परिसरात पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी त्यांचे आजोबा स्व. बाळासाहेब देसाई यांच्या नावाने स्मारक उभे करण्याचा, चौक सुशोभित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सातारकरांनी तीव्र विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व छत्रपती घराण्यातील कर्तृत्ववान राजांच्याव्यतिरिक्त त्या परिसरात कोणाचेही पुतळे व स्मारक उभे होवू देणार नाही. तसा प्रयत्न झाला तर जनक्षोभ उसळेल, अशी माहिती राजमातांनी मुख्यमंत्र्यांना दिली. शिवप्रेमी व सामाजिक संघटना या विषयात आक्रमक असल्याचे राजमातांनी मु़ख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. लोकभावनेचा विचार आपण केला पाहिजे, असेही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे राजमाता म्हणाल्या.

शिवप्रेमींची भावना व लोकभावना विचारात घेवून पोवई नाक्यावरील निर्णय होईल. या संदर्भात आपण स्वत: सर्व संबधितांशी बोलू, असे मुख्यमंत्र्यांनी आपणाला सांगितल्याचे राजमातांनी सांगितले. यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे समर्थक पंकज चव्हाण हेही उपस्थित होते.

आजच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष

पोवई नाक्यावरचा वाद शिगेला पोहोचला असतानाच तो मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत गेला असतानाच या विषयाच्या अनुषंगाने आज दि. 16 रोजी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीत पालकमंत्री काय निर्णय देणार? बैठकीवेळी काय काय घडणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. बैठकीनंतर 5.15 मिनिटांनी पालकमंत्र्यांची पत्रकार परिषदही होणार आहे. त्यामुळे शिवप्रेमींचे व सातारा जिल्हावासीयांचेही लक्ष या विषयाकडे आहे.

The post सातारा : राजमाता मुख्यमंत्र्यांना भेटल्या appeared first on पुढारी.



Source link