सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेसाठी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व अपक्ष यांच्या भाजपविरोधी आघाडीने एकत्रित ताकद दाखवत सत्तास्थापनेच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता कोणाच्या हाती जाणार, याबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या अतिआत्मविश्वासाने आता त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची ही संधी गमावली आहे.
सातारा जिल्ह्यात अत्यंत चुरशीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली. कोरेगाव आणि फलटण तालुके वगळता बहुतांश तालुक्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट, शिवसेना व मित्र पक्षांनी भाजपविरोधी आघाडी करत थेट लढत दिली होती. मतमोजणीनंतर या आघाडीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आकडेवारीतून स्पष्ट झाले राजकीय गणित…
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निकालानुसार भाजप 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा गाठण्यात भाजप अपयशी ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसला 20, शिवसेनेला 15, राष्ट्रीय काँग्रेसला 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 तर अपक्ष व इतरांना 1 जागा मिळाली आहे. एकूण 65 सदस्यांच्या सातारा जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 33 जागांची गरज राहिली आहे.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भाजपविरोधी आघाडीची एकत्रित सदस्य संख्या 37 वर पोहोचत असल्याने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याची संधी या आघाडीकडे झुकलेली दिसत आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आगामी काळात तीव्र राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
साताऱ्यात सत्तास्थापनेची रणधुमाळी सुरू
सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी बहुमताच्या जवळ असलेल्या भाजपविरोधी आघाडीला संधी अधिक असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी कोणत्या पक्षाचा उमेदवार पुढे येणार, कोण कोणाला पाठिंबा देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा जिल्ह्यातील पंचायत समित्यांपैकी फलटण, माण येथे समसमान बलाबल झाले असून सभापतींचा निर्णय चिठ्ठीवर राहणार आहे.
सातारा: 16 जागांमध्ये भाजप 10, राष्ट्रवादी 5, शिवसेना 1
महाबळेश्वर : 4 जागांमध्ये 2 सेना, राष्ट्रवादी 2,
वाई : 8 जागामध्ये राष्ट्रवादी 5 , भाजप 3
खंडाळा : 6 जागांमध्ये राष्ट्रवादी 4, भाजप 2
कोरेगाव : 12 जागांमध्ये 9 राष्ट्रवादी, शिवसेना 2, भाजप 1
सातारा : 16 जागंमध्ये 10 भाजप, राष्ट्रवादी 5, सेना 1
पाटण : 14 पैकी 13 शिवसेना, भाजप 1
खटाव : 14 जागांमध्ये 8 भाजप, राष्ट्रवादी 6
माण : 10 जागांमध्ये 5 भाजप, राट्रवादी 5
जावली : 6 जागांमध्ये भाजप 3, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1
सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटामध्ये :
भाजप 27, राष्ट्रवादी 20, शिवसेना 15, काँग्रेस 1, स्वाभिमानी 1, अपक्ष 1
सातारा : 8 जागांमध्ये भाजप 5, राष्ट्रवादी 2, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1
कराड दक्षिण व उत्तर : 12 जागांमध्ये भाजप 8, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 2, राष्ट्रीय काँग्रेस 1, अपक्ष 1
महाबळेश्वर : 2 जागांमध्ये राष्ट्रवादी 1, शिवसेना 1
खंडाळा : 3 गटामध्ये राष्ट्रवादी 2, भाजप 1
कोरेगाव : 6 जागांमध्ये भाजप 1, राष्ट्रवादी 3, शिवसेना 2
पाटण : 7 जागांपैकी शिवसेना 6, भाजप 1
फलटण : 8 जागांपैकी शिवसेना 5, भाजप 2, राष्ट्रवादी 1
माण : 5 जागांपैकी राष्ट्रवादी 3, भाजप 2
खटाव : 7 जागांपैकी भाजप 4, राष्ट्रवादी 3
वाई : 4 जागांपैकी राष्ट्रवादी 3, भाजप 1,
जावली : 3 जागांपैकी भाजप 2, शिवसेना 1
राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन जिल्हा परिषद मध्ये सत्ता स्थापन करणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. जिल्ह्यामध्ये भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येणार का ते पाहावं लागेल. निवडणुकीपूर्वी मंत्री शंभूराजे देसाई यांच्या घरी झालेली चहा पे चर्चा यशस्वी झाली असल्याचं पाहायला मिळतंय. रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन काका पाटील यांसारखे मातब्बर नेतेमंडळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी भेटीला गेले होते.







