खटाव; अविनाश कदम : या वर्षी बाजारात वाढलेल्या उच्चांकी मागणीमुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत आले पिकाला सर्वाधिक दर मिळत आहे. आल्याच्या 500 किलोच्या प्रति गाडीस मालाच्या प्रतवारीनुसार 55 ते 65 हजार रुपये दर मिळत आहे. बाजारात एक गाडी आल्याचे थेट एक तोळा सोन्याशी टशन सुरू असल्याने आले उत्पादक शेतकर्यांत आनंदाचे वातावरण आहे. शेतातून काढलेले आले धुताना चक्क डॉल्बीच्या तालावर ताल धरला जात असल्याने शेतकर्याचा नादच खुळा, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
गेली चार ते पाच वर्षे आले पिकाच्या दरात कायम घसरण होत होती. त्यामुळे आले उत्पादकांना सलग आणि मोठा आर्थिक फटका बसला. गेल्या काही कालावधीत शेतकरी चांगला नफा मिळेल या आशेने आले पिकासाठी लाखो रुपयांचा भांडवली खर्च करत होते. मात्र, बाजारात योग्य दर मिळत नसल्याने आले पीक आतबट्ट्याच ठरत होते.
चालू वर्षीच्या गेल्या महिन्यापासून आल्याच्या दरात भरघोस वाढ झाल्याने अडचणीत आलेल्या आले उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 500 किलोंच्या एका गाडीला सरासरी 60 ते 65 हजारांचा दर मिळू लागला आहे. गेल्या आठवड्यात हाच दर 68 हजार रुपयांवर गेला होता. बाजारात सध्या सोन्याला एका तोळ्याला 63 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे एक तोळा सोने आणि एक गाडी आल्याचे जोरदार टशन सुरु आहे.
एखाद्या पिकाला उच्चांकी दर मिळू लागला की काही अनधिकृत व्यापार्यांकडून शेतकर्यांची आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना वाढतात. सध्या आल्याच्या गाडीला उच्चांकी 65 हजार रुपये दर मिळत आहे. प्रति एकर सरासरी पंधरा ते वीस गाड्यांचा उतारा धरला तरी एका एकरातील आल्याची रक्कम जवळपास 10 ते 12 लाखांच्या घरात जाते. परिणामी, आले खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. त्यामुळे आले उत्पादक शेतकर्यांनी ज्या व्यापार्यांचे बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहार चोख असतील आणि जे बाजार समिती व पणन संचलनालयाचे नोंदनोंदणीकृत व्यापारी असतील अशाच खात्रीशीर व्यापार्यांना आल्याची विक्री करणे आवश्यक आहे. जेणेकरून संभाव्य फसवणूक टाळली जाईल.
सध्या उच्च दर्जाच्या आल्याची परदेशात मागणी वाढली आहे. मागच्या वर्षी भारतातून मसाल्याची जेवढी निर्यात झाली, त्यात आल्याचा समावेश जास्त होता. आल्यापासून तयार होणारी सुंठदेखील बाजारात रूबाब दाखवत आहे. देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरांतील बाजारपेठांमध्ये आल्याची मागणी कायम आहे. त्यामुळे भविष्यात आले शेती आणखी फायदेशीर ठरणार आहे.
अनेकांची व्यावसायिक आणि राजकीय कारकीर्द घडली…
12 वर्षांपूर्वी आल्याला उच्चाकी दर मिळाला होता. तेव्हा उत्पादनही चांगले निघाले होते. शेतकर्यांना त्यावेळी काही लाखांपासून अगदी एक, दोन कोटी रुपयांचे उत्पादन निघाले होते. त्या काळात आल्यातील पैशांच्या जोरावर काहींनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यावर अनेकांची राजकीय कारकीर्दही घडली होती. आज त्यातील काही जण तालुक्याच्या तसेच जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करून आहेत. अनेकांनी आल्यातून मिळालेल्या पैशांतून व्यवसाय सुरू केले होते. आज बरेच जण व्यवसायातही स्थिर झाले आहेत.
सन 2012 नंतर प्रथमच आल्याच्या दराने यंदा 60 हजारांचा टप्पा पार केला आहे. सलग चार वर्षे दर कोसळूनही ज्या शेतकर्यांनी आल्याचे पिक घेतले आहे, त्यांना भरघोस नफा मिळत आहे. बियाणाच्या आल्याला तर सोन्याहून अधिक दर मिळत आहे. पुढील वर्षी आले लागवड क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे.
– प्रा. एस. वाय. फडतरे (आले उत्पादक , फडतरवाडी )








