- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Special Article Written By Sharad Baviskar On Literature Marathi Language
प्रा. शरद बाविस्कर7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मराठीत साहित्य लिहिलं जातं. संमेलनं भरवली जातात. पुरस्कार दिले जातात. मग साहित्याच्या नावावर चालणारा हा व्यवहार सामान्य वाचकांना स्पर्श करताना का दिसत नाही? महाराष्ट्रासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या राज्यात चालणाऱ्या किरकोळ साहित्य व्यवहाराची कारणमीमांसा झाली पाहिजे. ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे की, मराठीतील वाचनसंस्कृतीचा आणि एकूणच साक्षरतेचा इतिहास तसा फार मोठा नाही. साहित्य व्यवहारातील लेखक, वाचक, प्रकाशक आणि वितरकांसोबत एकूण समाजाचा साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? जनसामान्यांना साहित्य निरर्थक बाब वाटत तर नाही ना? मराठी साहित्याचा विचार मराठीतील एकूणच ज्ञानव्यवहाराशी तोडून करता येणार नाही. कुठल्याही भाषेतील साहित्याचा सर्वांगीण विकास त्या भाषेतील विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या भाषेच्या प्रगतीवर अवलंबून असतो.
मराठीत मात्र साहित्याबरोबर समीक्षात्मक, वैचारिक आणि इतर ज्ञानशाखांतील कसदार लिखाणाचा अभाव दिसून येतो. मराठी साहित्याचा विचार करता सध्याची परिस्थिती फार आशादायक दिसत नाही. मराठी साहित्यिकाने समाजात अजून स्वतःचं स्वायत्त स्थान निर्माण केलेलं नाही. तो अजूनही पार्ट टायमर आहे. पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर लक्षात येतं की, मराठीत आधुनिक साहित्य जवळपास दिसत नाही. लहान शहरांमध्ये तर पुस्तकांचं दुकान म्हणजे पाठ्यपुस्तकांचं दुकान! पुणे, मुंबईसारख्या शहरांतील पुस्तकांच्या दुकानातही बहुधा मराठी साहित्य कुठे तरी कोपऱ्यात धार्मिक आणि परंपरागत पुस्तकांच्या ढिगाआड दबलेलं दिसतं.
भाषाशास्त्र, समाजशास्त्र आणि सौंदर्यशास्त्रीय दृष्टीने विचार केला, तर बहुतेक साहित्यिकांना साहित्याच्या भाषेचं भान दिसत नाही. एक तर ‘प्रमाण’ भाषेच्या दडपणाखाली लिखाण होताना दिसतं किंवा अर्थक्षय झालेले शब्दप्रयोग आणि शैलीच्या बाबतीतील तोचतोचपणा आढळून येतो.
फ्रेंच तत्त्वज्ञ जिल दलज (Gilles Deleuze) म्हणतो त्याप्रमाणे, लेखकाला स्वतःच्या भाषेतच ‘विदेशी’ भाषा निर्माण करता आली पाहिजे. ती स्वतःच्याच भाषेत निर्माण केलेली एका प्रकारची काही प्रमाणात तरी फारकत घेणारी असली पाहिजे. अशा प्रकारे प्रयत्नपूर्वक निर्माण केलेल्या स्वतःच्याच भाषेतील ‘विदेशी’ भाषेत साहित्यातील नवता, जिवंतपणा, अस्सलपणा, ताजेपणा व सर्जनशीलता टिकवत जगण्यातील असंख्य शक्यता टिपण्याची क्षमता असते.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मराठी साहित्याची भाषा खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्रीय’ झालेली दिसत नाही. ‘कोसला’ ‘बलुतं’सारख्या मोजक्याच साहित्यकृती आहेत, ज्या महाराष्ट्रीयन मराठीत लिहिल्या गेल्या आहेत, ज्या म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात वाचल्या जातात. साहित्यातील मराठी भाषा जेव्हा ‘महाराष्ट्रीयन’ होते, तेव्हा तिच्यात एकाच वेळी देशीयता आणि वैश्विकता नांदत असते. तत्त्वज्ञानात्मक दृष्टीने हे दोन शब्द एकमेकांना छेद देणारे नसून एकाच रेषेवरील दोन बिंदू आहेत आणि एखादा साहित्यिक या दोन बिंदूंचा अंतर्भाव करणारं लिखाण करतो तेव्हा महाराष्ट्रातील वाचक जरूर दाद देतो. पण सध्याच्या साहित्य निर्मितीतील मारक गोष्टींमुळे समाजात साहित्यिकांची प्रतिमा ‘साहित्य’ या शब्दाला न शोभणारी अशी आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता, साहित्यिक हा गोंजारता येणारा पाळीव प्राणी होताना दिसत आहे. अर्थसत्ता आणि राज्यसत्तेपुढे झुकणाऱ्या दरबारी, स्वत्त्वहीन साहित्यिकापाशी जनसामान्यांना वाचनाचं वेड लावण्याची क्षमता असू शकत नाही.
संपर्क
प्रा. शरद बाविस्कर
} प्रसिद्ध लेखक,
‘जेएनयू’मध्ये प्राध्यापक
} फ्रेंच साहित्य, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, प्रशिक्षक
}‘भुरा’ हे स्वकथन प्रसिद्ध
sharadcrosshuma@gmail.com






