अतुल कहाते12 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘एआय’मुळे आपल्या जगण्याशी संबंधित अनेक क्षेत्रांभोवतीच्या सीमा अस्तित्वहीन होणार आहेत. यातून कोणकोणत्या क्षेत्रात किती भन्नाट प्रकारची नवनिर्मिती होऊ शकेल, याचा तूर्तास अंदाज लावणंही अवघड आहे. निर्मिती, कला, नवा विचार, सर्जनशीलता अशा सगळ्या गोष्टींची मापकं पूर्णपणे बदलतील. अर्थात, या तंत्रज्ञानाचे काही धोकेही आहेत. पण, त्यापासून स्वत:ला दूर ठेवत नवबुद्धिमत्तेचा नेमका फायदा करून घेणं ज्यांना जमेल, त्यांना हे पाऊल नव्या यशाच्या अनेक संधी उपलब्ध असलेल्या काळाची कवाडे उघडून देईल!
तंत्रज्ञानाच्या विश्वात गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या अफाट प्रगतीमुळे मानवी आयुष्य अत्यंत सुकर, गतिमान आणि सुसह्य झालेलं आहे. नवनव्या आणि अद्भुत वाटाव्यात अशा शोधांमुळे आपण अवाक् होऊन जावं अशी परिस्थिती तंत्रज्ञानाच्या जगात बघायला मिळते. आर्टिफिशयल इंटेलिजन्स (एआय) नावाच्या जादूमुळे तर मानवी बुद्धिमत्ता आणि संगणकीय क्षमता यांच्यामधला फरक धूसर होत जात जणू संपुष्टातच येईल की काय, असं वाटायला लागलं आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीची उदाहरणं आपल्याला अगदी रोजच्या आयुष्यात कित्येकदा बघायला मिळतात. अगदी अलीकडेपर्यंत आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल, तर तिथं कसं जायचं याविषयीच्या अनेक गोष्टी माहीत करून घ्याव्या लागत. गाडीने जायचं असेल, तर मधल्या खुणा जाणून घेणं अनिवार्य असे. आता मात्र अगदी नवखा माणूससुद्धा जगाच्या पाठीवर कुठेही गुगल मॅप्स वापरून आरामात फिरू शकतो. भाषेची अडचण दूर करायला गुगल ट्रान्स्लेट आहे. भारतात बसून जगभरात कुठेही जाण्यासाठी तसंच तिथे राहण्यासाठी सगळी व्यवस्था करता येते. खाण्यापिण्याच्या पदार्थांपासून किराणा मालापर्यंत सगळं ऑनलाइन मागवता येतं. गाडी चालवत असताना पार्किंगसाठी किंवा रिव्हर्स घेताना कॅमेऱ्यातून मागचं दृश्य अचूकपणे दिसणं, आजूबाजूने जात असलेली वाहनं अगदी जवळ असतील, तर त्याविषयी इशारा मिळणं, अशा अनेक सुविधा तर या नवतंत्रज्ञानाने दिल्या आहेतच.
आर्थिक क्षेत्रात तर तंत्रज्ञानामुळे अक्षरशः किमयाच घडली आहे. घरबसल्या एका तासात बँक खातं उघडता येईल, असं आपल्याला काही वर्षांपूर्वी कुणी सांगितलं असतं, तर आपण त्याला वेड्यात काढलं असतं. आता मात्र ते सहजपणे करता येतं. चुटकीसरशी अगदी क्षणार्धात कुणालाही पैसे पाठवले जाऊ शकतात, त्यासाठी बँकेत हेलपाटा घ्यावा लागत नाही. सगळी बिलं घरबसल्या भरता येतात. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, विमा, कर्ज, ठेवी, विविध आर्थिक योजना हे सगळं ऑनलाइन झाल्यामुळं आपले या बाबतींमधील कष्ट खूप कमी झाले आहेत.
व्हॉट्सॲप या एका ॲपमुळे तर संवादातील सगळ्या भिंती पार तोडून टाकल्या आहेत. जगभरातील कुणाशीही हवं तेव्हा संभाषण साध्य करून देणाऱ्या या तंत्रामुळं आता संपर्क साधण्यातील आडकाठी दूर झाली आहे. एकमेकांना संदेश धाडण्याशिवाय प्रत्यक्ष बोलणं, एकमेकांना बघणं, क्षणार्धात डॉक्युमेंट किंवा फोटो तसंच व्हिडिओ पाठवता येणं या सुविधा निव्वळ थक्क करून सोडणाऱ्या आहेत.
लोकांना आपल्या आरोग्याची, व्यायामाची काळजी घेता यावी, यासाठीची अनेक उपकरणं आता सर्रास वापरली जातात. आपण किती पावलं चाललो किंवा धावलो, किती कॅलरी जाळल्या, आपला रक्तदाब किती आहे, आपल्या हृदयाचे ठोके ठीक आहेत ना, रक्तामधलं इन्सुलिन कमी झालं असेल, तर ते योग्य प्रमाणात आपोआप आपल्या रक्तात टोचलं जाणं हे सगळं अनेक लोक आता सहजपणे मोजतात किंवा साध्य करतात. याच्या जोडीला डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा यांच्या दिमतीला असलेली असंख्य उपकरणं आधुनिक उपचारांसाठी वरदान ठरली आहेत.
एकट्या राहणाऱ्या आणि तसं न राहणाऱ्या लोकांसाठी तंत्रज्ञान म्हणजे एकटेपणावरचा उतारा ठरलं आहे. नवनव्या गोष्टी शिकून घेणं, मनोरंजन किंवा करमणूक, आपल्या आवडीचे कार्यक्रम बघणं, आप्तेष्टांशी संपर्कात राहता येणं या गोष्टी आताच्या जमान्यातील एकाकी आयुष्यात अगदी मदतीला धावून आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या गोष्टीचं महत्त्व खूपच जास्त आहे. शिवाय, घरबसल्या अक्षरशः कुठलीही गोष्ट शिकून घेण्याची सोय आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झाली आहे. त्यासाठी कुठल्याही महाविद्यालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. हार्वर्ड, एमायटी यांसारख्या जगद्विख्यात विद्यापीठांचे अभ्यासक्रम घेऊन ते पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीनं पूर्ण करणं आता शक्य झालं आहे. त्याला वय, ठिकाण, पार्श्वभूमी या कशाचंच बंधन नाही.
चॅट जीपीटी नावाच्या अल्लाउद्दीनच्या दिव्याने तर लोकांना अक्षरशः अचंबित करून सोडलं आहे. वाटेल त्या विषयावरचा, वाटेल तितका क्लिष्ट प्रश्न विचारा आणि त्याचं अचूक उत्तर मिळवा, असा हा महाथरारक प्रकार आहे. इतकंच नव्हे, तर आधीच्या प्रश्नाला किंवा त्यावर चॅट जीपीटीनं दिलेल्या उत्तराला धरून पुढचा प्रश्न विचारला, तर जणू समोरचा माणूस आत्तापर्यंतच्या संभाषणाला आधारून पुढचं उत्तर देईल, अशी हुशारी त्यात आहे. याचं पुढचं पाऊल म्हणजे, त्याला आपण समजा एखादं चित्र दाखवलं, तर त्या चित्रामधला मजकूर वाचण्याची क्षमता आता चॅट जीपीटीमध्ये आली आहे. उदाहरणार्थ, समजा एखाद्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील प्रयोगाची आकृती आपण चॅट जीपीटीला दाखवली, तर त्याचा अर्थ लावून तो प्रयोग समजून सांगणं त्याला जमू शकतं. ही फक्त झलक झाली. एकूणच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात पुढच्या पाच वर्षांमध्ये घडू शकणाऱ्या गोष्टी अक्षरशः विज्ञानकथा वाटतील अशा असतील.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं म्हणजे एआय तंत्रज्ञानाचं पुढचं पाऊल म्हणजे “जनरेटिव्ह एआय’. यामुळे तर अक्षरशः धुमाकूळ माजू शकतो. अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचं, तर सध्याचं ‘एआय’ आत्तापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे पृथक्करण तसंच विश्लेषण करणं, अशी कामं करू शकतं. म्हणजेच आत्तापर्यंत काय घडलं आहे, त्यानुसार भाकीत करू शकण्याची क्षमता ‘एआय’मध्ये आहे. असं असलं, तरी नवनिर्मिती करणं किंवा त्यासाठीची सर्जनशीलता असणं हे सध्याच्या ‘एआय’ला जमत नाही. उदाहरणार्थ, आपण शास्त्रीय संगीतातील एखाद्या रागाचे अनेक नमुने ‘एआय’ला ऐकवले आणि त्याला सांगितलं की, ‘बाबा रे, हा यमन राग..’ तर त्यानंतर जेव्हा कधी आपण त्याला यमन रागामधलं एखादं गाणं ऐकवू, तेव्हा तो आपल्याला सांगेल की हा यमन राग आहे. ‘जनरेटिव्ह एआय’ या तंत्रज्ञानाची कमाल म्हणजे ते आधी दिलेल्या माहितीनुसार राग तर ओळखू शकेलच, पण आत्तापर्यंत अस्तित्वात नसलेल्या नव्या रागाची निर्मितीसुद्धा ते करू शकेल!
‘एआय’मुळे आपल्या जगण्याशी संबंधित अनेक क्षेत्रांभोवतीच्या सीमा अस्तित्वहीन होणार आहेत. यातून कोणकोणत्या क्षेत्रात किती भन्नाट प्रकारची नवनिर्मिती होऊ शकेल, याचा तूर्तास अंदाज लावणंही अवघड आहे. निर्मिती, कला, नवा विचार, सर्जनशीलता अशा सगळ्या गोष्टींची मापकं पूर्णपणे बदलून जातील. अर्थात, या तंत्रज्ञानाचे काही धोकेही आहेत. पण, या धोक्यांपासून स्वत:ला दूर ठेवत नवबुद्धिमत्तेचा नेमका फायदा करून घेणं ज्यांना जमेल, त्यांना हे पाऊल नव्या यशाच्या अनेक संधी उपलब्ध असलेल्या काळाची कवाडे उघडून देईल!
(संपर्कः akahate@ gmail.com)





