रसिक स्पेशल: मराठी साहित्याचा उद्याचा वाचक कोण?

0
13
रसिक स्पेशल: मराठी साहित्याचा उद्याचा वाचक कोण?


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special Article Written By Dasu Vaidya On Marathi Literature Reader | Who Is Tomorrow’s Reader Of Marathi Literature?

दासू वैद्य5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

जागतिकीकरणाच्या परिणामांचे परिपूर्ण निष्कर्ष हाती आलेले नसले, तरी माणसाचे एकूण जगणे भिंगुळवाणे झाले आहे. जगण्यातील झगमगाटाबरोबरच आतबाहेरचा गोंगाट वाढतच चालला आहे. नैतिकतेच्या अध:पतनाचा स्वीकार, मूल्यांचं बेपत्ता होणं, धर्म-जातीची जाणीव प्रबळ होणं, समाजमाध्यमाचा स्वैराचार, वाढत चाललेली आत्मकेंद्री वृत्ती, राजकारणाने केलेला भ्रमनिरास, भौतिक गोष्टींमागे होणारी फरफट, शेती नि शेतकऱ्यांचे न सुटणारे प्रश्न, पर्यावरणाचं वाटोळं, जागतिक माज -शिरजोरी आणि या सगळ्यात अधिकच सैरभैर झालेला माणूस असा काहीसा भोवताल आहे. साहित्य निर्मितीच्या दृष्टीने ही इष्टापत्ती आहे, तशीच ती दमछाक करणारीही गोष्ट आहे.

या पार्श्वभूमीवर मराठी साहित्याचा विचार करता, सध्या होत असलेले प्रयत्न तुरळक आहेत. अर्थात प्रत्येक काळात कसदार लेखन मोजकंच असतं. लाखो कवी लिहीत असतात. त्यांच्या शतकांच्या घुसळणीतून एखादे ज्ञानदेव किंवा एखादे तुकोबा निर्माण होतात. म्हणून घुसळणही आवश्यक ठरते. साहित्याची पूर्वीच्या काळाशी तुलना करताना आज कसदार साहित्य निर्माण होते की नाही, असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. कालची आजशी तुलना करणं मी समजू शकतो.

पण, पूर्वीच्या काळी फार चांगलं होतं, आता काही खरं नाही, यात गतकातरता अधिक असते. प्रत्येक काळ त्याची स्वतःची आव्हानं घेऊन येत असतो आणि प्रत्येक काळात या वास्तवाला नेमकेपणाने पकडणाऱ्या साहित्यकृती मोजक्याच असतात. कसदार साहित्याचा धांडोळा घेताना, रोडावत जाणारा चोखंदळ वाचकही विचारात घ्यावा लागेल. मोबाइलचा नाद खुळा मोठा विघातक आहे. त्याने आपलं अवधानच धोक्यात आणलं आहे. त्यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती या हजारो वर्षांच्या रियाजाने प्राप्त झालेल्या कौशल्याचं काय होईल, हा मोठा प्रश्न आहे.

मराठीत भरमसाट कसदार‌ साहित्य निर्माण होत नसेल, पण जे निर्माण होतंय ते किती जण वाचतात? चांगलं साहित्य निर्माण करणं ही कवी-लेखकाची जबाबदारी आहे, त्याप्रमाणेच चांगलं साहित्य आवर्जून वाचण्याची जबाबदारी वाचकांचीही आहे. अजूनही मराठीत हजार पुस्तकांची आवृत्ती नीट खपत नाही.(काही सन्माननीय अपवाद आहेत) हे लक्षण चांगले नाही. या साहित्य व्यवहाराला चालना देणारा वार्षिक उपक्रम म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन! त्यातून अपेक्षित दर्जा फलद्रूप होत नसेलही, तरी त्यामुळे एक सांस्कृतिक वातावरण खेळते राहते. तसे आपण मूळ उत्सवप्रिय आहोत. काहीच‌ न होण्यापेक्षा ही साहित्यिक हालचाल महत्त्वाची ठरते.

आपली पुढची पिढी बऱ्यापैकी इंग्रजी माध्यमातून शिकू लागलीय. त्यामुळे उद्याचा मराठी साहित्याचा नवा वाचक कोण आणि किती असेल, हा गंभीर प्रश्न आहे. दृकश्राव्य माध्यमांचा प्रभावही नाकारता येत नाही. यावर उपाययोजना करण्याऐवजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला की सगळे प्रश्न सुटतील, असा आपला भ्रम आहे. मराठी भाषा अभिजात आहेच, तो सन्मान तिला मिळायलाही हवा. पण कुणीतरी आपल्या भाषेला अभिजात करण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा आपण आपल्या भाषेसाठी काय करतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. मराठी ही व्यवहाराची भाषा व्हायला हवी. मराठी माणसं एकमेकांत संवादासाठी मातृभाषा वापरत नसतील, तर ते धोक्याचे आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी त्या दृष्टीने आत्मपरीक्षण केले पाहिजे.

संपर्क
दासू वैद्य
} कवी, मराठीचे प्राध्यापक
}‘तूर्तास’, ‘तत्पूर्वी’ या कवितासंग्रहांसह
}‘मेळा’, ‘आजूबाजूला’ हे लेखसंग्रह प्रसिद्ध
dasoovaidya@gmail.com



Source link