माझ्या हिश्श्याचे किस्से: जेव्हा जॉनी वॉकर यांच्या ‘गॅरंटी’वर गुरुदत्त यांनी बनवलेला चित्रपट झाला होता सुपर-डुपर हिट!

0
18
माझ्या हिश्श्याचे किस्से:  जेव्हा जॉनी वॉकर यांच्या ‘गॅरंटी’वर गुरुदत्त यांनी बनवलेला चित्रपट झाला होता सुपर-डुपर हिट!


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

एका चित्रपटातील दृश्यामध्ये गुरुदत्त यांच्यासमवेत जॉनी वॉकर. 

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज मी जॉनी वॉकर यांच्याबद्दल सांगणार आहे. त्यांच्याविषयी तुम्हाला बरेच काही माहीतही असेल. पण, ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाहीत किंवा ज्या वाचल्यावर, ऐकल्यावर तुमच्या मनात खोलवर उतरतील, अशाच गोष्टी सांगण्याचा माझा प्रयत्न असतो.

जॉनी वॉकर हे चित्रपटसृष्टीतील असे पहिले अभिनेते होते, जे रविवारी शूटिंग करायचे नाहीत. ते म्हणायचे, सहा दिवस कामासाठी आणि एक दिवस कुटुंबासाठी. ते असे पहिले अभिनेते होते, ज्यांच्या नावाने चक्क एका चित्रपटालाच ‘जॉनी वॉकर’ असे शीर्षक दिले गेले. जॉनी वॉकर यांनी आयुष्यात कधीही दारूला स्पर्शही केला नाही. ते एकमेव असे कॉमेडिअन होते, ज्यांच्यावर जवळपास प्रत्येक चित्रपटात एक तरी गाणे असायचेच. विशेष म्हणजे, या गाण्यांमधील बहुतांश गाणी अक्षरश: सुपरडुपर हिट झाली आहेत.

जॉनी वॉकर यांचा चाहता वर्ग खूप मोठा होता. १९७० च्या दशकात रेडिओवर ‘फेबिना की महफिल’ नावाचा त्यांचा कार्यक्रम सादर व्हायचा. त्यामध्ये लोक पत्र लिहून प्रश्न विचाराचे आणि जॉनी वॉकर त्यांना उत्तर द्यायचे. त्यांनी एकदा मला सांगितले होते… ‘या कार्यक्रमात पत्र पाठवून सहभागी होणारे लोक इतके विचित्र आणि तिरकस प्रश्न विचारायचे की अनेकदा त्यावर उत्तर देणंही अवघड व्हायचं. पण, मी मात्र प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आवर्जून द्यायचो.’ या संदर्भात एक प्रश्नाचे उदाहरण देत म्हणाले की, एकदा एका गृहस्थाने विचारले होते, ‘जॉनी भाई, शमा (ज्योत) दगडाची असती तर काय झाले असते?’ त्यावर जॉनीभाईंनी उत्तर दिले होते.. ‘शमा दगडाची असती, तर काय झाले असते? आता परवाना (पतंग) जळून मरतो, तेव्हा डोकं आपटून आपटून मेला असता. पण, तो शमेवरच मेला असता!’

रेडिओवरचा हा कार्यक्रम त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यासाठी इतकी पत्रे यायची की, बांद्रा पोस्ट आॅफिसवाले सगळी पत्रे पोत्यात भरून जॉनी वॉकर यांच्या घरी पाठवून देत आणि त्यांनाच सांगत की, यामध्ये दुसऱ्या लोकांचीही टपालं आहेत, ती तेवढी बाजूला काढून आम्हाला परत करा. मग आम्ही त्यांचा बटवडा करु! जॉनी अंकलचा स्टाफ ही सगळी पत्रे निवडायचा. त्यातून कार्यक्रमासाठी आलेली पत्रे सोडून बाकी सगळी टपालं पोस्ट ऑफिसला परत पाठवून द्यायचा. याचा अर्थ असा की, बहुतांश पत्रं जॉनी अंकलनाच आलेली असायची आणि थोडी फार इतर लोकांची असायची. जॉनी वॉकर यांच्याविषयी हे लिहिता लिहिता मला एक प्रसिद्ध शेर आठवतोय…

चाल वो चल की

पस-ऐ-मर्ग तुझे याद करे,

काम वो कर की

ज़माने में तेरा नाम रहे।

आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की, जॉनी वॉकर आणि गुरूदत्त एकमेकांचे खूप घनिष्ट मित्र होते. जॉनी अंकलनी मला एकदा सांगितलं होतं की, ‘कागज के फूल’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यावर गुरूदत्त खूप निराश झाले होते. या कथेची तार त्यांच्या हृदयाशी जुळलेली होती, त्यामुळं तर ते जास्तच उदास राहू लागले होते. अशा काळात जॉनी वॉकर एक दिवस दिग्दर्शक एम. सादिक आणि लेखक जहीर उस्मानी यांना घेऊन गुरूदत्त यांच्याकडे गेले. त्यांना म्हणाले, ‘मी तुम्हाला एक कथानक ऐकवायला आलोय, आधी ते ऐका. मग आपण बोलूयात.’ गुरूदत्त कथा ऐकू लागले. ऐकता ऐकता ते स्वत:शी विचारही करत होते की, मी हे का ऐकतोय? शिवाय, ते मला ऐकवण्यासाठी सादिकसाहेबांसारखे मोठे दिग्दर्शक का आले असावेत? कथा ऐकवून झाल्यावर जॉनी वॉकर गुरूदत्त यांना म्हणाले, ‘आता तुम्ही यावर चित्रपट तयार करा, त्यातील मुख्य भूमिकाही तुम्ही स्वत:च करा. याचे दिग्दर्शन सादिकसाहेब करतील. मी तुम्हाला गॅरंटी देतो, हा चित्रपट नक्की सुपरडुपर हिट होईल.’

गुरूदत्त यांचा जॉनी वॉकर यांच्यावर खूप विश्वास होता. त्यांची चांगली मैत्रीही होती. त्यामुळे गुरूदत्त यांनी एम. सादिक यांना दिग्दर्शक म्हणून साइन केले आणि प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. अबरार अल्वी हेसुद्धा गुरूदत्त यांचे खूप जवळचे लेखक होते. त्यांनाही त्यांनी सोबत घेतले आणि यातूनच मग ‘चौदहवी का चाँद’ या चित्रपटाची निर्मिती झाली.

आता हा चित्रपट तर पूर्ण झाला होता. एव्हाना तो प्रदर्शित व्हायचीही वेळ आली. पण, काही केल्या तो विकला मात्र जात नव्हता. आणि जितक्या रकमेत विकला जात होता, त्यात फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होत होते. ‘कागज के फूल’च्या अपयशाने बसलेल्या धक्क्यातून सावरू पाहणारे गुरूदत्त या प्रसंगामुळे आणखीनच त्रस्त झाले.

हे लक्षात आल्यावर जॉनी वॉकर त्यांना म्हणाले, ‘तुम्ही माझ्या गॅरंटीवर हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळे वितरणाची एक टेरिटरी मी स्वत:च विकत घेतो.’ जॉनी वॉकर यांनी शब्द दिल्याप्रमाणे सीआय टेरिटरी विकत घेतली. मग हा चित्रपट प्रदर्शित झाला. तो इतका मोठा ब्लॉकबस्टर झाला की, त्या वर्षामधला तो सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला.

जॉनी अंकलनी मला सांगितले होते की, हा चित्रपट इतका हिट झाला, कारण त्यामागची माझी भावना, माझा हेतू चांगला होता. मी एक चांगला चित्रपट बनवायला लावला. तो माझ्या गॅरंटीवर सुरू झाला, म्हणून कदाचित ईश्वरानेच माझी लाज राखली. या चित्रपटातून मला इतके पैसे मिळाले की, त्यातून मी अंधेरी – ओशिवारामध्ये ७ एकर जमीन खरेदी केली.

‘चौदहवी का चाँद’ हिट तर झालाच, शिवाय त्याला तीन फिल्मफेअर अवॉर्डही मिळाले. शकील बदायुनी यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा, मोहम्मद रफी यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा आणि बिरेन नाग यांना सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. या गोष्टीच्या स्मृतीमध्ये ‘चौदहवी का चाँद’मधील हेे पुरस्कारविजेते गाणे नक्की ऐका…

चौदहवी का चाँद हो,

या आफताब हो,

जो भी हो तुम

खुदा की कसम,

लाजवाब हो।

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link