नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र गोरटे (ता. उमरी) येथे सहावे मराठी साहित्य संमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, समीक्षक कादंबरीकार पी. विठ्ठल होते. या संमेलनात पी. विठ्ठल यांनी केलेले हे अध्यक्षीय भाषण… ‘आधुनिक महाराष्ट्राचे महिपती’ म्हणून ज्यांची सर्वदूर ख्याती आहे, अशा संत दासगणू यांच्या भूमीत हे संमेलन होत आहे. संत, कवी आणि कीर्तनकार म्हणून सर्वपरिचित असलेले दासगणू आजही आपल्यासाठी आदरणीय संत आहेत. त्यांच्या वास्तव्याने आणि कार्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र गोरटे या गावात मला संमेलनाध्यक्ष होण्याचे भाग्य लाभले, याबद्दल वरदानंद प्रतिष्ठानचे मी मनापासून आभार मानतो. विशेषतः माझे ज्येष्ठ स्नेही, साहित्यिक श्री. देवीदास फुलारी, पत्रकार श्री. विठ्ठल फुलारी, स्वागताध्यक्ष श्री. अशोक भाऊराव फुलारी यांच्यासह सर्वच आयोजकांविषयी कृतज्ञता प्रकट करतो. संमेलनाचे उद्घाटक जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या काशिवन समाधी परिसरात उपस्थित आहेत. सर्वांना नमस्कार… वरदानंद भारती हे संत दासगणू यांचे उत्तराधिकारी आहेत. तत्त्वचिंतक, विचारवंत म्हणून त्यांची ख्याती आहे. धर्म आणि अध्यात्माच्या क्षेत्रातला त्यांचा लौकिकही मोठा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे अनुयायी आहेत किंवा त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे थोडेफार लेखन मी वाचले आहे. या बाबींचा उल्लेख यासाठी केला की, संत आणि वैचारिक साहित्याने मराठी समाजात काही जीवनमूल्ये रुजवली आहेत. संत दासगणू आणि वरदानंद भारती हे त्याच परंपरेचे पाईक आहेत. त्यांनी आपल्याला सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवली आहे. योगायोग असा की आज ‘मराठी भाषा गौरव दिवस’ आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस भाषेच्या अस्मितेशी जोडला गेला आहे. कुसुमाग्रजांसारख्या श्रेष्ठ कवीशी माझंही काहीएक नातं आहे. अगदी विद्यार्थी दशेत मी त्यांना पत्र पाठवले होते, आणि त्यांनीही अत्यंत आपुलकीने माझ्या पत्राची दखल घेतली होती. ही गोष्ट साधारण नव्वदच्या आसपासची. स्वातंत्र्य आणि समतेचा संदेश देणाऱ्या आणि मानवतावादाची जाणीव प्रकर्षाने प्रकट करणाऱ्या कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’ या कवितासंग्रहाचे मी पुढे म्हणजे २००७ साली संपादन केले. ‘विशाखा: एक परिशीलन’ असे या पुस्तकाचे नाव आहे. एखाद्या कवीच्या वैचारिक भूमिकेशी, त्यांच्या जाणिवांशी वाचक म्हणून आपण एकरूप होणे ही गोष्ट अपवादानेच घडते. कुसुमाग्रज हे माझे आवडते कवी आहेत हे या निमित्ताने मी मुद्दाम सांगू इच्छितो. ज्ञानदेव, तुकाराम, महात्मा फुले, ताराबाई शिंदे, केशवसुत, मर्ढेकर, साने गुरुजी, अण्णा भाऊ साठे, बहिणाबाई चौधरी, कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, कोलटकर, नेमाडे ही आपली सांस्कृतिक परंपरा आहे. या विचारपरंपरेनेच आपल्याला एक व्यापक दृष्टिकोन दिला आहे. अर्थात ही केवळ काही प्रातिनिधीक नावं. आपला जो परंपरागत सांस्कृतिक, भाषिक वारसा आहे त्या वारशाला या परंपरेने नवे रूप दिले आहे. या परंपरेविषयी मी पुढे बोलणारच आहे. पण अनेकांना साहित्य संमेलनाच्या प्रयोजनाविषयी शंका असतात. संमेलन कशासाठी? साहित्य संमेलनाची फलश्रुती काय? असा प्रश्न वारंवार विचारला जातो आणि त्यात काही गैर आहे, असेही नाही. या प्रश्नाच्या संदर्भात माझी भूमिका इथे मांडणे मला गरजेचे वाटते. साहित्य संमेलनाची आवश्यकता मला वाटतं संमेलन हा केवळ मेळावा किंवा उत्सव नसतो, तर समाजाला सांस्कृतिक आणि वैचारिक दिशा देणारा तो एक महोत्सव असतो. सांस्कृतिक एकात्मतेच्या आणि वाचनसंस्कृतीच्या दृष्टीने संमेलन ही फार महत्त्वाची घटना असते. यानिमित्ताने सांस्कृतिक परिघाबाहेर असणाऱ्या लोकांना विशेषतः नव्या पिढीला साहित्याशी जोडून घेता येते. पुस्तकांची आणि विचारांची देवाणघेवाण करता येते. स्थानिक लेखक कवींचा, बोलींचाही सन्मान करता येतो. आज मनोरंजनाची नवनवीन माध्यमे उपलब्ध असली तरी माणसाच्या सर्वांगीण विकासात पुस्तकाचीच भूमिका महत्त्वाची असते. पुस्तके माणसाच्या निर्णयक्षमतेचा, कल्पनेचा विस्तार करतात. चांगली पुस्तके नैतिक मूल्यांसह सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतात. महत्त्वाचे म्हणजे पुस्तकांमुळे आपण जगभरातील संस्कृती आणि ज्ञानपरंपरेला समजून घेऊ शकतो. सामाजिक परिवर्तनाची ताकद पुस्तकात असते. इतिहासाची पाने चाळली तर याचे अनेक पुरावे आपल्याला मिळतील. त्यामुळे सत्ताधीश हे शत्रूंना घाबरत नाहीत, ते विचार करणाऱ्या माणसांना आणि चांगल्या पुस्तकांना घाबरतात. इतिहासात जेव्हा जेव्हा क्रांती झाली तेव्हा तेव्हा पुस्तके कारणीभूत ठरली आहेत. कारण पुस्तके वाचकांची तर्कशक्ती वाढवतात. सत्याची जाणीव करून देतात. एवढेच नाही तर पुस्तके जनमत घडवतात. हे जनमत कधीकधी सत्ताधिशाला जाचक ठरू शकते. म्हणून अनेकदा साहित्यिकांवर किंवा त्यांच्या कलाकृतींवर निर्बंध लादले जातात. अगदी प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोपासून ते समकाळातील राज्यकर्त्यांपर्यंत ही परंपरा आहे. तुकाराम, कबीर, टिळक ते दाभोळकर अशा कितीतरी लेखकांना या सामाजिक बंदीला वेगवेगळ्या काळात सामोरे जावे लागले आहे. आज आपल्या भावना खूप तीव्र होत आहेत. कथा, कविता, कादंबरी किंवा नाटक, सिनेमांमुळेही त्या तात्काळ दुखावतात. मुद्दा असा की पुस्तकाचा वैचारिक प्रतिवाद करण्याची क्षमता गमावलेली माणसेच साहित्याला, विचाराला घाबरतात. पुस्तकांमुळे समाजात कधीकधी गदारोळ निर्माण होतो. पण संसदेतही होतो हे चित्र आपण अलीकडेच अनुभवले. ते असो. आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळात ज्या विविध स्वरूपाच्या वाङ्मयीन चळवळी निर्माण झाल्या, त्यामागे पुस्तकांचीच प्रेरणा होती, हे आपण लक्षात घ्यायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कार्यामुळे ‘दलित साहित्य’ उदयाला आले. ही घटना भारतीय पातळीवर खूप महत्त्वाची ठरली. कारण दलित साहित्य हे केवळ साहित्य नाही; तर उपेक्षित वर्गाच्या सांस्कृतिक अस्तित्वाचा आणि इतिहासाचा तो पुनर्शोधदेखील आहे. कारण या प्रवाहाने जीवनातल्या कठोर वास्तवाला जगासमोर आणले. समानतेच्या मूल्यांची आणि मानवी हक्काची जाणीव करून दिली. ग्रामीण आणि स्त्रीवादी साहित्य प्रवाहांनीही व्यापक प्रमाणावर समाजमन घडवले. ग्रामीण लेखक कवींनी एका अपरिचित जगाचा पट साहित्यातून मांडला. भाषा, निसर्ग, संस्कृतीसह शेती मातीला, रूढी परंपरांना, ग्रामीण जगण्यातील दैनंदिन संघर्षाला, सुखदुःखाच्या अनुभूतीला शब्दांकित केले. या अस्सल, अनघड प्रवाहांच्यामागे देखील एक विचारपरंपरा आहे. स्त्रीवादी साहित्यानेही आपल्याला नवी आंतरदृष्टी दिली. स्त्री आणि पुरुष या भूमिकांची पुनर्तपासणी केली. सामाजिक प्रक्रियेला अधिक गतिमान केले. पुरुषनिर्मित स्त्रीत्वाची चिकित्सा करून स्त्रीच्या मनोभूमिकेला, तिच्या माणूसपणाला, स्वाभिमान आणि सामर्थ्याला अधोरेखित केले. यामुळेच सर्वार्थाने संकोचलेल्या विविध स्तरातील स्त्रियांना नवे आत्मभान प्राप्त झाले. मग ती स्त्री उच्चवर्णीय असो, की ग्रामीण, दलित, आदिवासी, मुस्लिम, बारबाला, वेश्या, मॉडेल किंवा राजकारणातली असो- आपल्या स्वायत्त अवकाशाचा शोध घेण्याची प्रेरणा स्त्रियांना पुस्तकांमुळे आणि चळवळीमुळेच मिळाली आहे, हे नाकारता येत नाही. अर्थात हे सगळे घडत असले तरी अद्यापही स्त्री-पुरुष संवादाचा निकोप रस्ता आपण तयार करू शकलो आहोत का? अजूनही पूर्णपणे आपण स्त्रियांना स्वातंत्र्य बहाल केले आहे काय? असे प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत. साहित्य संमेलन हे स्त्रियांच्या अभिव्यक्तीला, चळवळीला, स्त्री अस्मितेलाही चालना देऊ शकते. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना सकारात्मक ऊर्जा देऊ शकते. साहित्य संमेलन छोटे आहे की मोठे, ते अखिल भारतीय आहे की विश्वस्तरावरचे – या गोष्टी गौण असतात. संमेलन कोणते का असेना, तिथे विचारांची, ज्ञानाची सकारात्मक चर्चा घडते हे महत्त्वाचे आहे. या संमेलनाकडे मी त्या अर्थाने बघतो. साहित्य संमेलनातील चर्चा वाचकांच्या, श्रोत्यांच्या बौद्धिकतेला, भावनिकतेला बळकट करतात की नाही याबद्दल सांगता येत नाही; पण निदान संमेलनामुळे सामान्य माणसे पुस्तकांच्या, साहित्यिकांच्या सहवासात येतात, ही घटना मला अधिक महत्त्वाची वाटते. कारण लेखक- वाचक संवाद ही निकोप समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची घटना असते. मराठी भाषा साधारण दीड वर्षापूर्वी मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाला. अजूनही आपण त्या आनंदात आहोत. पण केवळ आनंद किंवा उत्सव साजरा करून भाषा संपन्न होत नाही. तर त्यासाठी आपल्याला विविध स्तरावर जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. मराठी भाषिक म्हणून मराठी भाषेतच बोलण्याचा आपण निश्चय करायला हवा. शब्दकोश, परिभाषा कोश या खूप दूरच्या गोष्टी आहेत. त्या अकॅडेमिक किंवा संशोधनाच्या पातळीवर होत राहतील. पण मराठी भाषिक म्हणून निदान आपण मराठी पुस्तकांचे वाचन केले आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर केला तरी बरेच सत्कार्य घडेल. केवळ शासनाचे निर्देश आहेत म्हणून ‘भाषा दिवस’ किंवा ‘अभिजात भाषा सन्मान दिवस’ किंवा ‘भाषा संवर्धन पंधरवडा’ वगैरे कार्यक्रमातला निष्क्रिय सहभाग काही कामाचा नसतो. टीव्ही, मोबाईल, इंटरनेट आणि विविध स्वरूपांच्या नवनव्या साधनांमुळे मराठी भाषेवर हिंदी, इंग्रजीचे प्राबल्य वाढत चालले आहे. दुर्दैवाने आपणही सगळेच या प्रभावात आहोत. नव्या पिढीला तर मराठीतील अनेक शब्दांचा उच्चारही करता येत नाही. आज आपल्या भाषिक, सांस्कृतिक जीवनाची घडी विस्कटलेली आहे. ती पूर्ववत करायची असेल तर अनेक पातळ्यांवर आपल्याला काम करावे लागणार आहे. संमेलन हा त्याचाच एक भाग आहे. भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते. तर ती आपल्या जगण्याला वैचारिक अधिष्ठान देणारी एक जिवंत प्रक्रिया असते. भाषेचा इतिहास हा आपल्या संस्कृतीचाही इतिहास असतो. भाषा ही आपल्या सांस्कृतिक संपन्नतेचा मुलाधारही असते. मराठी भाषा महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची अंत:प्रेरणादेखील आहे. म्हणून आत्मगौरवाच्या पलीकडे जाऊन भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. प्रादेशिक भाषा म्हणून न्यूनगंड बाळगणाऱ्या पिढीला या भाषेतील वैभवशाली साहित्य परंपरेचा परिचय करून द्यायला हवा. विवेकसिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा हे आपले अभिजात वाडमय आहे. या साहित्यानेच आपल्या जाणिवांची जडणघडण झाली आहे. मराठी भाषा आपल्या समग्र जीवनव्यवहाराला व्यापून असलेली भाषा आहे. सुमारे साडेबारा कोटी लोकांची ती भाषा आहे. कोणत्याही भाषेला व्यावहारिक उपयोजनाचा भक्कम आधार असेल तरच ती टिकते. दुसरी गोष्ट म्हणजे भाषेविषयी असलेल्या आपल्या नकारात्मक धारणा बदलण्याची अत्यंत गरज आहे. मी विद्यापीठात अध्यापन करतो. आमच्याकडे पदवी- पदव्युत्तर शिक्षणासाठी ग्रामीण भागातील मुले येतात. पण बहुतांश मुलांचा ओढा मराठीऐवजी परकीय भाषेकडे अधिक असल्याचे दिसते. आपण जर इंग्रजी किंवा अन्य परकीय भाषेत शिक्षण घेतले तरच आपले भविष्य उज्ज्वल ठरू शकते असे या विद्यार्थ्यांना वाटते. मातृभाषेविषयीचा आपला आत्मविश्वास असा डळमळीत का होत आहे? याचा विचार करण्याची गरज आहे. भाषाभयाचा हा मनोगंड जोपर्यंत दूर होणार नाही, तोपर्यंत भाषा समृद्ध होणार नाही. आज मराठी माध्यमांच्या शाळेवर मोठे संकट आले आहे. एवढेच नाही तर पारंपरिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांचे आणि एकूण शिक्षणव्यवस्थेचेही भवितव्य या काळात अधांतरी आहे. दिवसेंदिवस भाषा आणि शिक्षणाविषयी वाढत चाललेली सर्वंकष उदासीनता भयंकर आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी साहित्यिक, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, प्राध्यापक, प्रसारमाध्यमात कार्यरत असणारे संपादक, पत्रकार, प्रकाशक, संशोधक, शास्त्रज्ञ, अभ्यासक या सगळ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. साहित्यसंस्था, भाषाविषयक कार्य करणाऱ्या संस्था आणि विद्यापीठांचीसुद्धा ही जबाबदारी आहे. ‘समाज’ नावाच्या व्यवस्थेला एकसंध ठेवायचे काम त्या-त्या प्रदेशातील साहित्य करत असते. किंबहुना त्या साहित्यावरच त्या समाजाचा वैचारिक दृष्टिकोन ठरत असतो. एवढेच नाही तर पुढच्या पिढीची सर्जनशीलतादेखील याच परंपरेवर पोसली असते. आज मराठी भाषेसमोर विविध स्वरूपाची आव्हाने आहेत. ही आव्हाने पूर्वीच्या काळातही होती. पुढेही असतील. पण या आव्हानांना संधी मानूनच आपल्याला धोरणे ठरवावी लागतील. भाषा हा केवळ आस्थेचा वा अस्मितेचा विषय असू नये, तो व्यवहाराच्या केंद्रस्थानी यायला हवा. आज दुर्दैवाने आपले सरकार ‘त्रिभाषा’ धोरणाच्या नावाखाली हिंदी सक्तीचा निर्णय लादू पाहत आहे. हिंदी भाषेला असा राजाश्रय दिला गेला तर मराठीची अवहेलना अटळ आहे. त्यामुळे हिंदी भाषा पहिलीपासून सक्ती करण्याचा निर्णय आत्मघातकी तर आहेच; पण दूरगामी परिणाम करणारादेखील आहे. यानिमित्ताने शासनाने आपले राजकीय हेतू बाजूला ठेवून या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे मला वाटते. मराठी भाषेसाठी निकोप पर्यावरण तयार करण्याची गरज असताना आणि मराठी ही ‘ज्ञानभाषा’ झाली पाहिजे, असा आग्रह धरताना हिंदीची अनिवार्यता कोणत्याही अर्थाने समर्थनीय असू शकत नाही. विचारांची पूर्वपरंपरा साधारणपणे तेराव्या शतकापासून ते एकविसाव्या शतकाच्या प्रारंभिक टप्प्यापर्यंत आपण आपल्या सांस्कृतिक संदर्भांचे परिशीलन केले तर मागच्या साडेसातशे वर्षात जी विविध स्वरूपाची स्थित्यंतरे झाली, त्याची सहज कल्पना येऊ शकते. सुरुवातीच्या काळात ज्ञानेश्वर, तुकारामादी संतांनी भक्तिमार्गाचा पुरस्कार केला. संत चळवळीने भक्ती, समता, मानवता आणि नैतिकता यावर आधारलेले व्यापक तत्त्वज्ञान रूढ केले. या तत्त्वज्ञानामुळे महाराष्ट्राच्या समग्र जीवनव्यवहारात मुलगामी परिवर्तन घडवून आले. त्यांनी संस्कृतऐवजी मराठी लोकभाषेत साहित्याची निर्मिती केली. या साहित्याने मराठी भाषेला शब्दसंपन्न केले. आज आपण मराठी अभिजात भाषा म्हणून मिरवत आहोत. या भाषेला खऱ्या अर्थाने ‘अभिजात’ करण्याचे श्रेय संतांचे आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. संत परंपरेनंतर पंडिती साहित्याने पुन्हा अलंकारप्रचूर संस्कृत भाषेत लेखन केले. अर्थात भाषा शब्दसंपन्न झाली परंतु ती अधिक क्लिष्ट आणि सामान्यांना कठीण झाली. पंडिती साहित्यामुळे पारंपरिक धार्मिक मूल्यांना बळकटी मिळाली. परंतु तत्कालीन सामाजिक प्रश्न दुर्लक्षित राहिले. शिवाय हे लेखन अभिजन वर्गापुरतेच मर्यादित राहिले. शाहिरी आणि लोकसाहित्याने मात्र लोकजीवनाशी निगडित आवेशपूर्ण शैलीत लेखन केले. मात्र खरा बदल घडला तो एकोणिसाव्या शतकात. ब्रिटिश राजवटीतील विविध स्वरूपाच्या सुधारणांमुळे आणि इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावामुळे मराठी समाज हा भक्तिपासून सामाजिक आणि वास्तववादी विचारांकडे वळला. समाजसुधारणेच्या आणि राष्ट्रवादाच्या नव्या संकल्पना या काळात रूढ झाल्या. एकोणिसावे शतक हे संक्रमणाचे, नव्या विचारांचे आणि भौतिक सुधारणांचे शतक होते. सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अनेक बदल या काळात झाले. नव्या राज्यव्यवस्थेमुळे आणि नव्या शिक्षणपद्धतीमुळे खूप सकारात्मक बदल घडून आले. या काळात नियतकालिकांचा आणि संस्थात्मकतेचाही प्रारंभ झाला. ब्रिटिशांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरांवर बोट ठेवल्यामुळे त्या काळातल्या अनेक लोकांनी, विद्वानांनीसुद्धा धर्मांतर केले. बाबा पद्मनजी, ना. वा. टिळक अशी काही प्रातिनिधिक नाव या संदर्भात घेता येतील. म्हणजे एकोणविसाव्या शतकातील सुशिक्षित तरुणांना ‘आपल्या धर्मात सुधारणा केल्या पाहिजेत’ याची जाणीव झाली आणि त्यांनी त्या संदर्भात प्रत्यक्षात कार्य करायला सुरुवात केली. ‘स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे किंवा तिलाही ज्ञानार्जनाचा अधिकार दिला पाहिजे’ हा विचार मूळ धरू लागला. यातूनच आपल्याकडे सुधारणावादाच्या चळवळीचा प्रारंभ झाला. महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. पुढच्या काळात महर्षी कर्वे यांनी मुंबईत महिलांसाठी अनाथाश्रम सुरू केले. स्त्री प्रश्नांच्या संदर्भात सुरू झालेले हे कार्य अर्थातच त्याकाळी सर्वमान्य झाले नाही. वैचारिक संघर्ष सुरु झाला. सनातनी आणि आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते हा वाद सुरू झाला. श्रेष्ठत्वाचा अहंकार बाळगणाऱ्या सनातनी वर्गाने स्त्रीच्या स्वातंत्र्याला विरोध केला. तिच्या शिक्षणाला विरोध केला. यामागे पुरुषी हितसंबंधाचे, श्रेष्ठत्वाचे राजकारण होते हे वेगळे सांगायला नको. या सगळ्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले यांचे कार्य अत्यंत लक्षणीय ठरते. त्यांनी कोणत्याही विरोधाची पर्वा न करता नवा विचार प्रत्यक्षात रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या रूपाने महाराष्ट्रातील उपेक्षित वर्गाला विशेषतः दलित आणि स्त्रियांना मोठा आधार मिळाला. आजच्या आपल्या सुधारणावादी विचाराचे प्रारंभिक प्रारूप हे फुल्यांच्या तत्त्वचिंतनात आणि कार्यात सापडते. म्हणून मला म. फुले यांच्या कार्याचे याप्रसंगी कृतज्ञतापूर्वक स्मरण करावे वाटते. त्यांच्या समकालीन अनेक विचारवंतांनीही आधुनिक महाराष्ट्राची उभारणी करण्याचा केलेला प्रयत्न हा अत्यंत गौरवास्पद आहे. विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढच्या काळात अस्पृश्यता निवारणासह एकूणच समाजजीवनाचे, धर्मशास्त्राचे पुनर्मुल्यांकन केले. अनिष्ट रूढी परंपरेतून समाजाला मुक्त करून त्यांना ‘माणूस’पण बहाल केले. स्त्रियांसाठी त्यांनी केलेले कार्य खूप महत्त्वाचे आहे. पतिव्रता धर्मात अडकलेल्या स्त्रीला नवे अवकाश मिळवून देण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न मौलिक आहे. अर्थात आपल्याकडील भक्ती चळवळींनी म्हणजेच महानुभाव, वारकरी चळवळीने देखील लिंगस्तर आणि वर्ण या तत्कालीन समाजमान्य भेदाला दूर करण्याचा विचार मांडलेला होताच. चक्रधरांनी स्त्रियांच्या धर्माधिकाराबद्दल लिहून ठेवले आहेच. आजच्या काळातील स्त्री मुक्ती, स्त्रीवादी चळवळीच्यामागे हीच विचारपरंपरा आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. जोपर्यंत स्त्री-पुरुषांतील विषमता संपुष्टात येत नाही, तोपर्यंत आपण समानतेची चर्चा करू शकत नाहीत. समकाल आणि लेखक भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उलटून गेल्यानंतरही आपल्या मानसिक धारणा बदलणार नसतील तर आपले ‘माणूस’ असणे मला निरर्थक वाटते. जात, धर्म, वर्ण, लिंग आणि प्रदेश या सर्वच माणुसकीच्या विभाजन रेषा आहेत. दुर्दैवाने आपले आजचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पर्यावरण याच घटकांनी व्यापलेले आहे. आपल्याला लेखक म्हणून, कलावंत म्हणून या गोष्टीची चिकित्सा करता यायला हवी. आपल्या जगण्यातील नैतिक आशय आपल्याला अबाधित राखता यायला हवा. दुसऱ्याची प्रतिष्ठा जपता यायला हवी. सत्य, अहिंसा, प्रेम करुणा, मानवता ही भारतीय संस्कृतीची अंगे आहेत हे खरे; पण वास्तव याहून अधिक भिन्न आहे हे आपण नाकारू शकतो काय? आज आपल्या देशात सुरू असलेले विविध स्वरूपाचे राजकीय आणि सामाजिक कलह पाहिले की वादविवादाच्या किंवा मत मतांतराच्या निकोप सामाजिक प्रक्रियेचा लोप झाल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. कोणत्याही समाजाचे राजकीय विभाजन आपण समजू शकतो, मात्र धार्मिक आणि जातीय विभाजन ही खूप गंभीर गोष्ट असते. दुर्दैवाने आपण सारेच लोक अशा सुप्त स्वरूपाच्या अदृश्य कलहाचे बळी ठरत आहोत. महाराष्ट्र हे आधुनिक विचारांचे राज्य आहे, ही ओळख आज आपण खरंच अभिमानाने मिरवू शकतो काय? मागच्या दोनेक दशकात घडलेल्या वेगवेगळ्या घटना पाहिल्या की अस्वस्थ व्हायला होते. गाव शहरातील सुशिक्षित नवी पिढी नोकरीअभावी सैरभैर झाली आहे. अशी सैरभैर झालेली दिशाहीन मुलं मग कोणत्यातरी राजकीय झेंड्याखाली एकत्र येतात. वैचारिक प्रगल्भता नसणाऱ्या या मुलांचा तथाकथित नेते मोठ्या खुबीने राजकीय वापर करतात. तात्पुरता आर्थिक आधार आणि ओळख मिळाली की, ही विलोभनीय मुलं स्वतःच्या स्वभावाविरुद्ध कोणतीही तडजोड करायला लगेच तयार होतात. प्रसंगी हिंसक आणि आक्रमकही होतात. कधीकाळी तरुणांच्या या आक्रमकतेतूनच विधायक सामाजिक, सांस्कृतिक चळवळी निर्माण झाल्याचा इतिहास आहे. तथापि आता बेरोजगारांच्या निरर्थक फौजा तयार होत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मागच्या काही वर्षातील घटना आठवून बघा (विशेषतः बीड जिल्ह्यातील) मी काय म्हणतोय, ते आपल्या सहज लक्षात येईल. सुसंगत विचार करण्याची क्षमता गमावलेली ही तरुण मुलं विविध धर्माचा अजेंडा घेऊन मिरवताना दिसतात. द्वेषाचे उदात्तीकरण करताना दिसतात. मागच्या काही वर्षात महापुरुषांच्या जयंतीचे स्वरूप कमालीचे बदलले आहे. हे स्वरूप उन्मादी आणि अतिउत्साही होत चालले आहे. उन्मत आणि आक्रमक होऊन दुसऱ्यांचा दुस्वास करून आनंदोत्सव साजरा करणे, ही सुद्धा एक विकृतीच असते. पण हे सांगायचे कुणी? चर्चा आणि चिकित्सेची दारे आपण आधीच बंद करून ठेवली आहेत. परिणामस्वरूप विवेकी आणि तर्कशुद्ध युक्तिवाद आपल्या समाजजीवनातून आता बाद होऊ पाहत आहे. सत्ताकेंद्री विधीनिषेधशून्य राजकारणाचा संसर्ग दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. राजकारणाचे हे नवे विध्वंसक रूप खूपच भयावह आहे. स्वार्थापोटी होणाऱ्या पक्षांतरांनी अनेक राजकीय पक्ष प्रचंड शक्तिशाली तर काही शक्तिहीन आणि दुबळे झाले आहेत. स्वार्थी आणि महत्त्वाकांक्षी नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर आपल्या एकाधिकारशाहीला अधिक बळकट केले आहे. अशा काळात एखाद्या गोष्टीची तात्त्विक किंवा वैचारिक चिकित्सा करणेही कठीण होणार आहे. अशा अनेक गोष्टींचा काहीएक परिणाम प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष समाजजीवनावर होतच असतो. भ्रामक अपेक्षांना बळी पडलेले नागरिक ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. मतदानासाठी पैसे घेणारे देणारे लोक हे लोकशाहीचे संरक्षणकर्ते कसे होऊ शकतात? मूल्यहीन राजकीय भोवतालात आपण सगळेच जगत आहोत. ही परिस्थिती बदलायला हवी. निदान साहित्यिक, कलावंत, पत्रकार आणि विचारवंतांनी तरी किमान पातळीवर आपली नैतिकता जपून निर्भयपणे सत्याचा उच्चार करण्याची गरज आहे. विविध स्वरूपाच्या उन्मादी अस्मितांचे राजकारण ही भयावह गोष्ट असते. आपला प्रवास त्याच दिशेने सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील एका घटनेचा मुद्दाम उल्लेख करतो. मागच्या काही दिवसांपूर्वी मुखेड तालुक्यातील एका व्यक्तीने आपल्या मुलीची हत्या केली. कारण काय तर ज्या व्यक्तीला तीन अपत्ये आहेत ती व्यक्ती निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरते, हा नियम आहे. सदर व्यक्तीला तीन अपत्ये असल्यामुळे त्याला ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नव्हती. मग त्याने अत्यंत निर्दयीपणे आपल्या मुलीच्या हत्येचा कट रचला आणि तेलंगणा राज्यातील निजामाबाद जवळील एका कॅनॉलमध्ये तिला फेकून दिले. ही घटना वाचल्यानंतर मी प्रचंड अस्वस्थ झालो. ही अस्वस्थता माझी लेखक म्हणून जशी होती, तशीच बाप म्हणूनही होती. गावाचे सरपंच होण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला आपल्या सात वर्षाच्या कोवळ्या मुलीची हत्या करावी असे वाटणे, ही घटना काय सांगते? माणूस राजकारणासाठी, सत्तेसाठी इतका क्रूर वागू शकतो यावर खरच विश्वास बसत नाही. अशा घटना अपवादानेच घडतात हे खरे असले तरी माणूस या निर्णयापर्यंत येऊच कसा शकतो? हा लेखक म्हणून मला पडलेला प्रश्न आहे. या घटनेकडे एक अपवादात्मक घटना म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही. या घटनेच्या निमित्ताने आपण आपल्या समाजमनाचा एक्स-रे काढण्याची गरज आहे. राजकारणाचा आपल्या समकालीन जगण्यावर किती खोल प्रभाव असतो आणि माणसे किती असंवेदनशील, आत्मकेंद्री आणि अमानुष होवू शकतात, याचे हे उदाहरण आहे. मला वाटतं अशा अनेक प्रश्नांकडे लेखकाने बघितले पाहिजे. भौतिक विकास, समाज माध्यमे आणि आपण देशभर भौतिक विकासाची अवाढव्य कामे सुरू आहेत. गावे, शहरे महाकाय सिमेंट रस्त्याने जोडली जात आहेत. छोट्या छोट्या शहरातही विमानतळ आहेत. प्रवास आणि पर्यटनाची आधुनिक साधने सहज उपलब्ध झाली आहेत. अगदी किरकोळ वाटणाऱ्या अशा वस्तूंची घरपोच सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या आपल्या आजूबाजूला आहेत. ऑर्डर दिली की पाचदहा मिनिटांत वस्तू हजर हे आपले आजचे वर्तमान आहे. पण या भौतिक घडामोडींच्यामागे असणाऱ्या भावनिक, मानसिक तुटलेपणाचा विचार करायला हवा. कोरोनानंतर निर्माण झालेली जगण्या वागण्याची डिजिटल संरचना वरवर सुलभ आणि हवीहवीशी वाटत असली तरी कौटुंबिक, सामाजिक सुसंवादही या काळात संपुष्टात आले आहेत. यामुळे निर्माण होणारे प्रश्न सामाजिकदृष्ट्या अधिक धोक्याचे बनत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्ययनासाठी मोबाईल, इंटरनेट सहज उपलब्ध आहे. पण या साधनांचे नकारात्मक परिणाम विद्यार्थी, त्याचे कुटुंब आणि पर्यायाने समाजावर होत आहे. मोबाईलगेमच्या विळख्याने गाझियाबादमधील तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कोरियन लव्हर नावाच्या टास्क बेस्ड गेमचे व्यसन त्यांना जडले होते. या वैफल्यातून त्यांनी आपले जीवन संपवले. मुले अशी व्यसनाधीन झाली की आई-बाप म्हणून आपण हातबल ठरतो. आपले समग्र जगणे तंत्रज्ञानाधारित झाल्यामुळे अशा घटनांकडे आपले लक्ष जात नाही. काळ बदलला. जगण्या वागण्याची संहिता बदलली. या सगळ्या गोष्टीचा व्यापक परिणाम समाजजीवनावर, सामाजिक नातेसंबंधावर होत आहे. अशावेळी पालक म्हणून, जागरूक नागरिक म्हणून आपल्याला खूप सजग राहावे लागणार आहे. शिवाय हा काळ लेखक, कवींसाठीसुद्धा खूप आव्हानात्मक आहे. या काळाच्या विविध मिती समजून न घेताच केलेले लेखन वांझ ठरण्याची अधिक शक्यता आहे. लेखकाला समाजातल्या अशा विविध स्वरूपाच्या ज्ञात अज्ञात घटनांचा वेध घेता यायला हवा. या घटनांच्या मागे असणारा कार्यकारणभाव लक्षात घेता यायला हवा. संवेदनशीलता आणि वैचारिक प्रामाणिकता असल्याशिवाय केलेले लेखन फारसे समाजहिताचे नसते. मागच्या काही दशकात निर्माण झालेल्या विविध स्वरूपाच्या वाडमयीन प्रवाहांनी मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. मात्र आता बदलत्या काळात आपले अनुभवविश्वही बदलायला हवे. जोपर्यंत आपल्याला विश्वभानाची चाहूल लागणार नाही तोपर्यंत आपल्या साहित्याचे प्रभावक्षेत्र मर्यादितच राहील. निर्मितीचा हा बंदिस्तपणा ओलांडून नवनिर्माणाच्या अनेकानेक शक्यता धुंडाळण्याची गरज आहे. केवळ ग्रामीण भाषेत लिहिले, म्हणजे ते ‘ग्रामीण’ साहित्य ठरत नाही. तर आपल्याला समग्र कृषिजनसंस्कृतीच्या आंतरिक कोलाहलसुद्धा समजून घेता यायला हवा. शेती, माती आणि एकूणच गावगाड्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक मूल्यऱ्हासाचा, उत्तर आधुनिक बदलाचा, पर्यावरणाचा, अनैतिक आचरणाचा, राजकारणातील अपप्रवृत्तींचा, जातवास्तवाचा, भ्रमित स्थितीगतीचा, स्त्रियांच्या जगण्याचा, नव्या साधनांनी बदललेल्या मानसिकतेचा आशयही गंभीरपणे समजून घेता यायला हवा. कारण हा आशय केवळ एका व्यक्तीशी निगडित नसतो, तर तो समष्टी आणि प्रवृत्तीचाही असतो, हे भान लेखकाकडे असायला हवे. ज्यांनी हे भान ठेवले ते सार्वकालिक लेखक ठरले, हा इतिहास आहे. सोशल मीडियाने आपल्याला अभिव्यक्तीची मोठी स्पेस मिळवून दिली. कोणत्याही सेन्सॉरशिपशिवाय आपण व्यक्त होऊ लागलो. फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स, युट्यूब, ब्लॉग, पॉडकास्टसह कितीतरी माध्यमे आज आपल्या हातात आहेत. या माध्यमांनी प्रस्थापितांची आणि भांडवलदारांची मक्तेदारी मोडून काढली. पण याच माध्यमाने संपूर्ण समाजाला ‘प्रतिक्रियावादी’ आणि हिंसकदेखील बनवले आहे. या माध्यमामुळे जशा निवडणुका जिंकणे शक्य झाले, तसेच दंगली घडवून आणणे किंवा अफवांचा बाजार भरवणेही सोपे झाले. फॉरवर्डेड गोष्टींवर विश्वास ठेवणारी अविवेकी जमात यातूनच निर्माण झाली. खरे तर माध्यमांचा विधायक वापर करून चांगल्या गोष्टी घडवून आणणारे लोकही भोवतालात आहेत, पण विध्वंसक वापरकर्त्यांची आणि दुसऱ्यांचे रिल्स स्क्रोल करणाऱ्यांची संख्या तुलनेने जास्त आहे. दिवसरात्र पॉर्न पाहणारी, हिंसक, असंवेदनशील पिढीसुद्धा आपल्या आजूबाजूला आहे. मोबाईलने माणसाचे खाजगी जीवन संपूर्णपणे संपुष्टात आणले आहे. सर्वत्र सीसीटीव्ही आणि तत्सम साधनांनी मानवी जगणे अंकित झाले आहे. माणसाच्या नैसर्गिक जगण्याचा, स्वभावाचा असा संकोच होणे फारसे बरे नाही. या माध्यमाचीही भीती कधी ना कधी संपेलच. मुद्दा असा की या पद्धतीनेच आपण जगत राहिलो तर आपल्या सकारात्मक क्रियाशीलतेचा, प्रतिभेचा, सर्जनाचा, करुणेचा, आस्थेचा अंत तर होणार नाही ना, याचा विचार करायला हवा. म्हणजे गुगल मॅपशिवाय आपल्याला प्रवास करता येत नाही, हे सध्याचे भीषण वास्तव आहे. विस्मरणाच्या काठावर आपण येऊन थांबलो आहोत. एआय /चॅटजीपीटीसारख्या माध्यमाने तर शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांचीही उपयुक्तता संपुष्टात आणली आहे. म्हणून ज्ञान आणि माहितीचे हे दालन जितके मानवी हिताचे आहे, तितकेच ते धोक्याचेही आहे. याचा खूप मोठा परिणाम हा भाषा, साहित्य, कला, संशोधन आणि एकूणच मानवी संस्कृतीवर होणार आहे. ज्ञान आणि व्यवहाराच्या जुन्या संकल्पना मोडीत निघाल्यामुळे माणसाला सर्वार्थाने भ्रमित करणारे निष्क्रिय तत्त्वज्ञान रूढ होत चालले आहे. समाजातून ज्ञाननिर्मितीचे, सृजनाचे तार्किक आधारच नष्ट होणार असतील तर मानवी जगणे हा एक निव्वळ ‘अर्थशून्य’ खेळ ठरण्याचीच अधिक शक्यता आहे. हे अराजक आता थांबवणे शक्य नसले तरी किमान त्याचा विवेकाने वापर करणे आपल्या हातात आहे. साहित्य आणि पर्यावरण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मी आपले लक्ष एका वेगळ्या प्रश्नाकडे वेधू इच्छितो. हा प्रश्न म्हणजे वन्यजीव आणि माणसांतील संघर्ष होय. मराठी ललित साहित्यात पर्यावरण, वन्यजीव आणि मानवी समाज, संस्कृतीचे चित्रण यापूर्वी झाले आहे. व्यंकटेश माडगूळकर, गो. नी. दांडेकर, दुर्गा भागवत, मधुकर वाकोडे, मारुती चितमपल्ली, ल. म. कडू यांच्यापासून ते नव्या पिढीतील कृष्णात खोत यांच्यापर्यंत काही लेखकांची नावे यासंदर्भात जरूर नोंदवता येतील. पण तरीही व्यापक सहानुभूतीने, संवेदनशीलतेने या प्रश्नाकडे बघणाऱ्या लेखकांचा अभाव मराठी साहित्यात आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. मानवी संस्कृती ही पर्यावरणातून सिद्ध होत असते. किंबहुना माणूस आणि निसर्ग या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी असतात. साधारण पाच-पन्नास वर्षांपूर्वीचे पर्यावरण आणि आजचे पर्यावरण यात खूप मोठा फरक आहे. पूर्वीच्या काळी माणसाचे निसर्गाशी, वन्यजीवांशी आणि एकूणच निसर्गतत्त्वाशी आत्मीय नाते होते. मात्र जसजसे औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि तंत्रज्ञानाची वाढ होत गेली, तसतसे पर्यावरणीय प्रश्न गंभीर बनत गेले. कधीकाळी पर्यावरणाकडे मानवी अस्तित्वाचे मूलभूत तत्त्व म्हणून पाहिले जात होते. आता माणसाची ही धारणा बदलली असून केवळ जगण्याचे एक साधन म्हणून पर्यावरणाकडे बघितले जात आहे. आज हवा, पाणी, माती, पशु-पक्षी आणि एकूणच जैवविविधतेवर आलेले संकट खूप भयावह वळणावर येऊन ठेपले आहे. हवामान बदल, प्रदूषण एवढ्यापुरताच हा मुद्दा नसून माणसाच्या अतिरेकी व्यवहारामुळे, असंवेदनशीलतेमुळे विविध स्वरूपाच्या आपत्तींना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. निसर्गाशी, सृष्टीशी जोपर्यंत आपले संबंध सलोख्याचे होते, तोपर्यंत सर्व ठीक होते. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. महाकाय यंत्राचा बेसुमार वापर जगभर सुरू आहे. जंगलतोड, डोंगर, समुद्र आणि नद्यांचे उत्खनन ही गंभीर चिंतेची बाब आहे. संपूर्ण पृथ्वीवरच माणसाने साम्राज्य निर्माण केले आहे. पशु-पक्ष्यांचे, झाडांचे संपूर्ण अस्तित्व धोक्यात आले आहे. विकासाच्या भ्रामक कल्पनांनी माणसे वेडी झाली आहेत. विविध स्वरूपाच्या प्रकल्पांसाठी, रस्ते, धरण आणि अन्य गोष्टींसाठी जमिनीचे संपादन केले जाते. या जमिनीवर केवळ माणसांचा मालकी हक्क नाही हेच आपण विसरत चाललो आहोत. आपल्याइतकाच या पृथ्वीवर पशु-पक्ष्यांचादेखील अधिकार आहे. विस्थापित माणसांचे सरकारकडून तात्पुरते पुनर्वसन केले जाते, पण पशु-पक्ष्यांच्या भावभावनांचे, अस्तित्वाचे काय? याचा विचार आपण करत नाहीत. प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यामुळे देशभरातील अनेक शहरांवर आणि गाव-खेड्यावरसुद्धा अत्यंत नकारात्मक परिणाम होत आहेत. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. या संघर्षामुळे शेतकरी आणि आदिवासींच्या नैसर्गिक जगण्यावर मोठे संकट आले आहे. ज्याचे अस्तित्वच जंगलावर किंवा शेतीवर अवलंबून आहे तो मानवी समूह प्रचंड अस्वस्थ आहे. बिबट्या, रानडुक्कर, हत्ती, अस्वल या प्राण्यांनी आपला अधिवास बदलला आहे. शेती मातीशी ज्यांचा संबंध आहे, त्यांना प्राण्यांच्या या स्थलांतरची खूप मोठी झळ बसत आहे. विदर्भातील जंगलात असणाऱ्या वाघांमुळे अनेक शेतकऱ्यांना स्वतःचा जीव गमावा लागला आहे. बिबट्याची समस्या तर सर्वत्र आहे. अगदी पुणे, मुंबई, नाशिकसारख्या महानगरात किंवा गाव खेड्यातही हा प्राणी आढळतो. जैविक गरजेच्या पूर्ततेसाठी हे प्राणी गोंधळून मानवी वस्तीत येत आहेत. आपण त्यांचे अन्न हिसकावून घेतले आहे. त्यामुळे ऊसाची शेती किंवा दाट झाडी हे बिबट्याचे नवे वसतीस्थान होऊ पाहत आहे. एवढेच नाही तर कुत्रा, मांजर असे नवे भक्ष्यही त्याने स्वीकारले आहे. माणसाने निसर्गावर केलेला हस्तक्षेप या बदलाला कारणीभूत आहे. बिबट्यांच्या अधिवासातील बदलामुळे त्यांच्या जनुकीय विविधतेवरही परिणाम झाला आहे. भिन्न पर्यावरणाशी जुळवून घेऊन हे प्राणी राहत आहेत. त्यांच्या संवर्धनाचा विचार करण्याची अत्यंत गरज आहे. रानडुक्कर, अस्वल किंवा हत्तींचे हल्ले ही बाब नित्याची झाली आहे. घोणस किंवा नागासारख्या विषारी सापांच्या दंशामुळे कितीतरी शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. हरिण किंवा तत्सम प्राण्यांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शहरी परिवेशात वावरणाऱ्या माणसांना या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येणार नाही. पण या भाबडेपणाच्या पलीकडे जाऊन या कष्टकरी माणसांच्या वेदना समजून घेण्याची गरज आहे. शेतकरी, कष्टकरी आणि आदिवासी समूहाचे जोपर्यंत झाडामातीशी संबंध असतील तोवरच आपले जगणे सुखसंपन्न असणार आहे. त्यांच्या अस्तित्वावरच आपली समृद्धी अवलंबून आहे. म्हणून हे परस्परावलंबित्व आदरयुक्त असायला हवे. भूमी आणि पर्जन्यावर या समूहाच्या जीवनधारणा अवलंबून आहेत. यातूनच त्यांची संस्कृती, विधी-उत्सवाची परंपरा, भाषा आणि कलामूल्ये विकसित होत असतात. अभिजनांच्या सांस्कृतिक, भौतिक जगण्याला शेतीनिष्ठ माणसांनीच सर्वार्थाने संपन्न केलेले आहे, हे विसरून चालणार नाही. साहित्यिकांनी या प्रश्नांच्या मुळाशी जायला हवे. संवेदनशील आणि मानवतावादी दृष्टिकोनातून पर्यावरणाकडे बघायला हवे. निसर्ग केवळ संसाधन नाही तर तो समग्र जीवसृष्टीला अस्तित्व देणारा मूल्यवान घटक आहे. वैज्ञानिक किंवा तथ्याधारित दृष्टीने पर्यावरण तज्ज्ञ आपापल्या परीने अभ्यास करत आहेतच, पण लेखक, कवी आणि सामान्य नागरिकांनीसुद्धा नैतिक जबाबदारी म्हणून या प्रश्नाकडे बघायला हवे. पर्यावरणाचा ऱ्हास हे एक व्यापक संकट आहे. मानवी मूल्यांशी जोडलेला हा सामाजिक आणि नैतिक प्रश्नदेखील आहे. माणसाच्या उपभोगवादी वृत्तीमुळे निसर्गाशी असलेले भावनिक आणि आत्मीय नाते संपुष्टात आले आहे. जोपर्यंत आपली ही प्रवृत्ती बदलत नाही, तोपर्यंत हे प्रश्न कायम राहतील. म्हणून साहित्यिकांनी शाश्वत जीवनशैलीचे, संवेदनशीलतेचे मूल्य समाजात रुजवण्याचे काम करावे, असे मला वाटते. निसर्गाचा विनाश हा सामाजिक विषमतेचाही प्रश्न असतो. त्याचे दूरगामी परिणाम ग्रामीण समूहावर आणि एकूणच समाजजीवनावर होत असतात. म्हणून साहित्यिकांनी या वास्तवाचे चित्रण करायला हवे. सामाजिक न्यायाचा मुद्दा म्हणून हे वास्तव पटलावर आणायला हवे. सुख सोयींनी युक्त असलेल्या वैभवसंपन्न कल्पित जगाच्या पलीकडे जाऊन माणूस आणि निसर्ग यांच्यातील सहसंबंधाकडे पाहायला हवे. देशभरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे मजबूत जाळे तयार झाले आहे. दर पाच-सात किलोमीटरवर उंचच उंच फ्लाय ओव्हर आहेत. गावाकडे वळण घेणारे सर्व्हिस रोड आहेत. प्रत्येक रस्त्यावर चिन्हयुक्त सूचनांचे फलक लावलेले असतात. पण एक लक्षात घ्या, हे फलक प्राण्यांना वाचता येत नाहीत. त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्यामुळे ते गोंधळून गेले आहेत. त्यामुळे रस्तोरस्ती वाहनांखाली चिरडून पडलेले अनेक प्राणी आपल्याला दिसतात. क्वचितप्रसंगी कुत्रे, माकडे, हरिण, मांजर किंवा इतर जनावरेही दिसतात. हे चित्र मल खूप वेदनादायी वाटते. शंभर किमीच्या प्रवासात असे दोन-चार प्राणी मरून पडलेले नक्कीच दिसतात. पण या घटनेविषयी आपल्या मनात जराही अपराधभाव नसतो. आपली ही असंवेदनशीलता खूप भयंकर आहे. खूप वर्षांपूर्वी संत तुकारामांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे लिहून ठेवले आहे. आम्ही हा अभंग सुविचार म्हणून मिरवतो, पण निसर्गाशी एकात्म होण्याचा तुकोबांचा विचार मात्र आपण आचरणात आणत नाहीत. जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना ते ‘वनचरे’ म्हणतात. त्यांना आपले ‘सोयरे’ मानतात. हे ‘सोयरेपण’ दुर्दैवाने आपल्याला जपता आले नाही. जगभरातील अनेक देशांनी आता पर्यटकांवर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधामागे त्या त्या देशाचे राजकीय धोरण किंवा सुरक्षाविषयक चिंता आहेच पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरणीय संरक्षण. गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची संख्या जगभर वाढत चालली आहे. निसर्गरम्य परिसर, समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे किंवा सांस्कृतिक समृद्धता अनुभवणे हा पर्यटकांचा हेतू असतो. मात्र या पर्यटकांमुळे अनेक ठिकाणी गंभीर प्रश्न निर्माण होतात. पर्यावरणीय ताण वाढतो. कचरा आणि प्रदूषण वाढते. शहराच्या पायाभूत सुविधांवरही ताण पडतो. म्हणून अनेक देशात आता केवळ जबाबदार आणि संस्कृतीप्रेमी पर्यटकांनाच प्रवेश दिला जातो. नैसर्गिक संसाधनावर येणारा ताण हा अपरिहार्यपणे प्राण्यांच्या सहजीवनावर पडतो. आपणही याबाबत जागृत होण्याची गरज आहे. या भाषणात हा मुद्दा मी जाणीवपूर्वक मांडत आहे. या प्रश्नाचे गांभीर्य आपण समजून घ्याल अशी अपेक्षा. पृथ्वीला ओरबाडून कदाचित आपल्याला तात्कालिक सुख मिळेलही; पण त्याचे दीर्घकालीन परिणाम नकारात्मक असणार आहेत. जगभर असे ओरबाडणे सुरु आहे. समुद्राच्या तळापर्यंत आपण अवाढव्य यंत्रे सोडली आहेत. पाण्यातल्या जीवसृष्टीचे काय? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. जंगल, वने, ऐतिहासिक वास्तू, समुद्र या सगळ्याच बाबी आपल्या जगण्याला अधिक निकोप बनवत असतात. त्यामुळे त्यांच्यावर येणारे संकट हे आपल्यालाही गिळंकृत करू शकते, याची जाणीव आपण ठेवायला हवी. ज्या प्रश्नाविषयी आपण अत्यंत आस्थेने विचार करायला हवा, तेच प्रश्न आपण परिघाबाहेर ठेवत आहोत. नको त्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून झुंजत आहोत. धर्म आणि जातीच्या फुटकळ अहंकाराला कुरवळण्यापेक्षा पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी, संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. लेखकांनी या प्रश्नांचे गांभीर्य समाजमनावर बिंबवण्याची गरज आहे. आपल्या लिहिण्यामुळे अगदीच क्रांती घडणार नसली तरी किमान वाचकांच्या भावजीवनाला एक अनुकूल आकार मिळवण्याची प्रक्रिया तरी यामुळे सुरू होईल. विध्वंसक कृती करणाऱ्यांच्या मनात थोडी तरी संवेदनशीलता निर्माण होईल. पृथ्वीवर युगानुयुगांपासून माणसाची निरंकुश महासत्ता आहे. या महासत्तेच्या जोरावरच आपण सृष्टीवर हुकूमत गाजवत आलो आहोत. पण आता आपण थांबायला हवे. विधायक काही आपल्याला करता येत नसेल तर निदान विध्वंसक कृती तरी आपल्याकडून घडायला नको, असे मला मनापासून वाटते. इथे सगळी जाणती आणि संवेदनशील माणसे बसली आहेत, म्हणून मी हे जाणीवपूर्वक बोललो. असो, या निमित्ताने आपल्याशी संवाद साधता आला. मी खूप काही वेगळे बोललो असे नाही. जे आपल्या भोवती घडत आहे, त्याचीच केवळ मी आपल्याला जाणीव करून दिली आहे. आपण सर्वांनी माझे विचार ऐकले, याबद्दल आपले मानपासून आभार. धन्यवाद !
Source link
Home महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन: निसर्ग आणि माणूस यांच्या सहसंबंधाकडे लेखकाने आस्थेने बघायला...





