नेटस्ट्रीम: सिनेमॅटोग्राफीने तारलेली थ्रिलर सिरीज काला पानी; क्लायमॅक्सबद्दल उत्सुकता राहते कायम

0
16
नेटस्ट्रीम: सिनेमॅटोग्राफीने तारलेली थ्रिलर सिरीज काला पानी; क्लायमॅक्सबद्दल उत्सुकता राहते कायम


समीर गायकवाड3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपल्या स्वातंत्र्याच्या इतिहासात ‘काळ्या पाण्या’च्या शिक्षेमुळे क्रौर्याचा एक अध्याय लिहिला गेला. त्यामुळे पोर्ट ब्लेअरच्या कुख्यात सेल्युलर जेललाही स्वातंत्र्यपूर्व काळापासून ऐतिहासिक महत्त्व मिळाले. तिथे आणल्या गेलेल्या कैद्यांना दिली जाणारी सजा म्हणजे ‘काळे पाणी’! शिक्षेचा हाच संदर्भ वापरलेली, आशुतोष गोवारीकर आणि मोना सिंग यांची ‘काला पानी’ ही नेटफ्लिक्सवरील वेब सिरीज येणाऱ्या काळाची कहाणी सांगते. याला भविष्यवाणी म्हणता येणार नाही, ही गृहितके वाटावीत अशी तिची मांडणी आहे.

अंदमान आणि निकोबार बेटांना उर्वरित जगापासून अलिप्त केलं गेलेलं असतं. याचं कारण एका रहस्यमय आजाराच्या मुळाशी असतं. या आजारामुळं बेटावर राहणाऱ्या लोकांना जणू मृत्यूच्या छायेत राहावं लागतं. या बेटांवर रहस्यमय आजार इतके बळावतात की, तिथं राहणं ही एक प्रकारची काळ्या पाण्याची शिक्षा होऊन जाते! वेब सिरीजची कथा बेटावरील एका रहस्यमय आणि प्राणघातक महामारीच्या उद्रेकाभोवती फिरते. त्यामुळे अराजक आणि भीतीचे वातावरण पसरलेले असते.

या सिरीजची सुरूवात एका रहस्यमय आजाराने होते. लोकांच्या मानेवर काळे डाग पडत जातात. बाधित लोकांना तीव्र खोकला होतो आणि नंतर ते अचानक मृत्यूमुखी पडू लागतात. लक्षणे ठाऊक असूनही आणि बाधेची भीती असूनही एकट्या डॉ. सौदामिनी सिंग (मोना सिंग) वगळता कुणीही त्यांना तपासू इच्छित नसते. दरम्यान, या बेटांवर एका मोठ्या पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले जाणार असते. वास्तवात हा इव्हेंट म्हणजे एक कारस्थानच असते, जे अॅटम नावाच्या एका धनाढ्य कॉर्पोरेट फर्मने रचलेले असते. एक तऱ्हेचा तो सापळाच असतो. जसजसा साथीचा रोग पसरतो, तसतसे बेटावर राहणाऱ्यांना चिंतेने, भीतीने ग्रासले जाते. ही स्थिती पोस्ट-कोविड साथीच्या प्रसाराशी अगदी समांतर वाटते. हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सरसावते. शास्त्रज्ञ या आजारावर उपाय शोधण्यात गुंततात. त्यांच्या जगण्या- मरण्याच्या लढाईची वेळ येते, तर त्याचवेळी त्यांच्यातल्या काहींना वैयक्तिक टीकेचा सामना करावा लागतो. मालिकेत मोना सिंग व्यतिरिक्त, आशुतोष गोवारीकर निवासी एलजी (लेफ्टनंट गव्हर्नर) अॅडमिरल जिब्रान कादरी यांच्या भूमिकेत आहेत. त्याच्या छद्मी हास्याने असे वाटत राहते की, भविष्यात काय घडणार आहे, याची त्याला चांगली जाणीव असावी.

‘काला पानी’ची कथा विश्वपती सरकार यांनी लिहिली आहे. समीर सक्सेना आणि अमित गोलानी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. ही एक वेगळी आणि आकर्षक वेब सिरीज आहे, जी थरार जागवते. आजवर कधीही न पाहिलेले आरोग्य संकट दाखवण्याचा एक चांगला प्रयत्न म्हणून याकडे पाहता येईल. पर्यावरणाचे शोषण, नोकरशाहीतील भ्रष्टाचार आणि लोकांचे निसर्गाशी सुसंवादी नाते अशा विविध पैलूंचा शोध घेण्यात आला आहे. सर्व मिळून सात तासांच्या एपिसोडमध्ये हे पूर्ण प्रकरण कव्हर केले आहे. त्यामुळे कथानाकाची गती राखण्याशिवाय पर्याय नसल्याने सिरीज बऱ्यापैकी वेगवान झाली आहे.

‘काला पानी’च्या कथेशिवाय कलाकारांचा दमदार अभिनय, हेही या सिरीजचे मुख्य वैशिष्ट्य. मोना सिंग एकाकी फायटरच्या भूमिकेत चमकली आहे. प्रेमभंग झालेल्या रोमँटिक कॅब ड्रायव्हरच्या भूमिकेत सुकांत गोयलने लाइमलाइट कॅच केला आहे, तर आक्रमक पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अमेय वाघ याला चांगली स्पेस मिळाली आहे. बाकी कलाकारांनीही आपली पात्रे उत्तम प्रकारे साकारली आहेत. विशेषतः विकास कुमारने अगदी संयत शैलीत भावनांचे सादरीकरण केले आहे. आरुषी शर्मा ही ज्योत्स्नाच्या व्यक्तिरेखेत खूप निरागस, देखणी दिसते! राधिका मेहरोत्रा आणि चिन्मय मांडलेकर यांनीही डॉ. रितू आणि डॉ. शशी महाजन यांच्या भूमिकेतून कथेत उत्तम योगदान दिलं आहे.

या वेब सिरीजची सिनेमॅटोग्राफी (इव्हान मुलिगन, बर्नाबी क्रॉकर आणि धनंजय नवग्रह) ही एखाद्या स्वतंत्र पात्राइतकी सशक्त आहे. कॅमेऱ्याचे काम इतके देखणे झालेय की, भवतालातले सारे काही खरे वाटते. तथापि, संपूर्ण वेब सिरीजमधील सर्वात मोठा दोष म्हणजे कथेला निर्विवाद असा कथानायक / नायिका नाही. यामुळे ही मालिका अनेकदा माहितीपट वाटते. त्या जोडीला काही मनोरंजक पात्रे आणि त्यांचा व्यक्तिगत प्रवास आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक सायफाय थ्रिलरची अपेक्षा करणाऱ्यांच्या वाट्याला थोडीशी निराशा येऊ शकते.

‘काला पानी’ पाहताना काही त्रुटी स्पष्टपणे दिसतात. कथा काहीशी तुकड्या तुकड्यात समोर येते. मात्र, जग ज्या प्रकारे संकटातून जाताना दाखवले आहे नि साथीच्या आजारांचे जे चित्रीकरण केले गेले आहे, त्यात ही त्रुटी झाकली जाते. एकंदरीत, सुरूवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याची ताकद या सिरीजमध्ये असल्याने सगळे एपिसोड आपसूकच पाहिले जातात, ‘जंप थ्रू’चे चान्सेस कमी होतात आणि क्लायमॅक्सबद्दल उत्सुकता कायम राहते. काही दोष असले, तरीही या सिरीजमधून एक चांगला प्रयत्न केला आहे, हे मान्य करावे लागते.

(संपर्कः sameerbapu@gmail.com)



Source link