
Early Signs of Kidney Disease : किडनी आपल्या शरिरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनी शरिरातील नको असलेले पदार्थ बाहेर टाकून रक्त शुद्धीकरणाचे काम करत असते. ज्यामुळे आपले आरोग्य सुरक्षित राहते. म्हणूनच किडनी निरोगी राहणे फार महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा काही आजारांचे परिणाम थेट दिसून येत नाहीत. पण स्किन अॅलर्जी, डोळ्यांचा रंग यांसारख्या लक्षणांवरून आपण आजारी आहोत किंवा कोणत्या आजाराला सामोरे जात आहोत हे ओळखता येते.
किडनीची कार्यक्षमता कमी होणे :
वयानुसार शरिरातील सर्व भागांचे कार्य मंदावते.पण सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देण्यास फारसा वेळ मिळत नाही. अवेळी खाणे, योग्य प्रमाणात पाणी न पिणे, धु्म्रपान यासगळ्याचा परिणाम होऊन माणसाचा जीवनकाळ कमी होत चालला आहे. जड किंवा न पचणारे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने ते पचण्यास कठीण जातात. यामुळे किडनीला कमी वेळात जास्त काम करावे लागते आणि किडनी कमकुवत होण्याची शक्यता असते. याचा गंभीर परिणाम होऊन जीवाला धोका देखील निर्माण होऊ शकतो.
लक्षणांची ओळख :
शरिरावर दिसणाऱ्या काही लक्षणांवरून तुम्हाला किडनीचा आजार आहे हे ओळखता येऊ शकते. साधारणतः थकवा येणे, चेहऱ्यावर किंवा पायांवर सूज येणे, भूक न लागणे आणि रात्री वारंवार लघवी होणे अशी लक्षणे दिसून येतात. किडनीच्या आजारावर वेळीस उपचार न केल्यास आजार पुढे वाढून उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे योग्यवेळी लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. जेव्हा किडनी खराब होऊ लागते तेव्हा त्याचे परिणाम सर्वप्रथम आपल्या त्वचेवर दिसू लागतात.
स्किन अॅलर्जी :
किडनी योग्य प्रकारे शरीरातील रक्त डिटॉक्स करू शकत नाही तेव्हा शारिरीक आरोग्याला हानी पोहोचवतील असे पदार्थ बाहेर टाकले जात नाहीत. ज्यामुळे हे पदार्थ रक्तात मिसळले जातात आणि चेहऱ्यावर डाग येणे, पुरळ यणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय त्वचेच्या रंगामध्येही फरक जाणवतो. त्वचा आणि डोळे पिवळसर होतात जे कावीळ होण्याचे लक्षण आहे. याव्यतिरिक्त एनीमिया या आजारामुळे देखील त्वचा पिवळी पडू लागते. शिवाय स्किन अॅलर्जीमुळे त्वचेवर खाज येते आणि लाल चट्टे किंवा जखमही होते.
किडनी निरोगी राहण्यासाठी उपाय :
1. नियमित व्यायाम करा.
2. वजन नियंत्रणात ठेवा.
3. धूम्रपान टाळा.
4. पुरेसे पाणी प्या.
5. आहारात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा.








