
सेंट लुइस : ‘जलद’ आणि ‘अतिजलद’ प्रकारातील निराशेनंतर जगज्जेता बुद्धिबळपटू दोम्माराजू गुकेशचे ‘पारंपरिक’ प्रकारात कामगिरी उंचावण्याचे लक्ष्य असून आज, सोमवारपासून सुरू होणाऱ्या सिंकेफिल्ड चषक स्पर्धेत तो सहभाग नोंदवेल. त्याचा भारतीय सहकारी ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदही विजयमंचावर येण्याच्या उद्देशानेच या स्पर्धेत खेळेल.
‘ग्रँड चेस टूर’च्या पाचव्या टप्प्यातील या स्पर्धेत मॅग्नस कार्लसन खेळणार नाही. ‘पारंपरिक’ बुद्धिबळ खेळण्यातील आपला रस कमी होत चालल्याचे कार्लसनने अनेकदा बोलून दाखवले आहे. त्याच्या अनुपस्थितीत गुकेशला जेतेपदाची उत्तम संधी आहे. नुकत्याच झालेल्या सेंट लुइस जलद आणि अतिजलद स्पर्धेत गुकेश सहाव्या स्थानी राहिला होता. ही स्पर्धाही ‘ग्रँड चेस टूर’चा भाग होती. ‘ग्रँड चेस टूर’च्या एकूण गुणतालिकेत गुकेश सध्या पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे सिंकेफिल्ड चषक स्पर्धेत अधिक गुणांची कमाई करून वर्षाअखेरीस होणाऱ्या अंतिम फेरीसाठी आपले आव्हान राखण्याचा गुकेशचा प्रयत्न असेल.
सिंकेफिल्ड स्पर्धेत गुकेश, प्रज्ञानंद यांच्यासमोर अमेरिकेचे फॅबियानो कारुआना आणि लेव्हॉन अरोनियन, तसेच फ्रान्सचा अलिरेझा फिरुझा यांचे प्रामुख्याने आव्हान असेल. गुकेश आणि प्रज्ञानंद या दोघांनीही पुढील महिन्यात उझबेकिस्तान येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ग्रँड स्वीस स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित केला आहे. त्याआधी लय मिळविण्याचा या दोघांचा प्रयत्न असेल.
‘सिंकेफिल्ड चषक’ स्पर्धक : दोम्माराजू गुकेश, आर. प्रज्ञानंद (दोघे भारत); फॅबियानो कारुआना, वेस्ली सो, लेव्हॉन अरोनियन, सॅम सॅव्हियन (सर्व अमेरिका); मॅक्सिम व्हॅचिएर-लाग्रेव्ह, अलिरेझा फिरुझा (दोघे फ्रान्स); यान-क्रिस्टोफ डुडा (पोलंड); नोदिरबेक अब्दुसत्तोरोव (उझबेकिस्तान).