
Is paracetamol safe during pregnancy: गर्भधारणेदरम्यान वेदना किंवा तापासाठी पॅरासिटामॉलचा वापर केल्यास मुलांमध्ये ऑटिझम, लक्ष-अभाव हायपरॲक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) किंवा बौद्धिक अपंगत्वाचा धोका वाढतो, हा समज योग्य नसल्याचे ‘द लॅन्सेट’मधील एका नव्या आणि व्यापक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. जगभरातील उपलब्ध संशोधनांचा सखोल आढावा घेतल्यानंतर संशोधकांनी गर्भवती महिलांना दिलासा देणारा निष्कर्ष मांडला आहे. हा अभ्यास लंडन विद्यापीठातील सिटी सेंट जॉर्ज येथील संशोधकांनी केला असून, आतापर्यंत झालेल्या ४३ स्वतंत्र अभ्यासांचे विश्लेषण करण्यात आले आहे. हे निष्कर्ष द लॅन्सेट ऑब्स्टेट्रिक्स, गायनॉकॉलॉजी अँड वुमेन्स हेल्थ या प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. मागील काही वर्षांत पॅरासिटामॉल आणि ऑटिझम यांच्यात संभाव्य संबंध दर्शवणाऱ्या अहवालांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर या संशोधनाने स्पष्टता आणली आहे.
गर्भधारणेदरम्यान सर्वाधिक वापरले जाते पॅरासिटामॉल
पॅरासिटामॉल (एसिटामिनोफेन) हे गर्भधारणेदरम्यान सर्वाधिक वापरले जाणारे वेदनाशामक आणि ताप कमी करणारे औषध आहे. जागतिक पातळीवर ते पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते. नॉन-स्टेरॉइडल अँटी-इन्फ्लेमेटरी औषधे किंवा ओपिओइड्सच्या तुलनेत त्याची सुरक्षितता अधिक असल्याने प्रसूती काळजीमध्ये डॉक्टरांकडून त्याची शिफारस केली जाते.
यापूर्वी मांडलेले दावे
यापूर्वी पॅरासिटामॉलविरोधात मांडले गेलेले दावे प्रामुख्याने अपूर्ण माहिती, संभाव्य पक्षपात आणि कौटुंबिक घटकांचा पुरेसा विचार न केलेल्या अभ्यासांवर आधारित होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. नव्या अभ्यासात मात्र भावंडांच्या तुलनात्मक विश्लेषणाचा वापर करण्यात आला. एका गर्भधारणेत पॅरासिटामॉल घेतला गेला आणि दुसऱ्यात घेतला गेला नाही, अशा परिस्थितीतील मुलांची तुलना करण्यात आली, ज्यामुळे अनुवंशिकता, कौटुंबिक वातावरण आणि पालकांचे दीर्घकालीन गुणधर्म यांचा प्रभाव अधिक अचूकपणे तपासता आला.
या अभ्यासांमध्ये ऑटिझमसाठी २.६२ लाखांहून अधिक मुले, ADHD साठी ३.३५ लाखांपेक्षा जास्त मुले आणि बौद्धिक अपंगत्वासाठी सुमारे ४.०६ लाख मुलांचा समावेश होता. या सर्व विश्लेषणांतून असे आढळले की गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलचा वापर आणि या न्यूरोविकसनात्मक विकारांमध्ये कोणताही थेट संबंध दिसून येत नाही.
या अभ्यासाच्या प्रमुख संशोधक आणि प्रसूती व मातृ-भ्रूण औषधशास्त्राच्या प्राध्यापिका अस्मा खलील यांनी सांगितले की, “आमच्या निष्कर्षांवरून असे सूचित होते की पूर्वी दिसलेले संबंध हे औषधामुळे नसून, ताप, वेदना किंवा आनुवंशिक प्रवृत्ती यांसारख्या इतर मातृ घटकांमुळे असू शकतात.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, मार्गदर्शनानुसार वापरल्यास पॅरासिटामॉल गर्भधारणेत सुरक्षित आहे आणि त्यामुळे गर्भवती महिलांनी अनावश्यक भीती बाळगू नये.
संशोधकांच्या मते, ताप किंवा तीव्र वेदना दुर्लक्षित केल्यास आई आणि गर्भ दोघांसाठीही धोका वाढू शकतो. त्यामुळे आवश्यक असताना पॅरासिटामॉल टाळणे उलट नुकसानकारक ठरू शकते. अभ्यासातील सर्व संशोधनांचे मूल्यमापन QUIPS (Quality in Prognosis Studies) या मान्यताप्राप्त साधनाद्वारे करण्यात आले आहे.
सोशल मीडियावरील दावे खरे?
एकूणच, सोशल मीडियावरील दावे किंवा राजकीय विधानांपेक्षा वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित वैद्यकीय सल्ल्याला महत्त्व देण्याचे आवाहन या अभ्यासातून करण्यात आले आहे. गर्भधारणेदरम्यान वेदना आणि तापासाठी पॅरासिटामॉल अजूनही सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय असल्याचा ठाम निष्कर्ष संशोधकांनी मांडला आहे.








