मुंबई13 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
गणपती हा कलाधिपती असल्यामुळे त्याचे अस्तित्व प्रत्येक लोककलेत पाहायला मिळते. किंबहुना गणांचा – कलांचा अधिपती असतानाही गणपती इतकी सर्वव्यापी देवता दुसरी कुठली नाही. म्हणून तर विविध रुपांत, रंगात-ढंगात त्याला पाहता येतं. आपल्या लोककलावंतांनी गणेशाच्या या रूपातील लवचिकतेचा अन् व्यापकतेचा वापर आपल्या कलेत मोठ्या प्रमाणात केला आहे. गणेशोत्सव आला की साऱ्या महाराष्ट्रातील, देशभरातील लोकांच्या आनंदाला उधाण येते. कारण गणेश गणनायक-लोकनायक आहे, तसा तो लोकसखाही आहे. तो विद्येची आणि कलांची देवता आहे. भगवान गणेशाच्या वेदप्रामाण्यवादी रूपापेक्षा त्याचे लोकमानसातील हे रूप अधिक लोभसवाणे आहे. संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या प्रारंभी… ॐ नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या॥ जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा॥१॥ देवा तूंचि गणेशु। सकळ मति प्रकाशु॥ म्हणे निवृत्ति दासु। अवधारिजो जी॥२॥ अशा शब्दांत गणेशाचा धावा केला आहे. हे गणेशाचे रूप ‘सकळ मति प्रकाशु’ असे आहे. आपल्या संस्कृतीत भगवान श्रीकृष्णाप्रमाणे भगवान गणेशालाही ‘लोकसखा’ मानले आहे. असा विघ्नहर गणेश ही मूळची यक्षकुळातील देवता. एका बाजूला या देवतेचे आर्य संस्कृतीतील वेदप्रामाण्यवादी रूप म्हणजे गणेश, तर दुसऱ्या बाजूला द्रविड संस्कृतीतील दंडनायक किंवा क्षेत्रपाल देव हे रूप. आपल्या राजकीय, सामाजिक व्यवस्थेत एकेकाळी ‘लोकनायक’ म्हणून नेतृत्व करणाऱ्यांचा सकारात्मक विचार व्हायचा. पण, अलीकडे अशा लोकनायक रुपातील गणेशाचे उत्सव साजरे करणारी मंडळी मात्र ‘दंडनायक’ म्हणून पुढे येत असल्याचे दिसते. खरे तर समाजाला त्यांचे हे रूप अपेक्षित नाही, तर त्या ऐवजी ‘क्षेत्रपाला’चे, म्हणजे आपल्या भूमीच्या, लोकांच्या रक्षणकर्त्याचे रुप अभिप्रेत आहे. असो. लोककलेतील लोभस रुपे आपल्या विविध साहित्य प्रकारांतून त्याची अगदी ‘गौरीचा बालक’ यापासून ते सिंदूर राक्षसाचा वध करणारा गणेश ही वेगवेगळी रूपे लोकमानसात स्थिरावली आहेत. त्याचे दैवी रूप आणि ‘लोकसखा’ म्हणून लौकिक रूप सर्वांना हवेहवेसे वाटते. क्षेत्रपाल देवतांचे परिमंडल लोकसंस्कृतीत स्थिरावले. त्याचे नेतृत्व खऱ्या अर्थी भगवान गणेशाने केले. त्यामुळे कीर्तन, भारुड, भजन, दशावतार, गोंधळ, जागरण इतकेच काय; तमाशा, खडीगंमत यांसारख्या रंजनप्रकारांमध्येही कुठे संकीर्तन म्हणून, तर कुठे प्रत्यक्ष दर्शन म्हणून गणेशाचे आगमन होते. लोककलेतील या लोकनायक, लोकसखा गणेशाची रूपे खूप वेधक आणि तितकीच आश्वासक आहेत. गणेश ही कलेची देवता. तो लोककलांचा अधिपतीही आहे. लोककलावंतांनी कलेच्या सादरीकरणात विघ्ने येऊ नयेत म्हणून विघ्नहर्त्याची पूजा बांधली. त्यामुळे कधी तो केवळ संकीर्तन रुपात, तर कधी साक्षात नाट्यरूपात भेटतो. त्याचे हे संकीर्तनरुप आणि नाट्यरूप लोककलांमध्ये कधी रांगड्या, तर कधी प्रासादिक रुपात सादर होते. गणांतील गणपती हा कधी बालरूपात, कधी सकल कलांचा अधिपती, तर कधी विघ्नविनाशक अशा स्वरूपात प्रगटतो. लोककलेतील गणेशाची ही रूपे खरोखरच लोभसवाणी आहेत. संकीर्तनच नव्हे, तर नर्तनही… पूर्वी गणेशोत्सवात नमन, खेळे, जाखडी, दशावतार, भारुड, मेळे सादर व्हायचे. जागरण, गोंधळ, भराड आदी विधिनाट्ये ही सर्व लोककलांच्या प्रारंभीची नाट्ये होत. या नाट्यांमध्ये आणि कलगी-तुऱ्यामध्येही गणेशाचे वंदन असते. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत नमन-खेळे, जाखडी या कलाप्रकारांत गणेशाचे फक्त संकीर्तनच नव्हे, तर नर्तनही असते. ठाणे-पालघर जिल्ह्यांत बोहाड्याची परंपरा आहे. या बोहाड्यात टेंब्यांच्या प्रकाशात गणपती नाचत येतो. रात्रभर हे बोहाडे रंगतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गंगावणे आणि मसगे या ठाकर समाजातील लोककलावंतांनी कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथी परंपरेद्वारे गणेशाचे दर्शन घडवले आहे. सूत्रधार, भटजी, गणपती, सरस्वती, रिद्धी-सिद्धी यांच्या चित्रांच्या पोथ्या दाखवीत चित्रकथी गणपतीचे संकीर्तन करतो. तर, कळसूत्रीच्या खेळातही गणपती बाहुलीच्या रुपात दर्शन देतो.
कलगी-तुऱ्यातील नाट्यमय सूचन भेदिकाद्वारे आध्यात्मिक कुटे सादर करणारे कलगीपक्ष, तुरापक्षाचे शाहीर गणाच्या उत्पत्तीसंबंधी परस्परांना कूट प्रश्न विचारीत असत. पठ्ठे बापूराव आणि भाऊ फक्कड यांच्या गणांवरून हे स्पष्ट होते. गणपती ही यक्षकुळातील देवता असल्याचे भाऊ फक्कड यांना ज्ञात होते. गणांची निर्मिती करताना त्याद्वारे परस्परांना आव्हान देण्याचा गानप्रकार म्हणूनही या रचनाकारांनी गणांचे उपयोजन केले. पठ्ठे बापूरावांचा हा गण पाहा… लवकर यावे सिद्ध गणेशा आतमधी कीर्तन वरूनी तमाशा।। माझा भरवसा तुम्हावरी खासा विघ्न पिटविशी दाही दिशा।। झेंडा मिरवशी आकाश पाताळी वैरी करीती खाली मिशा।। पठ्ठे बापूराव कवींच्या कवनी बाजार बुणग्याचा झाला हशा।। पठ्ठे बापूराव हे कलगीपक्षाचे शाहीर होते. त्यांनी या गणातून, तुरेवाल्या शाहिरांना भेदिकाच्या लढतीत नामुष्की पत्करावी लागेल, असे एकप्रकारे आव्हानच दिले आहे. अशा रीतीने गणांच्या निर्मितीतही कलगी-तुरा संघर्षाचे नाट्यमय सूचन झालेलं आहे. जागरणासारख्या विधिनाट्यातून गण सादर होताना भेदिकांच्या लढतीचे स्वरूप नसते. गणपतीचे संकीर्तन एवढाच मर्यादित हेतू त्यात असतो.
गणांमधील विविध रूपे गणांतील गणपती हा कधी बालरूपात, कधी विद्येचा अधिपती, कधी सकल कलांचा अधिपती, तर कधी विघ्नविनाशक अशा स्वरूपात येतो. या गौरीनंदन अशा गणपतीचे शंकरराव जाधव – धामणीकर यांनी जागरणात शब्दबद्ध केलेले रूप पाहा… आज वंदन करितो गौरीनंदन नवविध विद्या करितो भक्ती। भक्तासी द्यावी मुक्ती हीच आमुची सर्व शक्ती लावितो पणा।।१।। चौदा विद्येचा गणपती। चौसष्ट कला तुझे हाती बालकासी द्यावी स्फूर्ती। गावचा गुणा ।।२।।
विधिनाट्यातील गणांचे आशयसूत्र ‘जागरण’ या विधिनाट्यात सादर होणारे गण पाहता या गणांच्या सादरीकरणामागे जे आशयसूत्र दिसते ते असे… १) कार्यारंभी आशीर्वचन प्राप्तीसाठी गणाचे वंदन करावे. २) कलेच्या प्रारंभीच सकल कलांच्या या देवतेकडून रंगऊर्जा घ्यावी. ३) अरिष्टांचे निवारण होण्यासाठी गणपतीचा धावा करावा. ही अरिष्टे दोन प्रकारची असतात. भौतिक पातळीवरची आणि अधिभौतिक पातळीवरची. भौतिक अरिष्टे म्हणजे आर्थिक आपत्ती, रोगराई आदी. अधिभौतिक अरिष्टे म्हणजे काम, क्रोध आदींपासून अभय प्राप्त व्हावे म्हणून गण सादर करणे. ४) गणातून ‘गणा’शी संवाद. गण म्हणजे व्यक्तींचा समूह. या समूहाशी आणि प्रत्यक्ष गणपतीशी संवाद साधण्याचा प्रयत्न या गणांद्वारे होत असतो. शंकराची आराधना, खंडोबाची आराधना आणि गण यानंतर जागरणात इष्ट देवतांना पाचारण केले जाते, ते पदरूप आवाहनाच्या रूपाने गोंधळातही असेच गण सादर होतात.
भक्तिनाट्यातील आराधना भारुड या भक्तिनाट्याचा प्रारंभही मुळात गणेश स्तवनाने होतो. ‘विठ्ठल, गणपती दुजा नाही..’ ही संतांची भावना भक्तांमध्येही अवतरलेली असते. लालबाग, परळ, माझगाव, भायखळा या परिसरांमध्ये एकेकाळी भारुडी भजन मंडळी होती. प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर तालुक्यांतील मंडळे ही भारुडे सादर करायची. भारुड, दशावतार, लळीत ही तिन्ही भक्तिनाट्ये. त्यामुळे त्यामध्ये गणपती, रिद्धी – सिद्धीचे सोंग हमखास असते. अशाच एका भारुडातील गण असा… तुज नमो नमो ओमकार स्वरूपा। ओमकार स्वरूपा नमो नमो।। ओमकार स्वरूपा। सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा। तुज नमो।। गणपती हा कलाधिपती असल्यामुळे त्याचं अस्तित्व प्रत्येक लोककलेत पाहायला मिळते. किंबहुना गणांचा – कलांचा अधिपती असतानाही गणपती इतकी सर्वव्यापी देवता दुसरी कुठली नाही. म्हणून तर विविध रुपांत, रंगात-ढंगात त्याला पाहता येतं. आपल्या लोककलावंतांनी गणेशाच्या या रूपातील लवचिकतेचा अन् व्यापकतेचा वापर आपल्या कलेत मोठ्या प्रमाणात केला आहे. या कलांचे केवळ सादरीकरणच नव्हे, तर सातत्यपूर्ण जतन आणि संवर्धन करणे, हीच गणरायाची आराधना मानली पाहिजे. प्रा. डॉ. प्रकाश खांडगे prakash.khandge@gmail.com





