- Marathi News
- Opinion
- ‘External’ Facilities And ‘internal’ Prosperity Rasik Article By Bhushan Kumar Upadhyay
डॉ. भूषणकुमार उपाध्याय8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाचा विचार करताना, भौतिक सुविधांसोबत पोलिसांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक सुदृढतेकडेही लक्ष दिले पाहिजे. गुन्हेगारीमुक्त, सुखी – शांत समाजाची सिद्धी साध्य करण्यासाठी त्यांना ‘अातून’ही समृद्ध करावे लागेल.
पोलिस दलाचे आधुनिकीकरण हा सध्याच्या काळात एक अतिशय महत्त्वाचा विषय बनला आहे. आधुनिकीकरण म्हणजे नेमके काय आणि ते कसे असावे, यावर भरपूर चर्चाही झाली आहे. आधुनिक शस्त्रे आणि साधने, चांगल्या गाड्या, पोलिस स्टेशनसाठी सुसज्ज इमारत, संगणकीकरण, सीसीटीव्ही कॅमरे, कालानुरुप प्रशिक्षण इत्यादी गोष्टी या आधुनिकीकरणामध्ये गृहीत धरल्या जातात. संपूर्ण देशभरात या गोष्टींच्या बाबतीत बरेच काम झालेही आहे. त्याचबरोबर, पोलिसांचे पगार आणि अन्य सुविधांमध्येही अलीकडे बऱ्यापैकी वाढ होत आहे. प्रशिक्षणातही काही प्रमाणात चांगला बदल झाला आहे. हे बदल सकारात्मक आणि स्वागतार्ह असले, तरी ते तुलनेने अपुरे आहेत किंवा त्यांना ‘परिपूर्ण बदल’ मानता येत नाही. कारण हे बदल प्रामुख्याने बाह्य स्वरुपाचे आहेत. वास्तविक पोलिस दलामध्ये अशा भौतिक बदलांसोबत मानसिक आणि भावनिक बदल होणे तितकेच आवश्यक आहे. पोलिसांनी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या कणखर होण्यासाठी आजवर फारसे काम झाल्याचे दिसत नाही.
नियमित व्यायाम, खेळ, योगासने यांमुळे आपले शरीर स्वस्थ आणि निरोगी राहते. पण, असे दिसून येते की, पोलिसांचे प्रशिक्षण संपल्यावर परेड आणि सर्व प्रकारचे व्यायाम बंद होतात. त्यांना केवळ सोपस्कार म्हणून प्रशिक्षण संस्थांमध्ये योगासने शिकवली जातात. पण, त्यांची एकदा फील्डवर नेमणूक झाली की शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक असलेले व्यायाम बंद होतात. गुन्हे नियंत्रणापासून तपासापर्यंत पोलिसांचा फिटनेस महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे व्यायाम आणि फिटनेससाठी त्यांना विभागातील वरिष्ठांकडून प्रोत्साहन तसेच त्यासाठी लागणारा वेळ दिला गेला पाहिजे.
दुसरीकडे, गुन्ह्याच्या तपासातील नवे शास्त्रीय ज्ञान, त्यासाठीचे आधुनिक प्रशिक्षणही पोलिसांना फारसे दिले जात नसल्याचे चित्र आहे. आजकाल अन्य गुन्ह्यांसोबतच आर्थिक गुन्हे, सायबर गुन्हे यांचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा प्रकारच्या गुन्हांच्या तपास अतिशय कौशल्याने करावा लागतो. त्यासाठीचे प्रशिक्षण सर्व पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना नियमितपणे देण्याची गरज आहे. या संदर्भातील ज्ञानाची उजळणी करणारी सत्रेही वेळोवेळी आयोजित केली जावीत.
डॅनियल गोलमन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने माणसातील भावनिक बुद्धिमत्ता किंवा भावनांकाचा (Emotional Quotient) सिद्धांत मांडला. त्याचा मते, आपला भावनांक चांगला असेल, तर आयुष्य सुखी आणि यशस्वी होते. भावनांक म्हणजे स्वतःच्या भावनेची समज असणे. स्वतःच्या भावना नीट समजल्या की आपण त्यांच्यावर सहजपणे नियंत्रण करू शकतो. असे नियंत्रण मिळवणे हे एका अर्थाने आयुष्यावर ताबा मिळवण्यासारखे आहे. कारण, त्यामुळे आपण इतरांच्या भावनाही समजून घेऊ शकतो. यातून परस्परसंबंध सुधारतात आणि एक चांगली कार्यसंस्कृती विकसित होते. गोलमनने यांनी भावनांकाच्या वाढीसंदर्भात प्राणायाम आणि ध्यानधारणेचीही चर्चा केली आहे. आता जगातील सर्व महत्त्वाच्या शिक्षण – प्रशिक्षण संस्थांमधून भावनांकाविषयी शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जाते. आपल्याकडील प्रशिक्षण संस्थांमध्येही भावनांकावरील अभ्यासक्रम ठेवण्यात आले आहेत. ज्यांनी ते पूर्ण केले आहेत, त्यांची कार्यक्षमता वाढल्याचे सिद्ध झाले आहे.
वास्तविक समाजातील प्रत्येकाचाच भावनांक चांगला असणे अपेक्षित असते. पण, त्यातही पोलिसांच्या कामाचे स्वरुप आणि त्याचा लोकांच्या आयुष्यावर होणारा दूरगामी परिणाम पाहता, त्यांचा भावनांक उत्तम असणे आवश्यक ठरते. तो असेल तर पोलिसांना आपल्याकडे येणाऱ्या सामान्य लोकांच्या भावना नेमकेपणाने कळतील, परिणामी त्यांच्याकडून प्रत्येकाला तितकाच सकारात्मक प्रतिसाद मिळेल. हे साध्य होण्यासाठी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांमधील भावनांक वाढण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तथापि, आपल्याकडे या दृष्टीने काही चांगले प्रयत्न झालेही आहेत. सुबोध जयस्वाल हे पोलिस महासंचालक असताना मरोळच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये भावनिक बुद्धिमत्तेविषयी अभ्यासक्रम सुरू केला होता.
केंद्राचे तत्कालीन प्राचार्य सोमनाथ घारगे यांनीही त्यासाठी मोलाचे योगदान दिले होते. घारगे यांनी भावनांकाविषयी एक पुस्तकही लिहिले आहे. मरोळच्या केंद्रात सुरू झालेला हा अभ्यासक्रम राज्यातील सर्व पोलिस प्रशिक्षण केंद्रांमध्ये सुरू करण्यात आल्याने त्याचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनात खूप लाभ झाला.
बरेच पोलिस खूप तणावात काम करतात. त्यातूनच पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या तसेच त्यांच्या आत्महत्येच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. भावनांक वाढवण्याचे प्रशिक्षण अशांसाठी खूप उपयोगी पडू शकते. मी कारागृह प्रशासनात अप्पर पोलिस महासंचालक असताना योग, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे बरेच कार्यक्रम घेतले. त्यामध्ये मानसोपचारतज्ज्ञांचीही खूप मदत मिळाली. या उपक्रमाचा कैद्यांच्या मनावर आणि वर्तनावर खूप चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले. संत तुकाराम महाराज म्हणतात.. मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचें कारण।। त्यामुळे पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाचा विचार करताना, भौतिक सुविधांसोबतच पोलिसांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक संपन्नतेकडेही जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. आपल्याला गुन्हेगारीमुक्त अशा सुखी – शांत समाजाची सिद्धी साध्य करायची असेल, तर बाह्य सोयी-सुविधांसोबत पोलिस बांधवांना ‘आतून’ही समृद्ध करावे लागेल.
(संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)





