हेमकिरण पत्की11 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आपण आणि प्राणी यांत एक ठळक फरक आहे. हा फरक आहे वाणीचा. पशु-पक्ष्यांची एक भाषा आहे. तिच्यात आपले शब्द नाहीत; पण कळपानं, थव्यानं राहण्यासाठीचे काही शब्द-संकेत आहेत. असं म्हणतात, की मुंग्या इशाऱ्यानं काम करतात. मधमाश्या आपापसात मिळून काम करतात. यांवरून त्यांची एक भाषा असली पाहिजे, असा कयास आपल्याला करता येतो. आपल्यासाठी मात्र वाणी हे विचार-प्रकाशनाचं साधन आहे. आपल्याला ही ईश्वरानं दिलेली मोठी शक्ती आहे. या शक्तीचा योग्य उपयोग झाला, तर ती आपल्या उन्नतीचं साधन बनू शकते. वाणीला आपण कल्याणकारिणी शक्तीच्या रूपात परिणत करू शकतो. या वाणीची अद्भुत शक्ती आपल्यासाठी कल्याणकारी व्हावी, यासाठी कबीर आपल्या दोह्यांतून विचारांचं जागरण करतात…
जैसा भोजन खाइये
तैसाही मन होय।
जैसा पानी पीजिये
तैसी बानी होय।।
या दोह्यातला एकही शब्द कळायला कठीण नाही. मग या दोह्यांतून व्यक्त होणारी आहाराची आचार-संहिता आपल्याला का उमजत नाही? अन्नपदार्थांचे गुण मनाला प्राप्त होतात, हे आपल्या बुद्धीला का पटत नाही? सात्त्विक आहार सात्त्विक मनोदशा निर्माण करतो, याचा अनुभव आपल्याला का येत नाही? आपण शरीराची गरज न जाणता केवळ इच्छेने खातो. बऱ्याचदा आपल्याला खरी तहान-भूक कळत नाही. कबीर तर तळमळीनं सांगतात की, वाणीच्या शुद्धतेसाठी आहार आणि पाणी दोन्हीही शुद्ध पाहिजेत. भरणपोषणातली शुद्धता ही किती महत्त्वाची गोष्ट आहे! आहाराच्या शुद्धतेमध्ये अन्नपदार्थांची स्वच्छता तर आहेच; पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न रांधणाऱ्याचा आणि ते ग्रहण करणाऱ्याचा मनोभावही महत्त्वाचा आहे. हीच वाणीतल्या शक्तीसाठी अवधान देण्याची गोष्ट आहे. वाणीच्या पथ्याची ही मूलभूत गोष्ट सांगितल्यावर कबीर विचार-प्रकाशनाचं साधन असणाऱ्या वाणीविषयीचं पुढलं पथ्य सांगतात…
ऐसी बानी बोलिये
मन का आपा खोय।
औरन को शीतल करै
आपहु शीतल होय।।
वाणीचा उपयोग करण्याच्या बाबतीत ज्या मर्यादा आहेत, त्यातील एक म्हणजे वाणीतून नेहमी सत्य उच्चारणच झालं पाहिजे. याचाच अर्थ जी गोष्ट आपण सत्य मानतो, तिचं उच्चारण झालं पाहिजे. आपलं असणं स्थितीशील नसतं. आपल्यासाठी सत्य बदलत राहील. आपल्याला आज सत्याचं दर्शन होत आहे, त्यापेक्षा वेगळं दर्शन उद्या होईल. वाणीत तेवढा फरक करावा लागेल. यामुळं आपला अहंकार ठायीच विरून जाईल. मितभाषण आणि निंदावचनरहित भाषण मधुर असतं. तेच दुसऱ्याच्या आणि आपल्या अंत:करणाला समाधान देतं, शांतवतं. आपली वाणी ही अमृतवाणी असावी, असं कबीर म्हणतात. जे मनात येतं, ते आपण दुसऱ्याला बोलून दाखवतो. या कृतीला मनाचा मोकळेपणा समजतो. आज समाजमाध्यमांतून आपल्या मनात येतं ते व्यक्त होत आहे. केवढे शाब्दिक, अविचारी आणि असंयमी होत चाललो आहोत आपण! शब्दांतून व्यक्त होण्याची एवढी गरज तरी आहे का? याचा विचार-विवेक आपण करतो आहोत का? वाणीच्या ठायी असलेल्या अमाप शब्दशक्तीचा बोध आपल्याला होतोय का, याचं चिंतन व्हायला हवं. कबीर म्हणतात…
बालू जैसी किरकिरी
ऊजल जैसी धूप।
ऐसी मीठी कछु
नहीं जैसी मीठी चूप।।
कबीर वाळूचा आणि उन्हाचा मूळ गुणधर्म सांगताहेत. वाळूसारखी खरखरीत नि उन्हासारखी रखरखीत कोणतीही वस्तू आढळून येत नाही. मौनाचाही स्वतःचा वेगळा गुणधर्म आहे. ते वाळूसारखं खरखरीत नाही आणि उन्हासारखं रखरखीत नाही. त्यात जीवनाचा ओलावा आहे. मौन मुळातच मधुर आहे. शब्द कठोर असू शकतात, दुसऱ्याचं, स्वतःचं अंत:करण दुखावणारे असू शकतात. पण मौन निर्गुण आहे – अगदी आपल्या आत्म्यासारखं. कबीरांना मौन ही ‘परा’वाणी वाटते. ती अतिशय सूक्ष्म आहे म्हणून. कबीरांनी या दोह्यांतून केलेलं वाणीच्या शब्दशक्तीचं आणि मौनाचं चिंतन आपण केलं, तर आपली वाणी संकुचित राहणार नाही. ती शक्तीचं व्यापक रूप धारण करील.
(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)







