एन. रघुरामन यांचा कॉलम: हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!

0
5
एन. रघुरामन यांचा कॉलम:  हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!




एका जुन्या बोधकथेचे स्मरण करा : अनेक प्रशिक्षित मेकॅनिक्स अपयशी ठरल्यानंतर एक मोठी मशीन दुरुस्त करण्यासाठी एका साध्या माणसाला बोलावले जाते. साधारण तासभर मशीनची तपासणी केल्यानंतर तो एका विशिष्ट ठिकाणी जोरात हातोडा मारतो. मशीन सुरू होते. मशीन सुरू करूनच नाही, तर दहा हजार रुपयांचे बिल हातावर टेकवून तो मालकाला थक्क करतो. जेव्हा विचारले जाते, ‘केवळ एकदाच हातोडा मारण्याचे इतके पैसे का?’ तेव्हा तो आत्मविश्वासाने सांगतो, “हातोडा मारण्याचे शुल्क फक्त एक रुपया आहे. तो नक्की कुठे मारायचा याची माहिती असण्याचे शुल्क 9,999 रुपये आहे.” यूपीपासून कर्नाटकच्या बेंगळुरूपर्यंत आणि महाराष्ट्रातील पुण्यापासून हरियाणाच्या मोठ्या भागापर्यंत सध्या नेमका हाच खेळ सुरू आहे. अनेक शहरांच्या बाहेरील भागात, जिथे पूर्वी शेती हीच मुख्य अर्थव्यवस्था होती आणि मान्सूनच नशीब ठरवायचा, तिथले जमीनमालक आता ‘स्पोर्ट‌्स आंत्रप्रेन्योर’ (क्रीडा उद्योजक) बनून कल्पनेपेक्षा जास्त पैसा कमावत आहेत. होय, जे शेतकरी कधीकाळी आपली जमीन हिरवीगार ठेवण्यासाठी संघर्ष करायचे, ते आता ती ‘ब्राऊन कलर’मध्ये (कोरडी) ठेवत आहेत. जसा क्रिकेटचा खेळ कॉर्पोरेट लाइफस्टाइलचा भाग बनत चालला आहे, तशी मोकळ्या मैदानांची मागणी शेकडो पटीने वाढली आहे. हजारो रुपयांत केवळ मैदानेच भाड्याने दिली जात नाहीत. प्रत्येक मैदान स्कोअरर, अंपायर, ग्राउंड्समन, टर्फ मॅनेजर, हेल्पर, बुकिंग कोऑर्डिनेटर, कोच, फोटोग्राफर, केटरर आणि इव्हेंट स्टाफलाही रोजगार देते. मॅचच्या दिवशी आजूबाजूच्या गावांतील भाजीवाले, ज्यूस विक्रेते आणि छोटे व्यापारीही खाण्यापिण्याच्या वस्तू विकून चांगला व्यवसाय करतात. विशेष म्हणजे, दरवर्षी ऑक्टोबर ते मे या काळात ही मैदाने स्वतःच एक ‘मिनी इकॉनॉमिक झोन’ बनतात. या व्यवसायाचा मोठा हिस्सा ‘कॉर्पोरेट क्रिकेट’मधून येत आहे. नोकरीपेशा वर्गातील लोक चांगल्या विकेट्स, योग्य अंपायर आणि सुव्यवस्थित सामन्यांच्या सोयीसाठी आपापसात खर्च वाटून घेऊन वीकेंडला स्पर्धा खेळतात. जो सुरुवातीला केवळ विरंगुळ्याचा एक कल होता, तो हळूहळू एका समांतर ‘क्रीडा अर्थव्यवस्थेत’ बदलला आहे. ज्या हुशार लोकांनी फ्रीलान्स अंपायरिंग आणि स्कोअरिंगचे काम सुरू केले, त्यांना सर्वाधिक विचारणा होत आहे. वीकेंडला ते कधीकधी डबल शिफ्टमध्येही काम करतात. फ्रीलान्सर सामन्यांच्या उपलब्धतेनुसार 1,500 ते 4,000 रुपयांपर्यंत कमाई करतात. ग्राउंड्समन, बुकिंग कोऑर्डिनेटर आणि फोटोग्राफरही प्रति मॅच 1,500 रुपयांपेक्षा कमी कमवत नाहीत. दुसरीकडे, जे शेतकरी पूर्वी शेतीतून वर्षाला 2-3 लाख रुपये कमवायचे, ते आता वर्षाकाठी 10 लाख रुपये कमवत आहेत. जगभरातील 4 कोटी युजर्सद्वारे वापरल्या जाणाऱ्या ‘क्रिकहीरोज’ या क्रिकेट स्कोअरिंग आणि नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच्या आकडेवारीनुसार, सुमारे 4 हजार क्रिकेट मैदाने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत आहेत. हे दर्शवते की, वेगाने विकसित होणाऱ्या शहरांजवळ पुरेशी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खाजगी क्रिकेट इन्फ्रास्ट्रक्चर हे एक नवीन बिझनेस मॉडेल बनले आहे. तामिळनाडू, हरियाणा आणि कर्नाटकच्या मोठ्या शहरांजवळची काही मैदाने तीन तासांच्या टी-20 स्लॉटसाठी 10 हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारतात. पूर्ण दिवसाचे बुकिंग 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचते. टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये प्रति मॅच 2 ते 5 हजार रुपये घेतले जातात. मात्र, सामन्यांची संख्या वाढतच आहे. शेतकरी हे सुनिश्चित करतात की सामने वेळेवर सुरू व्हावेत आणि ठरलेल्या वेळेतच संपावेत. एकट्या पुणे शहरात विरंगुळ्यासाठी 60 नोंदणीकृत मैदाने आहेत. सर्वाधिक कमाई तामिळनाडूमध्ये होत असून, त्यानंतर हरियाणाचा क्रमांक लागतो.

फंडा हाच आहे की, लोखंड कुठे गरम आहे हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. इच्छित परिणाम मिळवण्यासाठी त्यावर नेमका कुठे हातोडा मारायचा हेही समजणे गरजेचे आहे. जेव्हा चोहोबाजूंनी क्रिकेटचे वेड पसरले आहे, तेव्हा संधी असतानाच त्याचा फायदा उठवणे हेच शहाणपणाचे ठरेल.



Source link