कोंढव्यात गोळीबारात तरुण ठार — टोळीयुद्धाची शक्यता पोलिस तपासात

0
25
कोंढव्यात गोळीबारात तरुण ठार — टोळीयुद्धाची शक्यता पोलिस तपासात

पुणे :- कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात आज दुपारी झालेल्या गोळीबारात गणेश काळे (वय अंदाजे ३०) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी गणेश काळे याच्यावर सलग सहा गोळ्या झाडून आणि त्यानंतर कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

मृत गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दत्ता काळे हा आयुष कोमकर हत्येप्रकरणातील आरोपी असून सध्या तुरुंगात आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे टोळीयुद्धाची पार्श्वभूमी असल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे तसेच कोंढवा पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

डीसीपी शिंदे यांनी सांगितले, “गणेश काळे या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे CCTV फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी दहा पथके तयार करण्यात आली आहेत. एक दुचाकी घटनास्थळी सापडली असून तिच्या आधारे तपास सुरू आहे.”

गणेश काळे हा येवलेवाडी परिसरात राहणारा रिक्षाचालक असून त्याच्यावर पूर्वी एक गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या वनराज आंदेकर हत्येच्या पार्श्वभूमीवर ही घटना त्याच टोळीयुद्धाचा भाग असू शकते, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.