Monday, September 14, 2026
Homeसातारामहिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने खळबळपोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा, वरिष्ठ अधिकाऱ्यावर मानसिक छळाचा आरोप

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने खळबळपोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा, वरिष्ठ अधिकाऱ्यावर मानसिक छळाचा आरोप

फलटण (जि. सातारा) : फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्या हातावर लिहिलेल्या मजकुरात दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टरने हातावर लिहिलेल्या कथित मजकुरात एका पोलीस उपनिरीक्षकाने (psi) चार वेळा तिच्यावर बलात्कार केला आणि दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने मानसिक व शारीरिक छळ केला, असे नमूद केले आहे. पोलिसांनी या मजकुराला तपासासाठी महत्त्वाचा पुरावा मानले आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पोलिसांकडून संपूर्ण अहवाल मागवला आहे. त्यांनी संबंधित पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील या घटनेची तातडीने दखल घेतली असून, “दोषींवर कोणतीही दडपशाही न करता कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन दिले आहे.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “मी स्वतः संबंधित मंत्र्यांशी बोलून चौकशी जलद गतीने होईल याची खात्री करीन,” असे त्यांनी सांगितले.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले. “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींना लवकरच अटक केली जाईल,” अशी माहिती त्यांनी दिली.

या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. ‘रक्षकच भक्षक बनले’ अशी भावना व्यक्त होत असून, वैद्यकीय आणि पोलीस या दोन्ही क्षेत्रांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून निष्पक्ष चौकशी करून पीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments