पुतळ्याचं_स्वप्न_कधी_साकारणार?  फलटणमध्ये चर्चा

0
71
पुतळ्याचं_स्वप्न_कधी_साकारणार?  फलटणमध्ये चर्चा

फलटण | साहस Times प्रतिनिधी :- “आम्ही पोटासाठी जगतो, आणि तुम्ही आमच्या पोटावर लाथ मारता!” अशा ज्वलंत शब्दांनी शोषित, वंचितांच्या व्यथा मांडणारे, लेखणीने क्रांती करणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आजतागायत फलटणमध्ये उभारला गेलेला नाही, ही सामाजिक दुर्दैवाची गोष्ट ठरत आहे.

अनेक वर्षांपासून स्थानिक समाजबांधव आणि विविध सामाजिक संघटना अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी आग्रह धरत आहेत. मात्र आश्वासनांची भरमसाठ पखरण करूनही अद्याप पुतळा उभारणीसाठी कोणतीच ठोस कृती झाली नसल्याने समाजात नाराजीचा सूर चढू लागला आहे.

फलटण नगरपरिषदेने पाचबत्ती चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याचे आश्वासन दिले असले तरी, ती जागा सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेली आहे. परिणामी हा प्रस्ताव केवळ कागदावरच राहिला आहे.

दरवर्षी 1 ऑगस्टला अण्णाभाऊंची जयंती साजरी केली जाते. त्या दिवशी अनेक राजकीय नेते अभिवादनासाठी फुलं अर्पण करतात, भाषणं देतात. मात्र, ‘पुतळ्याबाबत दिलेलं आश्वासन काय झालं?’ असा थेट प्रश्न आता त्यांनाच समाज विचारू लागला आहे.

राजकीय नेत्यांच्या निवडणुकीआधीच्या आश्वासनांचा केवळ घोषवाक्यापुरता उपयोग न होता, प्रत्यक्ष कृती होणे अपेक्षित आहे. अन्यथा अण्णाभाऊंच्या विचारांचा अपमान होतोय, असा रोष सर्वसामान्य जनतेत व्यक्त होतो आहे.