
फलटण ( विडणी ) │ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छ भारत दिन’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने “स्वच्छता हीच सेवा” या मोहिमेअंतर्गत विडणी (ता. फलटण) येथे स्वच्छता श्रमदान अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानात ग्रामस्थांचा मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला गेला.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 मोहिमेचा शुभारंभ विडणीत करण्यात आला. गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासोबत ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे मूल्यमापन करून कार्यक्षमता वाढविणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
या स्वच्छता अभियानात गावातील रस्ते, शाळा परिसर, मंदिरे, अंगणवाडी, गटारे व सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करण्यात आली. तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले. या उपक्रमादरम्यान विडणी गावच्या लोकसंख्ये इतकीच देशी झाडे लावण्याचा संकल्प गावचे सरपंच सागर अभंग यांनी व्यक्त केला.
श्रमदान उपक्रमात सरपंच सागर अभंग, उपसरपंच सौ. मनीषा नाळे, पोलीस पाटील सौ. शितल नेरकर, ग्रामविकास अधिकारी अंकुश टेंबरे, ग्रामपंचायत सदस्य, उत्तरेश्वर विद्यालय व प्राथमिक शाळेचे शिक्षकवर्ग, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, मंडळ पदाधिकारी, विद्यार्थी, महिला व युवक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.








