
फलटण : भारतीय समाजाच्या वैचारिक आणि नैतिक जडणघडणीत भगवान बुद्धांचा धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हे दोन मूलस्तंभ आहेत. या दोन्हींचा अंतिम उद्देश एकच आहे, तो म्हणजे मानवमुक्ती, समता, करुणा आणि विवेकाधिष्ठित समाजनिर्मिती.
फलटण शहरातील सोमवार पेठ येथे BSI मिशन 25 अंतर्गत संविधान जनजागृती व जागर अभियानांतर्गत भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका यांच्या वतीने सुरू असलेले धम्ममित्र बालसंस्कार वर्ग अंतर्गत सोमवार पेठ फलटण या ठिकाणी संविधान जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धम्ममित्र बाल संस्कार वर्ग हा वर्ग केवळ मुलांना धम्मकथा शिकवणारा उपक्रम नसून, संविधाननिष्ठ नागरिक घडवणारे संस्कार केंद्र म्हणून विकसित होत आहे.
७७ वा प्रजासत्ताक दिन : संविधान जागर
२६ जानेवारी २०२६ रोजी, ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाचनालय इमारतीच्या आवारात संविधान जागर करण्यात आला. हा कार्यक्रम केवळ औपचारिक उत्सव नव्हता, तर संविधानाची जाणीव, धम्माची दिशा आणि नागरिक कर्तव्यांची आठवण करून देणारा विचारमंथनाचा सोहळा होता.
या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, फिरंगाई देवीचे मंदिर शेजारी असतानाही हा बौद्ध उपक्रम अत्यंत शांततेत व परस्पर सन्मानाच्या वातावरणात पार पडला. हे दृश्यच भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेचे जिवंत उदाहरण ठरले.
धर्मनिरपेक्षता : बाबासाहेबांचा स्पष्ट विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत वारंवार स्पष्ट केले की,
धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्मविरोध नव्हे, तर सर्व धर्मांना समान आदर देणे.
संविधानातील कलम २५ प्रत्येक नागरिकाला आपल्या धम्माचे पालन, प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार देते. कोणालाही हा अधिकार नाकारण्याचा हक्क नाही. हाच विचार काळाराम मंदिर सत्याग्रह, महाडचा चवदार तळे सत्याग्रह आणि येवला धर्मांतर घोषणा यामागे होता. हे लढे मंदिरप्रवेशासाठी नव्हते, तर मानवी प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि समतेसाठी होते.
संविधान सभेतील बाबासाहेबांचे ऐतिहासिक कार्य
संविधान सभेतील बाबासाहेबांचे कार्य हे केवळ कायदे बनवण्यापुरते मर्यादित नव्हते. विविध जाती, धर्म, भाषा आणि संस्कृतींनी भरलेल्या भारताला एकसंध ठेवणारी मूल्यव्यवस्था त्यांनी संविधानाच्या माध्यमातून उभी केली.
स्वातंत्र्य – विचार, श्रद्धा, उपासना आणि अभिव्यक्तीचे, समता – कायद्यापुढे समानता
बंधुता – सामाजिक एकात्मतेचा पाया
सामाजिक न्याय – वंचितांच्या उत्थानासाठी विशेष तरतुदी
ही सर्व मूल्ये मूळात भगवान बुद्धांनी सांगितलेल्या प्रज्ञा, करुणा आणि शील यांच्याशी सुसंगत आहेत.
लोकशाहीची बाबासाहेबांची व्याख्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
“रक्ताचा एकही थेंब न सांडता लोकांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणणारी प्रणाली म्हणजे लोकशाही.”
हीच लोकशाही संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले.
या कार्यक्रमातील मार्गदर्शनातून संविधान जागर
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष यांनी संविधान निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटना समितीचे कार्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर आलेल्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी महापुरुषांच्या जीवनकार्य व विचारांवर प्रकाश टाकणारे साहित्यिक भीमराव लोंढे लिखित गीत सादर करून वातावरण प्रेरणादायी केले.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आयुष्यमान महावीर भालेराव यांनी समाजाची आजची स्थिती, संविधानिक मार्गाने पुढे जाण्याची गरज, कर्तव्य आणि धम्माचरण यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी भारतीय बौद्ध महासभेमार्फत घेण्यात येणाऱ्या २४ शिबिरांपैकी काही शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले. तसेच या बालसंस्कार वर्गाला शुभेच्छा दिल्या. फलटण शाखेचे कार्यालय सचिव चंद्रकांत मोहिते यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन व कार्याची महती सांगणारे साहित्यिक भीमराव लोंढे लिखित गीत सादर करून वातावरणात प्रेरणा व स्फूर्ती निर्माण केली.
भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी बाबासाहेबांचे जागतिक योगदान, कोलंबिया विद्यापीठ, LSE मधील कार्य आणि भारतीय संविधानाचे राष्ट्रनिर्मितीतील स्थान सविस्तर मांडले. संविधान वाचवणे, टिकवणे आणि त्याचा प्रचार व प्रसार करणे हे आपल्या सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी तथागताच्या धम्माच्या अनुषंगाने तथागताने सांगितलेल्या चार प्रकारच्या व्यक्तींमधील प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या समूहासोबत जाण्याची भावना व्यक्त केली. त्यांनी सर्वांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या तसेच धम्ममित्र बालसंस्कार वर्गाच्या शुभेच्छा दिल्या.
भारतीय बौद्ध महासभेचे राज्याच्या संघटक तथा सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयुष्यमान दादासाहेब भोसले यांनी समता सैनिक दल, महार रेजिमेंट, महाड–काळाराम सत्याग्रह व धम्मांतर चळवळीवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. त्यांनी समता सैनिक दलाचे शिबिर व उपासिका शिबिर घेण्याचे आवाहन केले. देशाच्या सेवेत असणाऱ्या महार रेजिमेंटच्या शौर्यपूर्ण कार्याचा उल्लेख करत त्यांनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून धम्मकार्यामध्ये दिलेल्या योगदानाचे महत्त्व विशद केले. त्यांनीही ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी काही युवक-युवतींनी भीमगीतांचे सादरीकरण केले.
संस्कारांची बीजे : पुढील पिढीसाठी
या कार्यक्रमात बालसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांना ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तसेच भारतीय संविधानाची प्रत सप्रेम भेट देण्यात आली. तसेच उपस्थितांना संविधानाच्या प्रास्ताविकेची शपथ दोन विद्यार्थ्यांकरवी देण्यात आली. हे कार्य म्हणजे संविधान आणि धम्म केवळ वाचण्यापुरते न ठेवता, जगण्याचा मार्ग बनवण्याचा प्रयत्न आहे.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सोमवार पेठेत सुरू असलेले हे संस्कार वर्ग हे दाखवतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही जिवंत आहेत, कृतीत उतरले आहेत आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचत आहेत.
अशा उपक्रमांतूनच एक विवेकी, समतावादी, करुणाशील आणि संविधाननिष्ठ समाज घडतो.
आयोजक, मार्गदर्शक, तरुण कार्यकर्ते, पालक व बालकांचे मनःपूर्वक अभिनंदन. हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक सोमाशेठ जाधव, लोंढे, राज्याच्या संघटक तथा पुणे व सातारा जिल्हा प्रभारी, ड्रायव्हर काका समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु.दादासाहेब भोसले, भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्व संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका शाखेचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, समता सैनिक दलाचे माजी ऑफिसर, गायक लक्ष्मण निकाळजे, धम्ममित्र बालसंस्कार वर्गाचे व्यवस्थापक प्रदीप खरात, विशाल शिंदे, विकी भोसले, भीमराव लोंढे, राजपाल लोंढे, गणेश सावंत, मनीष लोखंडे, किशोर मोरे, गायकवाड सर, प्रसाद शिंदे, अमोल मोरे, सचिन कांबळे, गणेश भोसले,राजू सावंत, शामराव लोंढे, चिराग खरात यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक – उपासिका, बालक – बालिका उपस्थित होत्या.








