विनापरवाना विहीर खुदाईप्रकरणी कारवाईची मागणी; संरक्षण भिंतीला तडे

0
5
विनापरवाना विहीर खुदाईप्रकरणी कारवाईची मागणी; संरक्षण भिंतीला तडे

फलटण: वाठार निंबाळकर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाणी साठवण टाकीजवळ एका शेतकऱ्याने अधिकाऱ्यांच्या संगनमताने विनापरवाना विहीर खुदाई केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित शासकीय अधिकारी, कर्मचारी, फोकलेन चालक-मालक व शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करून फोकलेन जप्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, या ठिकाणी विहीर खोदण्यास निर्बंध असूनही भूजल अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्याने कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय फोकलेनच्या साहाय्याने विहीर खोदली. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तक्रार केली, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

दरम्यान, या अनधिकृत विहिरीमुळे पाणी साठवण टाकीच्या संरक्षण भिंतीला मोठे तडे गेले असून, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने विहीर बुजवून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

फलटण तालुक्यात अशा प्रकारे भूजल अधिनियमाचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत विहिरी खोदल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भूजल पातळी खालावत असून भविष्यात दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.