पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता मेळाव्यात सत्कार; स्वच्छतादूतांचा भावनिक गौरव
पंढरपूर : आषाढी वारीच्या काळात पंढरपूर नगरी व पालखी मार्गावर तब्बल दोन कोटींहून अधिक वारकरी भाविकांनी सहभाग नोंदवला. या वारीची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासन यंत्रणेत झटणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व स्वच्छतादूतांचा सन्मान राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरातील श्रीयश पॅलेस येथे पार पडलेल्या “आषाढी यात्रा २०२५ कृतज्ञता मेळावा” या कार्यक्रमात पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा, नगरपालिका आणि विविध विभागांतील कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा सिईओ कुलदीप जंगम, पुण्याचे सीईओ गजानन पाटील, साताऱ्याचे सीईओ याशनी नागराजन, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, अतिरिक्त सीईओ संदीप कोहिणकर आदींचा सन्मान करण्यात आला.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “२५ लाख भाविक पंढरपूर नगरीत आले, तर दीड कोटी भाविकांनी पालखी मार्गावर दर्शन घेतले. प्रशासन यंत्रणेच्या नियोजनामुळे वारी यशस्वी झाली. निर्मल वारी, महास्वच्छता अभियान, जर्मन हॅंगर सुविधा यामुळे भाविक समाधानी होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच माझे खरे समाधान आहे.”
या कार्यक्रमात स्वच्छतादूतांचे विशेष सन्मान करून उपस्थितांना भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. वाखरीचे स्वच्छता कर्मचारी जितेंद्र पोरे, भारूडकार चंदाताई तिवाडी, गाडगेबाबांच्या वेशातील नागटिळक, कलाकार दत्तात्रय येडवे व संजय बिदरकर यांना गौरवण्यात आले. कला पथकाच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले.
माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रशासन यंत्रणेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत सांगितले की, “यंत्रणा मनावर घेतल्यास काम उत्कृष्ट होते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी आभार मानले.