वारीत दु:खद घटना : नीरा नदीत बुडालेल्या १५ वर्षीय गोविंदचा मृतदेह ३५ तासांनंतर सापडला

0
111
वारीत दु:खद घटना : नीरा नदीत बुडालेल्या १५ वर्षीय गोविंदचा मृतदेह ३५ तासांनंतर सापडला

इंदापूर, ३ जुलै:वारीचा उत्साह, भक्ती आणि निसर्गाच्या अप्रत्याशित संकटाची तिव्र जाणीव देणारी एक हृदयद्रावक घटना मंगळवारी नीरा नदीकाठी घडली. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पायी निघालेल्या १५ वर्षीय गोविंद फोके या वारकऱ्याचा अंघोळीदरम्यान पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने वारीत शोककळा पसरली. तब्बल ३५ तासांच्या शोध मोहिमेनंतर बुधवारी सायंकाळी त्याचा मृतदेह नदीतून सापडला.

झिरपी (ता. अंबड, जि. जालना) येथील गोविंद फोके आपल्या आजीसोबत वारी करत होता. सराटी-अकलूज बंधाऱ्याजवळ अंघोळीला गेल्यानंतर तो अचानक पाण्यात वाहून गेला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी मदतीचा प्रयत्न केला, परंतु पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते अपयशी ठरले. स्थानिक प्रशासन, पोलिस, एनडीआरएफ, वजीर रेस्क्यू टीम आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या समन्वयातून अखेर बुधवारी सायंकाळी त्याचा मृतदेह दोन किलोमीटर अंतरावर मिळाला.