सातारा: ठोसेघर धबधबा कास पुष्प पठाराप्रमाणेच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने आता ठोसेघरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रासह देश-विदेशातून हजारो पर्यटक वर्षा सहलीसाठी येथे गर्दी करत आहेत.
सातारा जिल्ह्याला नैसर्गिक साधनसंपत्तीचे भरभरून वरदान लाभले आहे. ठोसेघर धबधबा, कास पुष्प पठार, वजराई धबधबा, आणि सडा वाघापूरचा उलटा धबधबा अशा विविध पर्यटन स्थळांमध्ये ठोसेघरचा धबधबा पर्यटकांच्या हृदयाला मोहवून टाकतो.
काही दिवसांपूर्वीच्या मुसळधार पावसामुळे ठोसेघर धबधबा काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला होता, परंतु आता पर्यटकांचा ओघ पुन्हा सुरु झाला आहे. विशेषतः वर्षा सहली, ग्रुप ट्रिप्स, कौटुंबिक व मित्र परिवारासह पर्यटक ठोसेघर धबधब्याचे मनोहारी दृश्य अनुभवण्यासाठी येत आहेत.
पर्यटकांची सेल्फीची आवड लक्षात घेऊन, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्या संकल्पनेतून ठोसेघरमध्ये सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. तसेच, प्री-वेडिंग शूटसाठीही ठोसेघर हे लोकप्रिय स्थळ बनले आहे. कास पुष्प पठारासारखी विविध प्रजातींची फुले येथे उमलत असल्याने पर्यटकांचा उत्साह अधिकच वाढला आहे.
पर्यटकांच्या सोयीसाठी ठोसेघर धबधब्याच्या परिसरात प्रसाधनगृह, कपडे बदलण्यासाठी खास खोली, वृद्धांसाठी विश्रामगृह, आणि ठोसेघरची माहिती देणारा चलचित्र हॉल यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, सिक्युरिटी गार्डची नेमणूक करून पर्यटकांच्या सुरक्षेची दक्षता घेण्यात येत आहे. या व्यवस्थापनामुळे ठोसेघरला येणारे पर्यटक आनंदी व समाधानी असल्याचे दिसून येते.