
ज्ञानसूर्य अस्ताला गेला… पण विचारांचा प्रकाश चिरंतन
साहस टाईम्स फलटण :- ज्ञानसूर्याच्या अस्ताने काळीज पिळवटले -६ डिसेंबर १९५६
६ डिसेंबर १९५६ हा दिवस इतिहासात काळ्या अक्षरांनी कोरला गेला. भारतीय राजकारणातील प्रचंड वादळ, कोट्यवधी दलितांची मायेची सावली असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शांत झाले. जाताना ते राष्ट्राला राज्यघटना, अशोकचक्र, मानवतावादी विचारसरणी आणि धर्म नसलेल्या माणसाला धम्म देऊन गेले. संघर्षातून मिळवलेल्या अधिकारांचे जतन व्हावे म्हणून रिपब्लिकन पक्षाची पायाभरणी करून गेले आणि ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ऐतिहासिक ग्रंथाला पूर्णत्व देताच त्यांच्या आयुष्याचा शेवटचा अध्याय लिहिला गेला.
गुरुवार, ६ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता माईसाहेबांनी ज्यावेळी बाबासाहेबांना पाहिले त्यावेळी एक पाय उशीवर, डोक्याजवळ हस्तलिखित कागद, चष्मा, काही महत्त्वपूर्ण ग्रंथ व औषधाची बाटली होती… निद्रावस्थेत बाबांचे देहावसान झाले होते. ही बातमी कळताच सात कोटी दलितांच्या अनभिषिक्त राजाच्या अंतिम क्षणी जगजीवनराम पाय धरून रडले— “अखेरीस तेही एकटे गेले…”
महानायकाचे शेवटचे पाच दिवस अत्यंत व्यस्त, भावनिक आणि ध्येयवेडेपणाने भरलेले होते.
१ डिसेंबर १९५६
दिल्लीतील मथुरा रोडवर बौद्ध कलादालन पाहिले. विविध देशांतील बुद्धमूर्तींचे निरीक्षण केले. परतताना कॅनॉट प्लेस येथील बुक डिपो मधून सात पुस्तके खरेदी केली आणि रात्री उशिरापर्यंत ती चाळत राहिले.
२ डिसेंबर १९५६
दिवसभर ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे लेखन. संध्याकाळी दलाई लामांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थित. भारतात बुद्धधम्माचा प्रचार कसा करता येईल यावर चर्चा. रात्री लेखनाचे कार्य सुरूच; आणि त्याचवेळी रत्तूंना हळुवार प्रश्न –
“ही पुस्तके माझ्या हयातीत प्रकाशित होतील काय? मी भारतभर बौद्धधर्माचा प्रसार करू शकेन काय?”
रात्री १०.३० वाजता थकव्यामुळे झोप.
३ डिसेंबर १९५६
मुंबईत १६ डिसेंबर रोजी बौद्ध धम्मदीक्षा समारंभाचा निर्णय. कार्यकर्त्यांना कळविले. निघण्यासाठी प्रथम रेल्वे तिकीटांचा प्रयत्न अपयशी झाल्याने १४ डिसेंबरची विमानतिकिटे आरक्षित केली. १४ ते १८ डिसेंबर दरम्यान मुंबईत कुमारसेन समर्थ यांच्या घरी मुक्काम निश्चित.
४ डिसेंबर १९५६
रात्रीच्या श्रमांमुळे थकवा जाणवला. सकाळी जैन धर्मीय अधिवेशनाबाबत चर्चा. रिपब्लिकन पक्षासंदर्भात समाजवादी नेते एस. एम. जोशी व प्र. के. अत्रे यांना पत्र लेखन. तसेच भारतात बुद्धधम्माचा प्रसार आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा म्हणून ब्रह्मदेश सरकारला पत्र.
५ डिसेंबर १९५६
मुंबईतील धर्मांतर व धम्मप्रचाराच्या कार्यक्रमाची सातत्याने चिंता. दिवसभर ग्रंथलेखन -आपल्या हयातीत प्रकाशित व्हावेत यासाठी तळमळ. रात्री अस्वस्थता; तरीही प्रस्तावना लिहिली, पत्रे वाचली. झोपेचे इंजेक्शनही निष्फळ.
स्वयंपाक्याने जेवणास बोलावल्यावर अनिच्छेने थोडेसे भोजन.
समोर ग्रंथांच्या कपाटांकडे पाहत बाबासाहेब स्तब्ध… त्रिसरणाचा उच्चार…
मालिश करून घेताना पुटपुटले – “चल उचल कबिरा तेरा भवसागर डेरा…”
नानकचंद रत्तूंना बुद्धगीताची रेकॉर्ड लावण्यास सांगितले. दलितांच्या भवितव्याची चिंता तेवढ्याच तीव्रतेने.
११.३५ वाजता रत्तूंनी बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन घेतले – त्यांना कल्पना नव्हती की हाच निरोप अंतिम ठरेल.
६ डिसेंबर १९५६ — अखेरचा प्रवास
सकाळी स्वयंपाकी सुदामबाबांनी दुःखद वार्ता दिली. दिल्लीतील माध्यमांना माहिती देण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली. पंडित जवाहरलाल नेहरू व अन्य मंत्री अंतिमदर्शनासाठी पोहोचले.
सायं. ४.३० – पार्थिव दिल्ली विमानतळावरून नागपूरकडे.
रात्री – दीक्षा स्थळी अंतिमदर्शन.
नंतर -मुंबई सांताक्रूझ येथे लाखोंची गर्दी.
अंत्यसंस्कारासाठी जागा नाकारली जात असल्याच्या चर्चा -पण कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका घेतली:
“मी हिंदू म्हणून मरणार नाही-अशी प्रतिज्ञा करणाऱ्या बाबासाहेबांचा अंत्यसंस्कार हिंदू स्मशानभूमीत कशाला?”
सी. के. बोले यांच्या जमिनीवर अखेर अंत्यसंस्कार ठरले आणि बौद्ध रीतीने, भदंत आनंद कौशल्य व एच. धर्मानंद यांच्या उपस्थितीत ते पार पडले.
ज्ञानाच्या अथांग महासागराला विनम्र अभिवादन!कोटी कोटी प्रणाम!
जय भीम! जय भारत!नमो बुद्धाय!🙏
संकलन : सोमीनाथ पोपट घोरपडे, प्रवचनकार, भारतीय बौध्द महासभा








