
पंढरपूर, ४ जुलै २०२५ : वारकरी परंपरेतील ताकद आणि तंदुरुस्ती यांचं अद्वितीय दर्शन घडवणारी ‘श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा’ शुक्रवार, ४ जुलै रोजी दुपारी १.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पंढरपूरच्या वाखरी येथील पालखी तळाशेजारील विश्वशांती गुरुकुल परिसरात पार पडणार आहे.
ही भव्य स्पर्धा विश्व शांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
कुस्ती महोत्सवाचे प्रमुख पाहुणे:
या स्पर्धेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी हिंद केसरी दीनानाथ सिंग, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम, पै. विष्णूतात्या जोशीलकर तसेच आमदार समाधान आवताडे उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेचे अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. संयोजन समितीचे सचिव प्रा. विलास कथुरे आणि माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांनी वारकरी मल्लांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
स्पर्धा नोंदणी आणि गटविभागणी:
- स्पर्धेसाठी नोंदणी ४ जुलै रोजी सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत गुरुकुलच्या मुख्य प्रवेशद्वारावर होईल.
- आधार कार्ड किंवा शासनमान्य ओळखपत्र आवश्यक.
- संपर्क: श्री. विलास कथुरे – ९८५०२ ११४०४, डॉ. वैभव वाघ – ८८८८१ १८४००
विशेष आकर्षण – ज्येष्ठ मल्लांची शौर्यपरीक्षा:
या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे योगमहर्षी स्व. शेलारमामा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ घेतली जाणारी ७० वर्षावरील मल्लांची खास स्पर्धा! यातील विजेत्याला ‘ज्येष्ठ वारकरी कुस्ती महावीर’ पुरस्काराने गौरवण्यात येईल.
- १६ ते २५ वयोगट – कुमार वारकरी कुस्ती महावीर
- ५६ ते ६५ वयोगट – वारकरी कुस्ती महावीर
- ७० वर्षांवरील मल्ल – ज्येष्ठ वारकरी कुस्ती महावीर
या विजेत्यांना मानाचा फेटा, माऊलींची प्रतिमा, स्मृतिचिन्ह, पदक व रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
सांस्कृतिक पर्वणी – भारूड व गवळणी स्पर्धा
कुस्ती स्पर्धेनंतर रात्री ८.०० ते ११.०० वाजेपर्यंत, संत एकनाथ महाराजांच्या प्रसिद्ध नाथांचे भारूड व गवळणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. वारकऱ्यांसाठी ही एक आत्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.
वारकरी परंपरेचा अभिमान, मल्लकुस्तीचा दांडगा उत्सव आणि संतकृतींचा सांस्कृतिक सागर—या सगळ्याचा संगम ४ जुलैला पंढरपूरात अनुभवायला विसरू नका!





