समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर भक्तवडीत उत्साहात संपन्न

0
39
समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर भक्तवडीत उत्साहात संपन्न


कोरेगाव (प्रतिनिधी) : समता सैनिक दलाचे सैनिक प्रशिक्षण शिबिर भक्तवडी, तालुका कोरेगाव येथे भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने यशस्वीपणे संपन्न झाले. या शिबिरामध्ये पुरुष १७ व महिला २४ अशा एकूण ४१ प्रशिक्षणार्थींनी समता सैनिक म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले.

यावेळी बोलताना समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले म्हणाले, “समता सैनिक दल म्हणजे शक्तीचे प्रदर्शन नव्हे, तर शिस्त, संघटन आणि संविधानिक मूल्यांवर आधारित समाजरक्षणाची चळवळ आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल स्थापन करण्यामागे अतिशय स्पष्ट, दूरदृष्टीपूर्ण आणि क्रांतिकारी हेतू ठेवला होता. तो हेतू केवळ संघटन उभारणीपुरता मर्यादित नव्हता, तर समाजपरिवर्तनाचा शिस्तबद्ध मार्ग होता.
अन्याय-अत्याचारांपासून समाजाला संरक्षण मिळावे. दलित, वंचित व बौद्ध समाजावर होणाऱ्या अन्याय, छळ, दंगली व सामाजिक बहिष्काराच्या घटनांना शिस्तबद्ध आणि अहिंसक पद्धतीने प्रतिकार करता यावा, हा प्रमुख उद्देश होता.
स्वाभिमान व आत्मसन्मान जागृत करणे हा हेतू होता
“आपण गुलाम नाही, तर या देशाचे समान नागरिक आहोत” ही भावना समाजमनात रुजवण्यासाठी संघटित, गणवेशधारी व शिस्तबद्ध दल उभारण्याचा बाबासाहेबांचा विचार होता.” असे दादासाहेब भोसले म्हणाले.

यावेळी बोलताना राजाराम कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला भारतीय बौद्ध महासभा ही धम्म संस्था दिली.यासोबतच त्यांनी समता सैनिक दल ही दिले. आज सैनिकांची गरज का आहे याचाही आपण विचार करायला हवा. जास्तीत जास्त सैनिक शिबिरांचे आयोजन आपल्याला करायला हवे.

हे प्रशिक्षण समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तसेच सातारा व पुणे जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे प्रभारी, राज्याचे संघटक दादासाहेब भोसले, डिव्हिजन ऑफिसर संपत भोसले आणि समता फोर्सच्या कंपनी कमांडर अर्चना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. त्यांनी शिस्त, संघभावना, कवायत, संविधानिक मूल्ये व सामाजिक जबाबदारी यांचे सखोल प्रशिक्षण सैनिकांना दिले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष राजाराम कांबळे, माजी अध्यक्ष सुनील कांबळे, कोरेगाव तालुक्याच्या महिला शाखेचे अध्यक्ष शर्मिला आवाडे, उपाध्यक्ष निलेश मोरे तसेच सैनिक अमोल गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी वाटर स्टेशनच्या जयश्री कांबळे लोणंद च्या गंगुबाई सोनवणे उपस्थित होत्या.

या शिबिरास भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) चे अध्यक्ष नानासो मोहिते यांनी परवानगी देत शुभेच्छा व्यक्त केल्या. समता, बंधुता व न्याय या मूल्यांची जपणूक करणारे समर्पित सैनिक घडविण्याच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे ठरले, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.