बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, रयतेचे जाणते राजे – छत्रपती शिवाजी महाराज!

0
3
बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, रयतेचे जाणते राजे – छत्रपती शिवाजी महाराज!

बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, रयतेचे जाणते राजे – छत्रपती शिवाजी महाराज!


साहस Times : छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य जितके पराक्रमाने उजळलेले आहे, तितकेच ते सामाजिक जाणिवांनी समृद्ध आहे. विविध अभ्यासकांनी, लेखकांनी आणि शाहिरांनी शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या अंगांनी समजून घेतले. परंतु एक गोष्ट समान दिसते: शिवराय म्हणजे जनतेचा, न्यायाचा आणि स्वाभिमानाचा राजा.
३९५ किल्ले जिंकूनही अंधश्रद्धेला खतपाणी न घालणारे विज्ञाननिष्ठ राजे…
बारा बलुतेदार व अठरापगड जातींना स्वराज्यात सन्मानाचे स्थान देणारे…
बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, रयतेचे जाणते राजे – छत्रपती शिवाजी महाराज!
शेतकऱ्यांच्या देठालाही धक्का न लावण्याची कठोर आज्ञा देणारे,
बिगर व्याजी कर्ज देऊन शेतकऱ्यांचा आधार बनणारे,
सर्व धर्मांना समान आदर देणारे धर्मनिरपेक्ष शासक…
गनिमी काव्याच्या तंत्राने गनिमांना घाम फोडणारे रणधुरंधर,
अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्याचे तोरण बांधणारे दूरदर्शी नेतृत्व!
शिवजयंती साजरी करण्याची परंपरा सुरू करणाऱ्या थोर व्यक्तींना मानाचा मुजरा!

चिकित्सक इतिहासदृष्टी : संघर्ष धर्माविरुद्ध नव्हे, अन्यायाविरुद्ध
गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या ग्रंथातून शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला धार्मिक द्वेषाच्या चौकटीत बसवण्याचा विरोध केला. त्यांच्या मांडणीत शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाव जपणारे आणि अन्यायाविरुद्ध लढणारे शासक होते.
पानसरे दस्तऐवजांच्या आधारे दाखवतात की शिवाजींच्या फौजेत मुस्लीम सरदार होते, आरमारात दौलतखान, सिद्दी इब्राहिम यांसारख्या अधिकाऱ्यांना स्थान होते, आणि मशिदी किंवा धार्मिक स्थळांचे रक्षण करण्याचे आदेशही देण्यात आले होते. यावरून त्यांचा संघर्ष ‘धर्म’ नव्हे तर ‘दडपशाही’विरुद्ध होता, हे स्पष्ट होते.
प्रशासन, संघटन आणि राष्ट्रनिर्मिती
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आणि जयसिंगराव पवार यांनी बखरी, पत्रव्यवहार, फारशी कागदपत्रे आणि दप्तरांचा आधार घेत शिवाजी महाराजांचे प्रशासन उलगडले आहे. त्यांच्या अभ्यासातून काही ठळक बाबी समोर येतात. त्या म्हणजे स्वराज्याची महसूल पद्धती शिस्तबद्ध आणि लेखी पुराव्यांवर आधारित होती. किल्लेव्यवस्था ही केवळ लष्करी नव्हे तर प्रशासनिक केंद्रे होती. गनिमी कावा हा अनियंत्रित हल्ला नसून नियोजनबद्ध रणतंत्र होता.
शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात असे.

जयसिंगराव पवार यांच्या मते, शिवाजी महाराज हे “मध्ययुगीन भारतातील राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया सुरू करणारे नेते” होते. म्हणजेच त्यांचे स्वराज्य हे केवळ भूभाग जिंकण्यापुरते नव्हते; ते संघटित शासन उभारण्याचा प्रयत्न होता. जयसिंगराव पवार
“शिवाजी महाराज हे मध्ययुगीन भारतातील एक अद्वितीय राष्ट्रनिर्माते होते.”असे म्हणतात.
“त्यांनी स्वराज्य ही संकल्पना व्यवहारात आणली.”
जयसिंगराव पवार यांनी शिवाजी महाराजांच्या प्रशासन, किल्लेव्यवस्था आणि महसूल पद्धतीचे तपशीलवार विश्लेषण केले आहे.
बहुजन स्वाभिमानाचा राजा
प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवाजी महाराजांना एका विशिष्ट जातीय चौकटीत अडकवण्याचा निषेध केला. त्यांच्या दगलबाज शिवाजी या पुस्तकाच्या लेखनात छत्रपती शिवाजी हे बहुजन समाजाच्या कष्टातून उभा राहिलेला नेता आहे असे मांडले आहे. ते म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशामागे मावळ्यांचे श्रम, शेतकऱ्यांचा पाठिंबा आणि सर्वसामान्यांचा विश्वास होता. प्रबोधनकार ठाकरे
“शिवाजी हा बहुजनांचा राजा होता.”
“त्याला ब्राह्मणांनी निर्माण केले नाही; तो जनतेतून उभा राहिला.” असे म्हणतात. प्रबोधनकारांनी शिवाजी महाराजांना ब्राह्मणवादी चौकटीबाहेर काढून बहुजन स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून मांडले.
समाजक्रांतिकारक महात्मा फुले यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा’ मधून शिवाजी महाराजांना “कुळवाडी भूषण” म्हटले. फुलेंच्या दृष्टीने शिवाजी हे शेतकरी आणि शोषितांचे रक्षणकर्ते होते.
फुलेंनी शिवाजी महाराजांना ब्राह्मणेतर चळवळीच्या आत्मसन्मानाचे प्रतीक मानले. ही मांडणी सामाजिक समतेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.
शाहिरीतील शिवराय : जनतेचा आवाज
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांनी आपल्या गीतांतून आणि पोवाड्यांतून छत्रपती शिवाजी महाराजांना जनआंदोलनांचे प्रेरणास्थान केले.त्यांच्या शाहिरीत शिवाजी म्हणजे अन्यायाविरुद्ध बंड करणारा, कष्टकरी वर्गाचा आधार आणि आत्मसन्मानाचा ध्वज. शाहिरी परंपरेतून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचली. ती केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक चळवळीची ऊर्जा बनली.अण्णा भाऊ साठे
त्यांच्या शाहिरीतून “शिवबाचा जयजयकार, अन्यायाचा होवो संहार!”असे म्हणतात. अण्णाभाऊंनी शिवाजी महाराजांचा पराक्रम कामगार-शेतकरी चळवळीशी जोडला.

आजची परिस्थिती आणि शिवरायांचा संदेश
आज आपण अशा काळात जगतो आहोत जिथे
जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण वाढताना दिसते.
इतिहासाचे राजकीय सोयीने अर्थ लावले जातात.
शेतकरी, कामगार आणि वंचित घटक संघर्ष करत आहेत. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना काही मूलभूत गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात:
१) समता : बारा बलुतेदार, अठरापगड जाती-सर्वांना स्वराज्यात स्थान. आज आपण सामाजिक समता कितपत प्रस्थापित केली आहे?
२) धर्मनिरपेक्षता : सर्व धर्मांचा आदर. आज आपण सामाजिक सलोखा जपतो आहोत का?
३) शेतकरी हित : शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण. आजचा शेतकरी सुरक्षित आणि सन्मानित आहे का?
४) स्वराज्याची संकल्पना : स्वराज्य म्हणजे लोकांच्या सहभागाचे शासन. आज लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आपण काय करतो?

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव नव्हे, संकल्प म्हणून साजरी केली पाहिजे. शिवजयंती म्हणजे केवळ ढोल-ताशांचा उत्सव नव्हे. ती समतेची, न्यायाची आणि सामाजिक ऐक्याची आठवण आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना खरे वंदन म्हणजे-
संविधानिक मूल्ये जपणे, बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणे, जात-धर्माच्या भिंती तोडून बंधुता वाढवणे.
शिवछत्रपतींना मानाचा मुजरा!
त्यांच्या स्वराज्याच्या विचाराने प्रेरित होऊन समतेचा, स्वाभिमानाचा आणि ऐक्याचा समाज उभारण्याचा संकल्प करूया.
सर्व बहुजन समाजाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय जिजाऊ! जय शिवराय! जय भीम!

आयु. सोमीनाथ घोरपडे, संस्कार सचिव
भारतीय बौध्द महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व)
मोबाईल नं. 7387145407