
फलटण :- फलटण नगरपरिषदेचा कारभार सध्या ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ या म्हणीची आठवण करून देणारा ठरत आहे. प्रभाग क्रमांक १० मधील रस्ते विकासाची कामे अक्षरशः रखडली असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रीतसिंह अमरसिंह खानविलकर यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात थेट लेखी तक्रार सादर करत प्रशासनाविरोधात रणशिंग फुंकले आहे.
प्रभाग १० मधील रस्त्यांच्या कामाचा ठेका ‘व्ही स्क्वेअर कन्स्ट्रक्शन’ या ठेकेदाराला देण्यात आला. मात्र, वर्क ऑर्डरची मुदत संपूनही ह. बा. कुलकर्णी ते रवी शिंदे गिरण रस्ता, जय हिंद कोल्ड्रिंक्स ते डॉ. जगताप दवाखाना, तसेच परडेकर मठ परिसरातील रस्ते अर्धवट अवस्थेतच आहेत. ठेकेदाराला तीन वेळा नोटिसा देऊनही कामे पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयाने ठेकेदारावर कारवाईचे आदेश दिले असतानाही नगरपरिषद प्रशासन त्याची अंमलबजावणी का करत नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारालाच पुन्हा नवीन निविदांमधून कामे देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, यामागे ‘अनुचित लाभ’ दिला जात असल्याचा गंभीर संशय खानविलकर यांनी व्यक्त केला आहे.
१५ ऑगस्ट २०२५ रोजी अमरसिंह भाऊसाहेब खानविलकर यांनी उपोषण केले असता, तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन प्रत्यक्षात उतरले नसल्याने प्रशासनाच्या विश्वासघाताविरोधात आता जनतेचा संयम सुटत चालला आहे.
जर प्रभाग १० मधील रखडलेली सर्व रस्ते विकासाची कामे तातडीने सुरू झाली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या इशारावजा तक्रारीमुळे फलटणच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.








